प्रा.ई. सोनकांबळे यांच्या विचारांचा वारसा जपणारं दांपत्य!


आठवणीचे पक्षी या आत्मकथनाचे लेखक प्र.ई सोनकांबळे यांचे चिरंजीव डॉ. अश्विन हे जे. जे.हॉस्पिटलमध्ये एमडी म्हणून कार्यरत आहेत. वडिलाप्रमाणे अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी लिहिलेला हा लेख अत्यंत प्रेरणादायी आणि वाचकांना मार्गदर्शक ठरणार आहे. आज ७ मे! डॉ. अश्विन यांचा वाढदिवस, म्हणून हा लेखन प्रपंच!
“आठवणीचे पक्षी” प्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक प्रा. प्र.ई. सोनकांबळे यांचे चिरंजीव डॉ.अश्विन यांचा ०७ मे, रोजी ५० वा .जन्मदिवस औरंगाबाद येथे त्यांच्या मूळ घरी आप्ताच्या मेळ्यात साजरा होत आहे. ते मुंबई येथील जे.जे हॉस्पिटलमध्ये एम.डी पदावर कार्यरत असूनही मूळ आपल्या गावी येऊन आपला जन्मदिवस साजरा करत आहेत यातून त्यांच्यावर झालेले सरांचे आपलेपणाचे संस्कार दिसून येतात. डॉ. पूर्णिमा मॅडम ,डॉ. अश्विन सर आणि त्यांची मुलं रोहक-रोहिका हे सर्व कुटुंब प्र.ईं सोनकांबळे सरांच्या समता आणि नम्रतेच्या छायेत वाढलेले असल्यामुळे त्यांचं साध वागणं, बोलणं ,सहजपणे इतरांशी जुळवून घेणं मनाला भावतं .ज्ञान, बुद्धी आणि संपत्ती याचा बडेजावा न करता शक्य होईल तितकं सामान्याशी जोडलं जाणं त्यांचा हातखंड आहे.


इतरांवर जीवापाड प्रेम करणं ,महानगरात राहूनही येणाऱ्या प्रत्येकाला मायेची उब देणं त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. हे दांपत्य आपल्या परीने प्र.ईं च्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या विचारांचा वारसा चालताना दिसून येतं. याचा प्रत्यय मला त्यांच्या घरीतील एका मुक्कामातून आला. त्याची आठवण या लेखानातून मी सांगत आहे.
माणसे जन्मतात-मरतात संपतात. सारं सारं असत्याचं नसतं होऊन जातं त्यांचं. काही असतात भली माणसं त्यांच्या आठवणी उरतात उरात श्वासागत, तर काही असतात त्यांच्या जगण्याला नसतोच काहीच अर्थ विसरून जातो आपण त्यांना क्षणात. मग ते त्यांच्या असण्या नसण्याच्या कोणत्याच मापात बसत नाहीत. ते आले आणि गेले त्यांच्या जन्ममरणाचा कोणालाच काहीच नसतो कळवळा. आपली- आपली म्हटली जाणारी माणसं, त्यांच्या दृष्टीने आपण असतो गौण खाणीतल्या निरुपयोगी खनिजासारखे बाजूला फेकलेले. सारखीच अधळापट जन्मोजन्माची.


चांगली माणसं असतात थोडी-थोडकीच, सणावाराला मिळावी पुरणाची पोळी तशी भेटतात कधी-मधी वाईटांच्या गर्दीत.कोळशाच्या खाणीत सापडावा हिरा तशी दुर्मिळ. त्यांचा सहवासही दुर्मिळच हवा असतो आपल्याला मग कधीतरी मिळतो ,आणि होऊन जाते आपलेही सोने परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे व्हावे तसे. म्हणून आपण कोण आहोत ?कोठून आलेलो आहोत? कोठे जायचे आहे? हे जरी आपल्याला माहीत नसले, तरी चांगल्या माणसांच्या सहवासाला आपण हापापलेलो असलो पाहिजे .त्यांच्या सहवासाने- स्पर्शाने सापडते जगण्याला नवी दिशा. त्यांच्या पाऊलखुणांवर चालणं नवा मार्ग दाखवून जातं जरी त्यांचे जगणे कठीण-अवघड असले ,तरी दुःखाच्या वाळवंटा नंतर सुखाची हिरवळ येतच असते की, तसच असतं चांगल्या माणसांचं जगणं. म्हणून आपल्या जीवनात हिरवळ फुलवण्यासाठी आपणही दुःखाच्या तप्त वाळवंटावरून चाललं पाहिजे हे मात्र नक्की.
परवा शब्द परिवाराचं’ विश्व मराठी साहित्य संमेलन’, नेपाळ काठमांडू येथे संपन्न झालं. त्या संमेलनात साधनव्यक्ती म्हणून मला निमंत्रित करण्यात आलं होतं .आता निमंत्रित करण्यात आलं होतं, म्हणजे कोणीतरी गावातलं आपल्या सोबत असावं म्हणून त्या संमेलनाचे अध्यक्ष दादा(मा.दगडू लोमटे) यांनी मला बळच घोड्यावर बसवलं होतं .आणि माझं नाव पत्रिकेत टाकलं होतं .मलाही भलतीच हाऊस मी निघालो,’ गाड्या बरोबर नळ्याची जत्रा ‘कशी असते ते संमेलनावरून घरी आल्यावर मला कळलं. या प्रवासात एक मात्र नक्कीच घडलं या संमेलनातून काही मिळालेलं नसलं ,तरीही प्रवासादरम्यान मुंबई येथे एक मुक्काम प्र.ई. सोनकांबळे यांच्या घरी झाला तो मात्र मला बरच काही देऊन गेला.


जगण्याला नवी दिशा- नवी उमेद आणि नवी ऊर्जा .
मुंबई ते नेपाळच्या मार्गाने जाणारे विमान सकाळी पाच तीस वाजता असल्यामुळे आणि लातूरहून मुंबईला जाणारी ट्रेन व बस सकाळी वेळेवर पोहोचू शकत नसल्यामुळे मी आणि दादा पहिल्याच दिवशी सकाळी मुंबईला ट्रेन ने पोहोचलो. दादानं टॅक्सी बोलावली आणि मला म्हणाला,” बसा जाऊत आपल्या घरी”.
मला वाटलं होतं जवळच लॉजवर आपला मुक्काम असेल, पण दादांनी आपल्या घरी जावूत म्हटलं तेव्हा,’ हा माणूस कोणाच्या घरी आपल्याला घेऊन जाणार’? हा प्रश्न मला पडला होता. कारण मुंबईसारख्या मायावी महानगरात चतकोर संस्कृतीत वाढलेली माणसं गावाकडून आलेल्या माणसांना सहजासहजी स्वीकारतील असं होत नाही, खरं तर सगळेच वाईट असतात असही नाही ,मात्र सर्रासपणे असे प्रसंग येतात .कोणीतरी गावाकडून आलं तर फोनवरच सांगतात ,’आम्ही मुंबईत नाही’ किंवा ‘आम्ही कोणत्यातरी कामात-अडचणीत आहोत’. आणि टाळाटाळ सुरू होते. पण दादा हा साहित्य-संस्कृती आणि समाजकारणातला ‘दादा’ माणूस. त्याला हजारो लोक सहजपणे ओळखतात. कदाचित त्यातला जिव्हाळ्याचा एखादा माणूस असेल असं मला वाटलं आणि मी गप गुमान गाडीत बसलो. गाडी सरळ एका उड्डाण पुलावरून खाली उतरली आणि उजव्या हाताला वळून सरळ जे .जे. हॉस्पिटलच्या प्रांगणात घुसली. मी दादाला म्हणालो,”इथेच राहतात का ते?”
“होय, हो. ते इथेच डॉक्टर आहेत दोघेही नवरा-बायको डॉक्टर आहेत. तुम्हाला माहित नाहीत का प्र.ई. सोनकांबळे? त्यांचा मुलगा अश्विन आणि सूनबाई पूर्णिमा आहेत ते. इथेच राहतात. तुमच्याच गावाकडचे आहेत ते. तिकडं अहमदपूरच्या बाजूला हडोळती आहे का तिकडचेच आहेत ते”.
प्र.ईं .चं नाव काढताच माझ्या अंगावर काटा आला आणि आठवायला लागलं “आठवणीचे पक्षी”आणि त्यातल्या एका-एका पानावरचा एक -एक प्रसंग आठवून डोळे भरून आले . दुःख- वेदना काय असते? उपेक्षितपणाचं जगणं म्हणजे काय असतं? जात-धर्म आणि शूद्र म्हणून नाकारलेलं जगणं काय असतं? वाळलेलं-कुजलेलं आणि संदर्भहीन जगणं म्हणजे काय असतं? मुतारीच्या कडेला हिबाळलेली भाकर धुऊन खाताना भूक म्हणजे काय असते? हितभर पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी माणसाला किती हाल- यातना सहन कराव्या लागतात. आणि या यातना सहन करूनही शिकण्याची चिकाटी. मैलोन-मैल नागव्या पायांनी तापलेला फुपाटा तुडवित कॉलेजला जाण्याची जिद्द काय असते? याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्र.ई. सोनकांबळे. त्यांना मी कधीच प्रत्यक्षात पाहिल नाही, मात्र त्यांच्याविषयी भरपूर ऐकलं आणि कॉलेज जीवनात वाचलं. त्यामुळे आम्हा ग्रामीण भागातल्या सर्व मुलांचे ते प्रेरणास्त्रोत होते. हाल- अपेष्टा सहन केल्यानंतर शिक्षणामुळं मोठं होता येतं, ज्ञानी होता येतं हे प्र.ई. सोनकांबळे यांनी आम्हाला शिकवलं. त्यांचं दुःख वाचून आमचं दुःख आम्ही हलकं करत होतो. त्यामुळे मी त्यांना,” हो चांगलंच ओळखतो”. म्हणालो आणि गप्प बसलो. मनात एकच काहूर होतं आपण त्यांना कधीच भेटलो नसलो ,तरीही त्यांच्या घरी जात आहोत त्यांचा मुलगा,सून नातवंडं सर्वांना भेटणार आहोत त्याचा आनंद आणि कुतूहल होतं. मात्र दुसऱ्या बाजूला मनात भीतीही होती इतक्या मोठ्या महानगरात दोघेही एमडी जे .जे. हॉस्पिटल सारख्या नावाजलेल्या दवाखान्यात आहेत, त्यामुळे त्यांची लाईफस्टाईल राहणं -वागणं- बोलणं प्रचंड पुढारलेला असेल. महानगर आणि प्रचंड पगाराच्या नोकऱ्या म्हटलं ,की चंगळवाद आलाच. जुन्या पिढीतील विद्वान माणसं अनेक आपण पाहतो त्यांचं जगणं-वागणं-बोलणं आणि त्यांची राहणी ती कोणत्याही काळात बदलली नाही .मग ते महानगरात वास्तव्यास असले, तरीही त्यांनी आपलं जुनेपण सोडलेलं नाहीत, पण अलीकडे त्यांची पुढची पिढी मात्र त्यांचं सारंच जगनं विसरून जात आहे. त्यांचं त्यांना काहीच पटतही नाही .त्यांच्या विरोधी ते जगत आहेत. मग यांचं काय? हे कसे असतील? खरंच प्र.ई.च्या आपलेपणाच्या पाऊलखुणा जपत असतील का? दुःखाच्या खाईतून स्वतःचं जीवन फुलवणाऱ्या प्र.ईं.नी यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सुख पायाशी लोळत असतानाही “सुखाच्या राजदरबारी, जीते मरणे नको मजला” या सुनिल तांबेंच्या गझलेच्या मुखडया प्रमाणे आपलं जीवन सामान्य माणसासारखं शेवटपर्यंत जगत राहिले. मात्र यांचा अंदाज करणं माझ्यासाठी कठीण होतं.
घरात गेलो वाटलं होतं,सारा झगमगटात असेल. आपल्याला तेथे अवघडल्यासारखं होईल, पण तसं काही घडलं नाही. उलट तेथे सारं काही निराळच पाहायला मिळालं. आपण आपल्याच घरात आलो आहोत असाच मला भास झाला. घरात जाताच ताई लगबगीने समोर आली, आणि म्हणाली,” या आत. मध्ये या. ठेवा इथेच बॅगा हातपाय धुवा बसा इथे”. ताईंची आत-बाहेर लगबग चालू होती. सरांचं मात्र शांत शांत. ते हळुवारपणे दादांशी बोलत होते”, गाडी वेळेवर निघाली का? गर्दी होती का?”.
दादा मात्र नेहमीप्रमाणेच ‘गतिमान सरकार, वेगवान विकास’ या सरकारच्या या जाहिरातीप्रमाणे दोघांनाही बोलत होता . “मुलगा पुण्याला शिकतो आहे. मुलगी इथेच शिकते. शाळेला जाण्यासाठी तयार होते आहे. तीही पुढच्या वर्षी पुण्याला जाणार आहे. शाळा खूप उत्तम आहे बर का, मुलं आपल्यापासून दूर राहिले की स्वालंबी बनतात. नाहीतर घरात टीव्ही, मोबाईल आणि चिडचिड हे सगळं त्यांचं चालतं. आता तो खूप शांत झाला आहे. अनेक नव्या-नव्या गोष्टी तो आम्हालाच सांगतो . महिन्यातून एकदा आम्ही भेटायला जातो..”
दादांनं माझा परिचय करून दिला. मी तुटक- तुटक बोलत होतो. माझं सारं लक्ष ताई आणि सरांच्या बोलण्याकडे होतं, आणि नजर मात्र विश्वास न बसणाऱ्या साऱ्या घरांवर भिरभिरत होती. किती हा साधेपणा? बोलण्या- वागण्यात ,राहण्यात आणि घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या वस्तू- वस्तूतला. खरोखरच प्र.ई.च्या वारसाला शोभावा तसाच. खरंच इतक्या मोठ्या महानगरात राहणारे आणि नामांकित हॉस्पिटलमध्ये नामांकित डॉक्टर म्हणून काम करणारे हे दोघेही किती साधेपणाने जगतात. हे मी लिहून ठेवलं तरी वाचकांना विश्वास बसेल ,की नाही यावर मलाच शंका वाटते. भल्या- भल्यांना वाटेल की,” आजकाल लेखकं असं काहीतरी लिहितात, आणि वाचकांच्या भावनेला हात घालतात, असं कुठे असतं का? ‘उशाला तळंन,घशाला कोरड’. खरंच आहे शहरातच काय, आजकाल गाव-खेड्यातही इतकं साधेपणानं कोणीच जगत नाही अगदी टिनपत्राच्या घरात सुद्धा टीव्ही, फ्रिज ,झोपायला बेड-गादी, बसायला सोपासेट, खुर्च्या आणि अनेक वस्तूंचा झगमगट घरात दिसतो, पण या घरात मला यातलं काहीच दिसलं नाही. हॉल, किचन, बेड असं काहीसं होतं पण या रिकाम्याच खोल्या असाव्यात असंच होतं .त्यात कुठेच भौतिक वस्तूंचा जंजाळ दिसत नव्हता. जे होतं ते अंथरून- पांघरून जाग- जागी लावून ठेवलेलं सहज साधं आणि नीटनेटकं .एक साधा तीन माणसं बसतील इतकाच जुना दिवाण हॉलमध्ये कडेला ठेवला होता. तीन-चार खुर्च्या बाकी पूर्ण हॉलभर मोठी सतरंजी पसरलेली होती. इतका साधेपणा घरभर पसरलेला होता.
ताई आणि सरांची ड्युटीवर जान्याची लगबग चालू होती. चहा-नाष्टा आम्ही सर्वांनी एकत्र घेतला.. “आराम करा. जेवण तयार आहे, आंघोळी करून जेवण घ्या. बाहेर फिरायला जाणार असाल, तर चावी समोर द्या आणि दुपारी बरोबर दोनला परत या आम्ही येतो. दुपारचं जेवण घरीच करूयात. नॉनव्हेज करते ” म्हणत ताई घराबाहेर पडली सरही घराबाहेर पडले. जाताना मात्र कोठे काय ठेवलेलं आहे, ते सारं सांगून गेले.
आम्ही तयार होऊन बाहेर पडलो .गेटवे ऑफ इंडिया परिसर फिरून आलो .तोपर्यंत ताई-सर दोघेही घरी आले होते. दुपारच्या वेळी दादानं सुनील तांबे या गझलकार मित्राला घरीच बोलावला होतं, सारे एकत्र जमलो पुन्हा घर गजबजून गेलं होतं. आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या, तेव्हा ताईनं जेवणाची जमावा-जमव सुरू केली .हॉलमध्ये ताटं लागली. आम्ही सारे गोल अंगत-पंगत करून बसलो. कसलाच संकोच वा कमीपणा नाही. सर- ताई, त्यांची मुलगी आणि आम्ही तिघं एकाच कुटुंबातले आहोत, इतकं सहज दुरडीतल्या कापडातली भाकर घेऊन खात होतो. साहित्य-कला-राजकारण आणि कोरोना किती तरी, भरभरून गप्पा चालू होत्या. अनेक वर्षांचा ऋणानुबंध आमच्यात आहे असंच मला वाटत होतं . काळ्या तिखटातला चिकन-रस्सा ,भाकरी चवीनं मी खात होतो. ताई भरभरून वाढत होत्या. आग्रह करत होत्या मला तर माझ्या ‘माय’ची आठवण झाली.’ माय’चं समोर बसून वाढणं, प्रत्येकाच्या ताटाकडे लक्ष ठेवणं हे सारं गावातच होतं नगरात शक्यच नाही हा माझा गैरसमज धुळीला मिळाला आणि आमचे जेवणं झाली. पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा सुरू झाला .मी घरात भिंतीवर असलेला प्र.ईं चा ब्लॅक अँड व्हाईट फोटो नेहाळून पाहिला. कोणीतरी मध्येच प्र.ई.ची आठवण काढली, आणि मीही बोलता झालो .”खरंच आहे सरांच्या आठवणी आजही साऱ्या मराठवाड्यात दररोज निघतात. आम्ही तर वर्गात शिकताना आणि शिकवताना आजही सरांच्या आठवणी काढतो. शिकताना कितीही संकटं आले, वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला, तरीही हिमतीने लढलं पाहिजे. हे आम्हाला सरांनी शिकवलं. परिस्थितीच्या उन्हात भाजल्याशिवाय सुखाची हिरवळ जीवनात अनुभवता येते नाही, हा अनुभव आम्ही सरांच्या लेखनातून घेतला.सर शेवटपर्यंत जसे होते तसेच राहिले. मोठ्या नगरात, कॉलेजमध्ये प्रोफेसर झाले म्हणून व सुखासीन जीवन जगणे शक्य होते, म्हणून ते बदलले नाहीत .त्यांच्या वागण्या- बोलण्यात आणि वावरण्यात कसलाच फरक पडला नाही. आजही लोक त्यांना ‘संतत्व पावलेला सज्जन माणूस’ असेच म्हणतात. माझ्या बोलण्याने वातावरण गंभीर होत होतं तेव्हा दादानं विषय बदलून देशातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू केली. आणि पाहता-पाहता चर्चेने मूड बदलला कविता- गझल रंगात आली.
मैफिल चांगलीच रंगात आली होती . गझलकार आपलं काम ,कौटुंबिक दर्द, आणि गजलेचे खुमासदार प्रसंग सांगत- सांगत,” सुखाच्या राजदरबारी, जिते मरणे नको मजला..”ही दर्दभरी गझल सादर होता . पुन्हा -पुन्हा फर्माईश हात होती तो सादर करत होता .घरातली सर्व मंडळी गोल बसून या गजलांचा आनंद घेत होती ताई व्हायरलनं फणफणत होत्या, तरीही त्या आमच्यापासून शेवटपर्यंत दूर गेल्या नाहीत. उलट त्यांची मध्ये-मध्ये कॉफी-चहाची विचाणा चालूच होती. किती साधं, मनमोकळे, मनाला भावणारं कुटुंब असतं त्याचा उत्तम नमुना मला पाहायला मिळला. ‘सुखाच्या राजदरबारी, जिते मरणे नको मजला… ‘खरोखरच प्र.ईं. च्या घरातल्या वातावरणाला आणि एकूणच जीवन जगण्याच्या वारसांच्या शैलीला शोभणारी ही गझल माझ्या मनात कायमच खोल रुतून बसली. आपण प्राध्यापक आहोत, आपणही सुखाशिन जगलं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं दिसलं-वागलं पाहिजे .अशा अविर्भावात आपण राहतो. पण आपण कुठून आलो आहोत?, आपल्याला काय करायचं आहे?, आणि कोठे जायचं आहे? ते हळुवार विसरत जातो. बेगडी बनत जातो. अशा या स्टेजवरती माझं जगणं चालू असताना या प्रसंगाने मला पुन्हा जमिनीवर आणलं. आणि कितीही सुखी-समाधानी जगता येत असलं तरीही आपण इतरांचे दुःख नजरेत भरून त्यांच्या जीवनात सुख पेरण्याचं काम केलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्यासारखच जगलं पाहिजे .हे सहज सादं जगणं माणसं जोडण्याचं प्रमुख साधन आहे. हे माझ्या लक्षात आणून देऊन माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम या कुटुंबानं केलं.


रात्रीला आराम करून पहाटेच विमानतळावर पोहोचलो धुक्यामुळे विमान उशिरा आलं आणि आम्ही उशिराच नेपाळला पोहोचलो. पुन्हा घरी जाण्याचं ठरलं होतं, पण नेहमीप्रमाणे पुन्हा परत येताना विमान मुंबईला उशिरा पोहोचलं आणि सरळ आम्ही रेल्वे स्टेशनला गलो. घरी जाण्याचा पुन्हा योग आला नसला ,तरी त्या एका दिवसाच्या शिदोरीने मला जगण्याचा मौल्यवान ठेवा मिळाला. जमिनीवर राहण्याची शिकवण मिळाली हे मात्र नक्कीच घडलं, त्यामुळे या कुटुंबाला माझा सलाम… हे सर्व घडण्यामागे- घडवण्यामागे डॉ. पूर्णिमा ताईंचा खूप मोठा वाटा आहे हे कोणालाही नाकारता येत नाही. मला इतकी मोठी साधेपणाने जगण्याची शिदोरी ताईंनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, आणि डॉ. अश्विन सरांचा आज जन्मदिवस त्यांना लाख लाख शुभेच्छा…
प्रा. डॉ. देविदास खोडेवाड
खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई.
मो.नं. ९७६४२१०३१३.