पावसाच्या वाढत्या लहरीपणाच्या संशोधनाचं हवामान तज्ञांना आव्हान


मागील दहा वर्षांपासून पावसाच्या लहरीपणात मोठी वाढ झाल्याचे आपण पहातो आहोत. मागील दहा वर्षापूर्वी मराठवाड्यातील बीड-लातुर आणि धाराशिव हे तीन जिल्हे ड्राय झोनच्या पट्ट्यात आले आहेत आणि या तीन जिल्ह्यात आगामी काळात वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असे भाकीत हवामान आणि जलतज्ञांनी व्यक्त केले होते. मात्र अलिकडील दोन वर्षांच्या काळात या तीन जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पावूस पडतो आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी झालेल्या झापुकझुपुक पावसाने तर खरीप आणि रब्बी पिकांसह शेतकऱ्यांच्या शेतजमिनीही वाहुन नेल्या आहेत. मागील पाच दशकांत या तीन ही जिल्ह्यात एवढा पाऊस आपण पाहीला नसल्याचे बुजुर्ग शेतकरी सांगताहेत. पावसाच्या या वाढत्या लहरीपणाच्या कारणांच संशोधन करण्याचे आव्हान आता जलतज्ञांवर येवून ठेपले आहे.
यावर्षी या तीन जिल्ह्यात पावसाने कहरच केला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा बीड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यात यावर्षी सरासरी दुपटीपेक्षा ही जास्त पाऊस पडला आहे. शिवाय मे महिन्यात सुरू झालेला हा पाऊस नोव्हेंबर महिना उजाडला तरी सुरुच आहे.
मागील पन्नास वर्षात पाहिला नाही एवढा किंबहुना त्याही पेक्षा कितीतरी अधिक यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली अतिवृष्टी झाली आहे असे या पिढीतील अनेक बुजुर्ग नागरिक सांगताहेत.


एवढेच नव्हे तर अलिकडे आता पावसाने आपले स्वरुप ही बदलले आहे. अगदी चाळीस वर्षांपूर्वी पुरातन काळापासून नक्षत्राची वैशिष्ट्ये नमुद केल्याप्रमाणे पावूस पडायचा. मृग नक्षत्रात सात तारेखेला पावसाची सुरुवात व्हायची म्हणजे व्हायची. पुढे पावसाच्या मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा या आठ नक्षत्रात लिहिल्या प्रमाणे पावूस पडायचा. नंतर हस्त नक्षत्र सुरु झाले की पावूस संपायचा!
मात्र अलिकडील पंचवीस वर्षांपासून पावसाने आपले सुत्र बदलल्याचे आपण पाहिले. ७ जून रोजी सुरू होणारा पावूस जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होवून लागला. बदलत्या हवामानाचा परिणाम झाला आहे असे यावेळी जलतज्ञ सांगायचे. या पंचवीस वर्षांच्या काळात पावसाने सर्व नक्षत्रांचे अंदाज खोटे ठरवले. बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तर पावूस सतत धोके देवू लागला. कधीतरी कामापुरताच बसायचा! नदी नाले फक्त पावूस पडल्यानंतरच ओले दिसू लागले. विहिरी आणि बोअर ची स्थिती तर पाण्याचा दुरदुर संबंध नसल्यासारखीच झाली. हिरवीगार शेती बंजर होवू लागली. बीड लातूर आणि धाराशिव हे तीन जिल्हे ड्रायझोन च्या पट्ट्यात आले आहेत,आगामी काळात या तीन ही जिल्ह्यात वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असे भाकीत जलतज्ञ आणि भू अभ्यासक वर्तवू लागेले.
अलिकडील दोन वर्षांत निसर्गाने हे ही चित्र पालटले. ड्रायझोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पावूस होवू लागला. अनेक ठिकाणी ढग फुटी सदृश्य पावूस पडु लागला. एका गावाच्या शिवारात पावूस आहे, त्यांच्या लगतच्या गावात पावूस नाही.रस्त्याच्या डाव्या बाजूला पावूस आहे उजव्या बाजूला पावूस नाही अशी स्थिती निर्माण झाली. पावसाचा हा लहरीपणा सतत वाढत जावून लागल्याचे आपण पाहीले.
पावसाचा लहरीपणा सतत वाढतच चाललला असल्याचे आपण पहातो आहोत. पुर्वी तीन तीन दिवस संततधार कोसळणारा पाऊस तर जवळपास गायबच झाल्यात जमा आहे. आता पाऊस पुर्वी सारखा पडतच नाही, पडला तर एकाच ठिकाणी आणि तो ही जोराचा पडतो, त्यात नियमितता, सातत्य राहिलेच नाही अशा चर्चा अलिकडे महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात ऐकावयास मिळत आहे. किती तथ्य आहे या चर्चेत? पाऊसाचा लहरीपणा खरचं वाढलाय का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहेत.
अलिकडील काही वर्षांत व या वर्षी ही राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याच्या, अतिवृष्टीमुळे महापुर आल्याच्या, नदी नाल्यांचे प्रवाह बदलुन शेत पीकांचे नव्हे तर शेत जमिनीच वाहुन गेल्याची अनेक प्रकरणे आपण पाहीली. अशा पध्दतीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या अनेक घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याचे पाहतो. एकीकडे या घटना घडत असतांनाच राज्यातील अनेक भागात पावसाचा एक टिपूस ही न पडल्याचे अनेक तालुके पहातो. एका विभागात पावसामुळे नदी, नाले, विहिरी तुडुंब भरल्याचे चित्र तर दुसरीकडे पावसाअभावी पीके वाळत चालल्याचे चित्र आपल्याला अनेक वेळा पहावयास मिळते. हे सर्व पावसाच्या लहरीपणा मुळेच घडते. पावसाचा हा लहरीपणा का वाढला आहे हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. पावसाच्या या लहरीपणाचा कारणमिमांसा आपण समजावून घेतल्या पाहिजेत.
फार मागे नाही सात-आठ वर्षांपूर्वी… २०१७ साली जुलै महिन्यात मुंबई महानगर पाण्यामध्ये बुडलेलं असतांनाच राज्यातील अनेक गावे पावसाची वाट पहात उभी होती. पुणे, मुंबई, कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस धो धो कोसळत असताना मराठवाड्याच्या वाटेला मात्र फक्त पाणी घेवून वाहुन जाणारी ढग पाहण्याचेच नशीबी आले होते. पावसाचा हा लहरीपणा का? कधी बराच काळ पाऊसच नाही तर कधी एका रात्रीतच धो धो पाऊस ! पाणीच पाणी! असे का?
पावसाचा हा लहरीपणा अलिकडेच वाढलाय का? तर नाही. तसं असतं तर पावसाचा लहरीपणा सांगणा-या “हाकंव पेंडी आन बोंबंव खंडी” अशा ग्रामीण म्हणी शंभर वर्षांपूर्वी तयारच झाल्या नसत्या.


पावसाचे अभ्यासक या संदर्भात काय म्हणतात ते पाहणं ही महत्त्वाच आहे. “पावसाचं एकुण प्रमाण पाहिलं तर गेल्या १००-१२५ वर्षात त्यात काही बदल झाला आहे, असे दिसत नाही. थोडा फार बदल झाला, पण तो हवामानात होणा-या नैसर्गिक चढ उतारावर किंवा पावसाच्या नोंदी घेण्यात आल्या त्या त्रुटींवर दाखवावा लागेल. मुंबई, महाबळेश्वर, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भ यांच्या पर्जन्यमानात गेल्या १०० वर्षात फारसा बदल झाला नाही. यावर तज्ञांचा भरपुर अभ्यास झाला आहे. अनेक तज्ञांनी या संदर्भात वेगवेगळी आकडेमोड देखील केली आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटते? याला फारसा अर्थ राहत नाही.” असे पावसाचे अभ्यासक सांगतात.
अर्थात पावसाचा लहरीपणा वाढलाय आहे हे म्हणणं अगदीच चुकीचे आहे असे अजिबात नाही. एका बाजूने पावसाचे अभ्यासक हे म्हणणे खोटं ठरवत असले तरी पावसाची आकडेवारी वेगळ्या पद्धतीने मांडली की, पावसाचा लहरीपणा वाढलाय हे म्हणणे एकदम खरे ठरतेय. पावूस पडण्याचं चार महिन्यातील प्रमाण कसं आहे याचा अभ्यास केला की पावसाचा लहरीपणा वाढलाय हे म्हणणे खरे वाटतेय. मागील दहा वर्षात पावसाचं वितरण असमान झाले आहे. म्हणजे पावूस पुर्वी सारखा सतत अधुन मधुन न पडता आता तो थोड्याच वेळात जास्तीचा पाऊस पडतो आहे. म्हणजे पुर्वीसारखा संतत धार न बरसता तो एकदाच धोधो बरसून अचानक गायब होवून जातो आहे. पावूस कमी कालावधीत पडतो, पण सरासरी पेक्षा अधिक पडतो! असे चित्र आहे.


अशा पावसामुळे शासकीय कागदावरील आकडेवारी बरोबर दिसते, मात्र प्रत्यक्षात त्यांचे परिणाम बरोबर दिसत नाहीत. पावसाच्या या लहरीपणामुळे मग कधी पावसा अभावी पीके वाळलेली पहावयास मिळतात तर कधी जास्तीचा पावूस पडल्यामुळे पीके पाण्याखाली गेलेली पहावयास मिळतात !
मागील दहा बारा वर्षांच्या कालावधीत पावसाकडे वस्तुनिष्ठपणे पाहीले तर पावसाच्या लहरीपणात बदल झालेला निश्चित पणे आपणास दिसेल. या संदर्भात भारतीय उष्ण प्रदेशीय हवामान शास्त्र संस्था (आय आय टी एम) आणि भारतीय हवामान विभाग (आय एम डी) यांनी पावसाच्या लहरीपणा संदर्भात केलेल्या अभ्यासाचा संदर्भ पाहिला तर त्यांनी “अलिकडे मान्सून ची सुरुवात वेळेवर होते, पण त्यानंतर सातत्याने पडणाऱ्या पावसात आता मोठे खंड पडू लागले आहेत” असे सुचक मत व्यक्त केले आहे. पावसाच्या लहरीपणाचा विचार करतांना आणि हवामानाचा विचार मांडताना एक विशिष्ट मर्यादा लक्षात घ्यायला हवी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ती मर्यादा आहे. कालखंडाची ! “टाइमस्केल” असं सुटसुटीत नांव या मर्यादला आहे ! सामान्यतः आपण माणूस म्हणून या संदर्भात आपलं मत व्यक्त करताना माणसाच्या कालखंडाचा ह्युमन टाइमस्केलचा विचार करतो. त्यामुळे मागील दहावीस वर्षात पावसाच्या लहरीपणात काय बदल झाले यावर आपली गणितं आपण ठरवतो ! पण पावसाच्या लहरीपणाचं, हवामानाचं टाइमस्केल किमान काही शतकांच आहे. तिथं आपला दहा वीस वर्षांचा अनुभव फारच तुटका ठरतो. म्हणूनच पावसाच्या लहरीपणा बाबत, हवामानाच्या बाबतीत आपल्या तोकड्या अनुभवांवर काही बोलायला गेलं तर आपला अंदाज सपशेल चुकीचा ठरतो. अलिकडेच जन्माला आलेल्या हवामान तज्ञांचे अंदाज याचमुळे चुकीचे ठरते असावेत !
हवामानातील होणारे बदल नाकारता येणारे नाहीतच. म्हणून पावसाच्या लहरीपणा बाबतचे बदल हवामानाच्या माथी मारता येणार नाहीत. या लहान मोठ्या बदलाची कारणं, पावसाच्या या लहरीपणाची कारणं निश्चितपणे शोधण्याचे आव्हान अभ्यासकांसमोर आहे.