

असामान्य
Author: Sudarshan Rapatwar Category: Publisher: Madhyam Publication Published: August 15, 2024 ISBN: 9788190278799 Tags: Asamanya | ISBN 9788190278799 | Madhyam Publication | Rapatwar | Sudarshan | sudarshan rapatwar | Sudarshan Rapatwar Books | असामान्य |गेली ४० वर्षांपासून मी पत्रकारीतेत सक्रीय काम करतो आहे. प्रयोगशीलता, अभ्यासुवृत्ती आणि सामाजिक सजगता या गुणांचा आधार मी माझ्या पत्रकारितेला दिला आहे. विविध वर्तमानपत्रांसाठी लेखण करणं, संशोधन आणि अभ्यास करुन वृत्तपत्रीय वाचकांसाठी सहज सोप्या भाषेत वृत्तमालिका लिहणं. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन दीपावली विशेषांक काढणं असे उपक्रम मी आजपर्यंत राबवले आहेत.
वृत्तपत्र क्षेत्रात पत्रकार म्हणून काम करण्यापूर्वी मी मुद्रणालयात कंपोझीटर म्हणून काम करीत असताना माझी आणि अमर हबीब यांची भेट-ओळख झाली. अमर हबीब यांच्या भेटीतून, सहवासातून पत्रकारितेतील अनेक गोष्टी मला सहजपणे शिकता आल्या. त्यांच्याच सहवासामुळे स्थानिक दैनिकात काम करण्याची संधी मला मिळाली. पुढे ‘लोकमत’ सारख्या प्रथितयश दैनिकात मी सलग पंधरा वर्षे काम केले. या कालावधीत मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. अनेक लहान मोठ्या व्यक्तींचा सहवास ही मला मिळाला.
पत्रकारीता क्षेत्रात काम करीत असतांना ज्या अनेक मान्यवरांचा मला सहवास लाभला त्यांचे अभ्यासाचे विषय आणि त्यांचे कार्य हे बातमी लिहीण्याच्याही पलीकडचे आहे, असे मला सतत वाटू लागले. आणि मग याच माध्यमातून बातमीच्याही पुढे जावून अशा व्यक्तींच्या अंर्तमनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न मी करु लागलो. त्यांच्या कामाचा परिचय करुन घ्यावा व इतरांनाही तो करुन द्यावा या उद्देशाने प्रस्तुत पुस्तकाची कल्पना माझ्या मनात आली.
हे पुस्तक एका अर्थाने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात अलौकिक असे काम करणाऱ्या मंडळींना केलेला सलाम आहे. पूर्वी समाजात सर्वच क्षेत्रात काम करणारी मोठ मोठी मंडळी होती. आज ही अशी बरीच मंडळी समाजात आहे. मात्र समाजास अशा मंडळी माहीत होत नाहीत. स्वतः पलीकडे जाऊ इतरांसाठी काम करणाऱ्यांची संख्या आजही बऱ्यापैकी आहे, ही समाधानाधी गोष्ट आहे.
शहरी आणि ग्रामीण विभागात अलीकिक असं काम करणाऱ्या मला भेटलेल्या, माझ्या सहवासात आलेल्या कांही मोजक्या लोकांची ‘ओळख’ या माध्यमातून इतरांनाही करुन द्यावी यासाठीच या पुस्तकाची निर्मिती आहे. या पुस्तकात लाखो लोकांना दृष्टी मिळवून देणारे पदमश्री डॉ. तात्याराव लहाने, स्वरक्ताने ७३ महापुरूषांची भावचित्रे काढणारे चित्रकार प्रल्हाद ठक, पूर्वांचलमध्ये स्वखर्चाने जाऊन रुग्णसेवेसोबत देशप्रेम जागृत करणाऱ्या डॉ. प्रतिमा आठवले, मुलांना घडवण्याचा ध्यास घेऊन ‘चला मुलांना घडवू या’ हा उपक्रम राज्यभर राबवणारे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, जलसाक्षरतेच्या दिंडीची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारे डॉ. दि.मा. मोरे, गव्हाच्या आणि तांदळाच्या काड्यापासून अप्रतिम चित्र तयार करण्याची नवी पाऊलवाट निर्माण करणारा कलंदर चित्रकार त्रिंबक पोखरकर, भारतातील सर्वांत उंच असलेल्या आठ पर्वतांसह एव्हरेस्टचे शिखर सर करून भारताचा झेंडा रोवणारा पर्वतरोहणाचा राजा सुभेदार नंदकुमार जगताप, प्लॅस्टिक कॅरीबॅगची कीड महाराष्ट्रातून काढून टाकण्याची मोहीम सर्वप्रथम दापोली येथे राबवून ‘कॅरीबॅग मुक्तीचा नायक’ ठरलेला नगर परिषदेचा मुख्याधिकारी देविदास कोकरे, महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचे खरे चित्र पाहण्यासाठी ग्रामीण-दुर्गम भागांची भ्रमंती करुन वाचकांना महाराष्ट्राचे वास्तव दर्शन घडवणारे नव्या वाटांचे शोधयात्री राजाभाऊ शिरगुप्पे, राज्यात संपूर्ण विभाग पाणी टंचाईने होरपळून निघत असतांना पाणी टंचाईवर मात करण्याचा संदेश देणारे शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर, कारगील युद्धात तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालणारा सैनिक सतीश तपसे, २० वर्षांपर्यंत नृत्यकलेचे कसलेही ज्ञान नसलेला आणि स्वकष्टावर राष्ट्रीय नृत्य कलाकार झालेला विनोद निकम, निसर्गाच्या लहरीपणामुळे आयुष्यभर डालीतूनच प्रवास करावी लागणारी
वंदना कासारे, स्वतःच्या जीवाची जोखीम सांभाळत सर्पमित्र झालेला नागेश टाक, साहित्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेले सारस्वतांचे प्रयागतीर्थ रंगनाथ तिवारी, महिला चळवळ अधिक प्रगल्भ व्हावी म्हणून साहित्यासोबतच महिला चळवळीवर विशेष काम करणान-या प्रा. शैला लोहिया आणि मनाच्या कोपऱ्यात आजही घर करून बसलेले, मला जर्जर आजारातून बाहेर काढणारे आमचे फॅमिली डॉक्टर आणि श्रध्दास्थान डॉ. बापूसाहेब देशपांडे, सैन्यदलातील नोकरी ऐन उमेदीच्या काळात सोडून महारोगाने जखडलेला, दोन वेळेच्या जेवणासाठी दारोदार फिरणारा उंबरखान आणि आपल्याच आईची बाळतपणे करणारी सुदैवी अविवाहीत तरुण मुलगी ‘मावशी’ असा एकूण १९ अलौकिक व्यक्तींची ओळख करुन देण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून केला आहे.
या पुस्तकात ज्या व्यक्ती किंवा त्यांच्या कार्याबद्दल लिहिलं आहे त्या सर्वच व्यक्ती वा त्यांचे काम मला भावले आहे. या व्यक्तींच्या कामाचं योगदान आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. या व्यक्तीपैकी अनेकांना आपल्या कामाला चळवळीचे स्वरुप देता आलं, अनेकांना ते जमलंही नाही. म्हणून त्यांनी केलेलं काम समकालीन महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं नाही, असंही नाही. या पुस्तकातील लेख लिहीत असतांना, एवढं मोठं काम करणारी समाजात माणसं असतांना या माणसांचा, समाज मनावर का प्रभाव पडत नाही? असा प्रश्न मला सतत पडत होता. याचं एक ठळक कारण माझ्या लक्षात आलं. आपल्याकडील सुशिक्षित पांढरपेशा वर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ या मंडळींना विनासायास मिळाल्यामुळे शिक्षण-बुद्धीमत्ता-समाजकारण यांच्या वापराबाबतचे त्यांचे अग्रक्रम बदलून गेले आहेत. फक्त पैसा-पैसा आणि पैसाच हाच एक अग्रक्रम सर्वांनी धरला आहे आणि यातूनच ही परिस्थिती निर्माण होवू लागली आहे.
प्रस्तुत पुस्तक निर्मितीची संकल्पना माझ्या मनात गेली अनेक दिवसांपासून घोळत होती. या संकल्पनेचे पुस्तकात रुपांतर करण्यासाठी मला दैनिक एकमतचे तत्कालीन संपादक शरद कारखानीस आणि कलमनामा साप्ताहीकाचे संपादक युवराज मोहीते यांनी प्रोत्साहन दिले. या दोघांनी आपल्या अंकात या पुस्तकातील कांही लेख प्रसिद्ध केले. त्यांचा मी आभारी आहे. या पुस्तकातील कांही पात्रांची अप्रतिम रेखाटने कसलाही मोबदला न घेता माझे मित्र चित्रकार त्रिंबक पोखरकर यांनी मला करुन दिली. तर पुस्तकाचे अक्षरांकन, डिझाईन व प्रिंटींग दीप मल्टी सर्व्हिसेस, अंबाजोगाईच गणेश जाधव यांनी करुन देऊन मला सहकार्य केले. या पुस्तकातील लेख लिहण्यासाठी व माझ्या पत्रकारितेतील अभ्यासुवृत्ती, प्रयोगशीलता आणि सामाजिक सगजता सतत कायम ठेवण्यासाठी मला आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार !
– सुदर्शन नरहरराव रापतवार
Back