२९५७ अंगणवाडी केंद्राला ताळे; हजारो चिमुकले सकस आहारापासून वंचित!
(न्युज : प्रदीप तरकसे, अंबाजोगाई)


६ हजार अंगणवाडीताई, मदतनीस संपावर
संपुर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासह इतर मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील ६ महिने ते १ वर्ष वयोगटातील हजारो बालके आहारापासून वंचित आहेत. जिल्ह्यात २९५७ अंगणवाडीकेंद्रांना संपामुळे टाळे लागले असून या संपात जवळपास ६००० अंगणवाडीताई सहभागी झालेल्या आहेत. एकट्या अंबाजोगाई तालुक्यात ७ हजार १२३ बालके आहारा पासून वंचीत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील २५२ अंगणवाड्या
अंबाजोगाई तालुक्यातील २५२ अंगणवाड्यां व मिनी अंगणवाड्यांमधील ४३८अंगणवाडी सेविका व मदतनिस कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षापासून शासनाने त्यांच्या विविध समस्या सोडवील्या नसल्याने राज्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस २० फेब्रुवारीपासून संपावर गेले आहेत.
७,१२३ बालक सकस आहारापासून वंचित


मागील चार दिवसापासून या संपावर तोडगा निघाला. नसल्याने तालुक्यातील २५२ अंगणवाडी केंद्रांना टाळे लावण्यात आले आहेत. अंगणवाडी केंद्र उघडण्यात येत नसल्याने या केंद्रात जाणार ७ हजार १२३ बालकांना आहारा पासून वंचीत राहावे लागत आहे. लवकरात लवकर या संपावर शासनाने तोडगा काढाव अशी मागणी होत आहे.
कशासाठी आहे संप?
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा, मानधनवाढ, न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी, पूरक पोषण आहाराच्या रकमेत महागाईनुसार वाढ, अंगणवाडी सेविकांना कार्यक्षम मोबाईल फोन, सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांच्या थकीत सेवासमाप्तीचा लाभ, ८०० ते १००० लोकसंख्येला एक अंगणवाडी केंद्र, सन २००२ च्या शासन निर्णयानुसार सेविकांमधून पर्यवेक्षिकांची पदे भरावीत आदी मागण्यांसाठी हा संप सुरू आहे.


तर लढा तीव्र करु; कमल बांगर
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या शासनाच्या कर्मचारी आहेत. शासन त्यांचे मालक आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता ते अर्धवेळ नसून पूर्णवेळ आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक ही संविधानाच्या ४७ व्या कलमानुसार, शिक्षण, आहार व पोषणविषयक घटनात्मक तरतुदीची अंमलबजावणी केलेली आहे. यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अन्यथा हा लढा आणखी तीव्र केला जाईल. मानधन वाढ, पेन्शन यासह इतर मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत संप मागे घेणार नाहीत, अशी माहिती अंगणवाडी सेविका, मदतनिस महासंघाच्या कमल बांगर यांनी सांगितले.