इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन
(Sing Dance and Pray) प्रभुपाद यांचा पाश्चात्य जगाला भारतीय अध्यात्माचा संदेश - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 14 : अमेरिका आणि युरोपीय देश ऐहिक सुखात गुरफटत असताना इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी त्यांना नृत्य, गायन व प्रार्थनेच्या माध्यमातून भारतीय अध्यात्माचा संदेश सोप्या भाषेत दिला, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावर आधारित सिंग, डान्स अँड प्रे, या चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इस्कॉन बंगलोरचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच अक्षयपात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दास, हरेकृष्ण चळवळीचे मुंबई प्रमुख अमितासन दास व पुस्तकाचे लेखक – पत्रकार हिंडोल सेनगुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, भारतीय संस्कृती चिरपुरातन आहे तशीच ती नित्य नूतन देखील आहे. अध्यात्म हे भारताचे वैशिष्ट्य आहे. देशावर अनेक संकटे आली तरी देखील अध्यात्म ज्ञान नेहमी अबाधित राहिले. (Sing, Dance and Pray: The Inspirational Story of Srila Prabhupada Founder-Acharya of ISKCON )
या देशात भगवान श्रीकृष्णाच्या आश्वासनानुसार वेळोवेळी स्वामी विवेकानंद, श्रीलप्रभुपाद यांसारख्या प्रभृतींनी जन्म घेतला आहे व त्यांनी अध्यात्म ज्ञान लोकांना दिले आहे असे राज्यपालांनी सांगितले. प्रभुपाद यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी असून ते लहान मुलांपर्यंत देखील सोप्या भाषेत पोहोचवले पाहिजे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. १९७० च्या दशकात पाश्चात्य देश भारताकडे एक गरीब देश म्हणून पाहत असताना श्रील प्रभुपाद यांनी भारताचे विशुद्ध आणि श्रीमंत अध्यात्मिक ज्ञान जगाला दिले असे लेखक हिंडोल सेनगुप्ता यांनी सांगितले.