औरंगाबादमहाराष्ट्र
समरसता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सेवा वस्तीवरील काम वाढवा
खा. डॉ.अजित गोपछडे यांचे मत
नांदेड येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या विसाव्या समरसता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नांदेड मधील सेवा वस्त्यांवरील वंचित व शोषित समाज घटक सेवाकार्याशी जोडले गेले पाहिजेत. सेवा वस्त्यांवर जाऊन कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या आपल्या समाज बांधवांना मदत करावी व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करावे. दोन आणि तीन ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या समरसता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दर्जेदार सामाजिक व वैचारिक मेजवानी नांदेडकरांना विविध चर्चासत्रातून मिळेल असे मत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार डॉ अजित गोपछडे यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट
शहरातील श्रीनगर भागात सुरू करण्यात आलेल्या समरसता साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल्यानंतर संमेलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य व व्यवस्थेतील प्रमुख कार्यकर्त्यांशी खा. गोपछडे यांनी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी नांदेडच्या समरसता साहित्य संमेलनाचे कार्यवाह माणिकराव भोसले, सेवाभारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतोष देबडवार,संमेलन निमंत्रक डॉ. शिवा कांबळे , संमेलन महाव्यवस्थापक अभय कोटलवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
साहित्यिक विचारवंत घेणार सहभाग
समरसता साहित्य संमेलनाचे कार्यवाह माणिकराव भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.
तसेच संमेलनाचे निमंत्रक डॉ. शिवा कांबळे यांनी बोलताना सांगितले, ” नांदेड जिल्ह्यांतील सर्वच साहित्यिक, सामाजिक विचारवंत या साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. संमेलनाचे आयोजन करण्यासाठी नांदेडमधील सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे.
आदिवासी, भटके-विमुक्तांशी साहित्याच्या माध्यमातून संवाद साधा
यावेळी बोलताना खा. डॉ. अजित गोपछडे पुढे म्हणाले, या समरसता साहित्य संमेलनामुळे दलित, आदिवासी, भटके-विमुक्त समाजाशी साहित्याच्या माध्यमातून संवाद साधून समरसतेचा व सामाजिक एकतेचा संदेश पोहचवला जाईल.भारतीय मूल्यव्यवस्था, राष्ट्रीय विचारधारा आणि संस्कृतीचा गौरव करणारे साहित्य निर्माण करणे व त्याचा प्रसार-प्रसार यामधून साध्य होईल. आपण संघाचा स्वयंसेवक या नात्याने समरसता साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष पद स्वीकारले आहे.
आज समाजातील सर्वच घटकांमध्ये सामाजिक समरसता प्रस्थापित होणे आवश्यक असून परस्पर बंधुभाव, सहिष्णुता व ऐक्य वाढण्यासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग होतो. या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक नामवंत विचारवंत व साहित्यिक दोन दिवस वास्तव्याला राहणार आहेत. यांच्या मार्गदर्शनाचा लाभ शहरातील नागरिकांनी घेऊन सामाजिक समरसता वाढविण्याच्या प्रबोधनात्मक कामात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला संघ परिवारातील विविध आयामांचे प्रमुख कार्यकर्ते व व्यवस्थेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.