‘द वायर’ या वृत्तसेवा संस्थेच्या कार्यालयावरील छापेमारी अस्वस्थ करणारी व चिंताजनक


‘द वायर’ या वृत्तलेख संकेतस्थळाचे (पोर्टल) कार्यालय आणि संपादकीय विभागावर दिल्ली पोलिसांनी टाकलेल्या छापे, ही चिंताजनक व अस्वस्थ करणारे आहे. तसेच पोलिसांनी ‘द वायर’च्या संपादकांच्या घरांवरही छापे टाकून तेथे घेतलेली झडती व जप्तीची पद्धत अनावश्यक असल्याचे ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संपादकांच्या संघटनेने नमूद केले. भाजप नेते अमित मालवीय यांनी ‘द वायर’ विरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली होती.
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया या संपादकांच्या संघटनेतर्फे प्रसृत निवेदनात म्हटले आहे की, ज्या पद्धतीने पोलिसांनी अगदी घाईघाईत ‘द वायर’शी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकले ते चौकटीबाहेरचे व अयोग्य होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींची वस्तुनिष्ठ व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आवाहन करून संघटनेने म्हटले आहे की, अशी कारवाई करताना लोकशाही मूल्यांचा अवमान करून दडपशाहीचे डावपेच खेळू नका, असे आवाहन या संघटनेने केले आहे.
‘द वायर’च्या निवेदनातील माहितीनुसार पोलिसांनी या संस्थेच्या पत्रकारांच्या घरातून व कार्यालयातून दूरध्वनी, संगणक, ‘आय पॅड’ जप्त केले. तसेच संबंधितांनी या जप्त केलेल्या उपकरणांचा तपशील देण्याची व ते परत देण्याची केलेली विनंती मान्य करण्यात आली नाही. तपास प्रक्रियेच्या नियमांचे हे गंभीर उल्लंघन आहे, असे एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया या संपादकांच्या संघटनेने नमूद केले आहे.