स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी व इतर रीक्त पदे भरण्यासाठी आर्थिक मागणी


आ. नमिता मुंदडा यांची चौकशी ची मागणी
येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, जि. बीड येथे हाऊस ऑफिसर, सिनियर रेसिडेंस आणि रक्त संक्रमण अधिकारी ही पदे आर्थिक व्यवहारातून भरण्यात येत असल्याची चर्चा असून या संदर्भात वरीष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


पदव्युत्तर विद्यार्थ्यांनेच केली तक्रार
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, दत्ता रंगनाथ चकटकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, जि. बीड. येथून शरीर विकृती शास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सदर महाविद्यालयात पॅथॉलॉजि या विषयात सिनियर रेसिडेंस या पदाच्या ४ जागा रीक्त आहेत. सदर रिक्त पदावर नियुक्ती मिळण्याबाबत त्यांनी अधिष्ठाता यांना विनंती केली परंतु त्यांच्या अर्जा नंतर आलेल्या उमेदवाराला नियुक्त्या देण्यात आली असून पात्र असून ही अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही.


२० ते ४० हजारांपर्यंत होते मागणी
तसेच ते सध्या सदर महाविद्यालय व रुग्णालयात रक्त संक्रमण अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. परंतु त्यांना एम डी रेसिडेंसशिप मिळणे आवश्यक असतांनाही त्यांना मागणी करून ही ती त्यांना देण्यात आली नाही. तसेच त्यांना हाऊस ऑफिसर या पोस्ट साठी २०,०००/- हजार रुपये तर रक्त संक्रमण अधिकारी या पोस्ट साठी ३५,०००/- हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती सिनियर रेसिडेंसशिप पोस्ट साठी देखील ४०,०००/- हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे. हि अतिशय गंभीर बाब आहे.


प्रत्यक्षात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय. हे रुग्ण व गरीब होतकरू विद्यार्थ्यासाठी नवसंजीवनी ठरलेले रुग्णालय आहे. परंतु मागील काही वर्षपासून अधिष्ठाता कार्यालयाचे महाविद्यालय व रुग्णालयावर कुठलेही नियंत्रण नसल्याने वरिष्ठांच्या संमतीने पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विद्यार्थ्याकडून रुग्णालयात आऊस ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, सिनियर रेसिडेंसशिप, रक्त संक्रमण अधिकारी या पदावर भरण्यात येणाऱ्या पदासाठी थेट पैश्याची मागणी करण्यात येत असल्याच्या प्रचंड तक्रारी असून आर्थिक व्यवहारातूनच वरील पदे भरण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गरीब व पात्र विद्यार्थ्यावर अन्याय होत असून ते वरील पोस्ट पासून वंचित राहत आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून गंभीर बाब आहे, त्यामुळे वरील प्रकरणी गांभीर्याने चौकशी करून सर्व संबंधितावर कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी केली चौकशी ची मागणी
तरी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड येथील वरील गंभीर प्रकारची तातडीने चौकशी करून सर्व संबंधितावर कार्यवाही करणेबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.