“मानवलोक” ला नांदेड मेडिकल फाउंडेशन चा पुरस्कार जाहीर


नांदेड येथील नांदेड मेडिकल फाऊंडेशनचे सेवा पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून, अंबाजोगाई येथील अनिकेत लोहिया यांच्या’ मानवलोक’ या संस्थेस यंदाचा ‘डॉ. मोहन भालेराव माता व बालसंगोपन’ पुरस्कार घोषित आहे. करण्यात आला ‘मानवलोक’ संस्था वैद्यकीय, सामाजिक, माता बालसंगोपन, जलसंवर्धन, ग्रामविकास, आपत्ती निर्मूलन, उसतोड कामगारांच्या समस्या निर्मूलन आणि शेती विकास अशा अनेक उपक्रमांमध्ये कार्यरत आहे.


नांदेड येथील प्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात अनेकविध उपक्रम करणारे तसेच निसर्ग छायाचित्रणात नैपुण्य प्राप्त केलेले डॉ. सुशील शिवलालजी राठी यांना फाऊंडेशनचा ‘प्रमिलाताई भावे सेवा पुरस्कार ‘जाहीर केला असून, या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येत्या २३ जानेवारी रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले आहे.


सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व पुरोगामी विचारवंत प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. पुरस्कारांचे स्वरुप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. नांदेड मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव व्हावा या उद्देशाने प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार, तर २०११ पासून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव व्हावा, या उद्देशाने डॉ. मोहन भालेराव ‘माता व बालसंगोपन पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सदरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहिया यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.