प्रा. रामकृष्ण डिघोळकर यांचे निधन


स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील निवृत्त प्रा.रामकृष्ण रघुनाथ डिघोळकर यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहता या गावी निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण योगेश्वरी नूतन विद्यालयात झाले त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हैदराबादच्या सिटी कॉलेज येथे घेतले. १९५६ साली योगेश्वरी नूतन विद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून रुजू झाले त्यानंतर योगेश्वरी महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी आपली शैक्षणिक सेवा केली. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे त्यांनी अध्यापन केले १९९४ साली ते सेवानिवृत्त झाले २००३ ते २००८ या कालावधीत ते योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक होते.
प्रा. रामकृष्ण डिघोळकर यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर मनाचे श्लोक, हरीपाठाचे अभंग, चांगदेव पासष्टी यासह अनेक नामवंत मराठी ग्रंथाचे इंग्रजी अनुवाद केले. तर सर्वज्ञ दासोपंतकृत पंचीकरण पासोडी-ओवी अन्वयार्थ -विवेचन, मराठवाडा गौरवगाथा, योगेश्वरी महात्म्य, प्रवास वर्णन अशा अनेक ग्रंथाचे लेखन त्याचबरोबर ऐतिहासिक, शैक्षणिक, धार्मिक, पौराणिक ख्याती असलेल्या अंबाजोगाई शहर आणि परिसर संदर्भातही विपुल लेखन केले त्यांच्या निधनाने एक माहितीपूर्ण असलेला लेखक हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.