१० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशी चे पवित्र मुहुर्त साधून मी “माध्यम न्यूज.कॉम” www.madhyamnews.com च्या माध्यमातून डिजिटल मेडिया मध्ये प्रवेश केला. स्वतः च्या मालकीचं आणि हक्काचं एक स्वतंत्र पेज एक असावं हा विशिष्ट दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मी हे पेज सुरु केले. कसल्याही प्रकारच अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण न घेता हे पेज सुरु केल्यामुळे सुरुवातीच्या काळात हे पेज चालवणे, त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजावून घेवून पुढे चालणे असा माझा प्रवास होता. हा प्रवास सुरु करण्यासाठी आणि सतत दोन वर्षे तो सुखकर चालवण्यासाठी मला माझा मुलगा आशुतोष याचे खुप सहकार्य मार्गदर्शन मिळाले हे या ठिकाणी प्रामाणिकपणे मला नमुद करावे लागेल.
या डिजिटल मेडिया क्षेत्रात येण्यापूर्वी मी जो चाळीस वर्षांचा कार्यकाळ प्रिंट मिडिया मध्ये खर्च केला याचा खुप फायदा मला हे डिजिटल पेज चालवताना झाला. या कालावधीत बातमी, लेख, शोध पत्रकारिता, एखाद्या बातमीच्या मुळापर्यंत कसे जावे याचा मार्ग शोधण्याची गुरुकिल्ली, पुस्तक परिक्षण, चित्रपट परिक्षण अशा किती तरी विषयावर सहज लेखन करण्याची कला मला अवगत झाली. एवढेच नव्हे तर माझ्या ओघवती व वाचकांच्या थेट -हदयाला भिडणा-या माझ्या लेखन शैलीला वाचकांची मिळत असलेली सतत प्रशंसा यामुळे “मंदिराचे गाव”, “असामान्य” आणि “सहज सुचलं म्हणून” या तीन पुस्तकांचा भव्यदिव्य प्रकाशन सोहळा राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मला आपल्या सर्वांच्या साक्षीने घेता आला.
“www.madhyamnews.com” या डिजिटल पेज निर्मितीला आज दोन वर्षे पुर्ण होत असतांनाच मी ज्या विशिष्ट धोरणं आणि नियमांना अनुसरून हे पेज सुरु केले त्या धोरणं आणि नियमात मी कसल्याही प्रकारची तडजोड केली नाही. अनेक वाचकांनी या पेज वर दैनंदिन स्थानिक बातम्यांना फार कमी प्रसिध्दी मिळते असा तक्रारींचा सुर माझ्या जवळ काढला, तेंव्हा मी त्यांना नम्र पणे सांगितले की, “मी हे पेज चार पाचशे रुपये घेऊन बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी सुरु केले नाही, मला ते पटत नाही. स्थानिक बातमी मला खरंच ती जनहिताची वाटेल त्याच बातमीला माझ्या या पेज वर स्थान मिळेल.” माझा हा संकल्प मला टिकवता आला याचा मला आनंद आहे.
“www.madhyamnews.com” या कसोटीवर ही वाचकांच्या पसंतीस उतरले यांचा मला आनंद आहे. दोन वर्षांचा हा सुखद प्रवास पुर्ण करुन तिसऱ्या वर्षात पदार्पण करतांना काही नवे संकल्प मी मनाशी खुणगाठ करुन निश्चित केले आहेत. शहरात “यु ट्युब चॅनल” ची वाढती संख्या लक्षात घेऊन युट्यूब चॅनल सुरु करुन सटरफटर बातम्या न देता नव्याने वेगळा काही उपक्रम सुरु करता येईल का याचा मी प्रयत्न करणार आहे. तसे काही उपक्रम मी निश्चितपणे ठरवले ही आहेत. मला आपला पुर्ण विश्वास आहे माझा हा नवीन उपक्रम आपल्या पसंतीस निश्चित उतरेल!
www.madhhyamnews.com या माझ्या डिजिटल पेज ला आपण जी पसंती या दोन वर्षांच्या कालावधीत दिली त्याच पसंतीच्या जोरदार मी हे नवीन प्रयोग करण्याचं धाडस करणार आहे. वाचक आणि प्रेक्षक यांच्या निश्चित पसंती आणि विश्वासाला www.madhyamnews..com
हे न्यूज पेज निश्चितच उतरेल यांचा मला विश्वास आहे. “www.madhyamnews.com” या पेज ला आपण दोन वर्षे जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मन:पुर्वक धन्यवाद!
असाच स्नेह राहु द्या, तुमचा स्नेह हीच माझ्या नव्या संकल्पांची उर्जा आहे !
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.