झाडी बोली भाषेला उच्चस्थन प्राप्त करून देणारे नाटक: “झाडपी माणसं”


साहित्य हे संवेदनशील मनाचा अविष्कार असते. श्री गणपती रामदास वडपल्लीवार संवेदनशिल मनाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे समाजात घडणान्या चांगल्या वाईट घटनांचा प्रभाव त्यांच्या मनावर होतो. त्याचा परिणाम त्यांच्या साहित्यावर जाणवतो. त्यामुळे त्यांच्या साहित्यात समकालीन परिस्थितीचे प्रतिबिंब दिसते. असे म्हणतात की, प्रत्येक कला ही त्या काळाच अपत्य असते. प्रत्येक कलाकृतीच्या निर्मितीत स्थळ, काळ व आजुबाजुची परिस्थिती फार महत्त्वाची भुमीका बजावत असते. त्याचप्रमाणे श्री गणपती रामदास वडपल्लीवार यांचे साहित्य सुद्धा त्यांच्या परिस्थितीची उपज आहे.
विदर्भाला समृद्धनाटय परंपरा लाभली आहे. विदर्भात नाटककारांची नाटय रसीकांची आणि रंगकर्मीची वाण नाही. विदर्भातील नाटयचळवळ बालरंगभूमी, झाडीपट्टी रंगभूमी, पथनाटय, दलित रंगभूमी संगीत नाटक अशा बहू आयामानी विकसीत होते आहे. विदर्भातील अनेक नाटय–उपक्रम वैदर्भीय नाटयचळवळीला चालना देणारे ठरले. सुविख्यात कवी व नाटककार कालीदास यांचे वास्तव्य काही काळ विदर्भात होते. सुविख्यात संशोधक वि. वा मिराशी यांच्या मते भवभुती हा विदर्भातील भंडरा जिल्हयातील पद्मपूरचा होता.
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर गडचीरोली, भंडारा आणि गोदिया या चार जिल्हयाच्या प्रदेशास पूर्व विदर्भ असे संबोधले जाते. हा प्रदेश झाडे-झुडपे व घनदाट अरण्ये यांनी संपन्न असल्याने ‘झाडीपट्टी’ असेही या प्रदेशास संबोधले जाते. तसा प्राचीन मराठी वाङ् मयात या भूभागाचा उल्लेख झाडीमंडळ’ असा वारंवार येतो. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला असलेला हा भुप्रदेश आपल्या अनेक वैशिष्ट्यासह स्वतःची वेगळी बोली राखुन आहे. या बोलीला झाडीबोली’ असे संबोधण्यात येते. झाडीबोलीही प्रमाण मराठीची बोली असली तरी अनेक बाबतीत तिच्यात मराठीहून भिन्नता आढळून येते. झाडीबोलीवर असलेल्या हिंदी भाषेच्या प्रभावाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे हिंदीप्रमाणेच झाडीबोली देखील नपुसकलिंग नाही. विशेषणाच्या बाबतीत झाडीबोलीची स्वतःची लकब दिसुन येते. प्रमाण मराठीपेक्षा झाडीबोलीने आपली वेगळी उभयान्वयी अव्यये वापरलेली आढळुन येतात. प्रमाण मराठी व झाडीबोली यांच्या संदर्भात काही शब्दश्लेष संभवतात. झाडीबोलीत कियाविशेषणाचे अपार भंडार असून त्यात शब्दाचे आधिक्य आहे. मराठीतील आद्यग्रंथ ‘विवेकसिंधू’ यातील अनेक अपरिचीत शब्द आजही झाडीपट्टीतील ग्रामीणांच्या मुखतः नित्य वापरात असतात. लिळाचरित्र’ या मराठीच्या आधा गद्य ग्रंथात चक्रधरांना आवडली असलेली ‘भेली’ ही गूळ या अर्थाने आजही येथे वापरली जाते. ज्ञानेश्वरीतील ‘सुरवाड’ हा शब्द आजही सासरी जाणाऱ्या आपल्या लेकीला निरोप देणच्या मातेच्या तोंडात सुकासुरवाड’ असा ऐकायला मिळतो. अशाप्रकारे ही झाडीबोली विद्वानांनाही न कळणारे आणि केवळ शब्दकोशाच्यातुरूंगात डांबून ठेवलेले जुन्या मराठी ग्रंथातील अनेक शब्द आजही आपल्या दैनंदिन वापरात आणतांना दिसते.
झाडीपट्टीतील लोक कलाप्रेमी आहेत. त्यातही नाटक आणि संगीत नाटक हे तर त्यांच्या रक्तातच असावे, इतके स्वाभाविक आहे. गावागावातील अनेक कुटुंबात दैनंदिन कामकाजाबरोबरच वर्षभरात नाटयनिर्मीतीत लोक गुंतलेले असतात ही नाटय संस्था झाडीपट्टीतील सामुहिक कलेचा अविष्कार करणारी सामाजिक संस्थान आहे. या संस्थेत गावातील सामान्यातील सामान्य स्त्री-पुरुष, आबाल-वृद्धांचा निर्मातीपासून आस्वादापर्यंत सहभाग असतो. या अर्थाने झाडीपट्टीतील रंगभूमी ही एक लोकचळवळ आहे. झाडीपट्टी येथील लोकरंगभूमी जशी वैशिष्टयपूर्ण आहे. तशीच ती रंगभूमी स्वतःचे वेगळे स्थान टिकवून आहे. झाडीपट्टीतील रंगभूमीवरची नाटके म्हणजे लोकनाटयाचा प्रकार नव्हे किंवा शहरी व्यावसायिक नाटकेही नव्हेत. या रंगभूमीला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या दृष्टीने हे केवळ मनोरंजन नव्हे तर गावाची अस्मीता, सांस्कृतिक समृद्धी आणि अभिरुचीसंपन्न जीवनशैलीचा प्रत्यय असतो. या सर्वांतून एक वैशिष्टयपूर्ण रंगभूमी निर्माण झाली. याच रंगभूमीला ‘झाडीपट्टी रंगभूमी’ असे नाव देता येईल. झाडीपट्टीची रंगभूमी ही कला आणि संस्कृतीच्या संदर्भात स्वतःचे आगळे वेगळे असतीत्व निर्माण करणारी पूर्व विदर्भातील ग्रामीण जनतेची एक चळवळ आहे. रंजन व कलाविष्कार या प्रेरणेतून ही चळवळ लोकमानसात उत्क्रांत झाली आहे.


श्री गणपती रामदास वडपल्लीवार यांनी झाडीबोली भाषेत ‘झाडपी माणसं’ हे नाटक लिहून आदीवासी लोकांचे जीवन माडले आहे. अशिक्षित, बाहेरून आलेल्या माणसांनी अज्ञानी अशा झाडपी माणसाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या जीवनाची कशी धुळधान केली याचे वास्तववादी चित्रण या नाटकात समाविष्ट आहे. आदीवासी जिल्ह्यातील झाडपी बोली भाषेत हे नाटक लिहीले आहे. साध्या भोळ्या श्रद्धाळू घरंदाज पाटलांचा बाहेरून आलेल्या पोटभरू समाज कंटकानी कसा गैरफायदा घेतला. त्यांच्या जीवनाची कशी वाताहात केली. याचे वास्तववादी चित्र नाटककारांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याकरीता नाटकात त्यांनी रेखाटलेले प्रसंग झाडीपट्टीतील जीवन दर्शन प्रेक्षकांना दाखविण्यात यशस्वी झाले आहे. झाडपी माणस हे नाटक झाडीपट्टीतील झाडपी माणसांच्या लोक जीवनाचे प्रतिनिधत्व करणारे आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानीक म्हणी वारंवार पात्रांच्या तोंडात येतात त्यावरून त्या भाषेची समृद्धता कळण्यास मदत होते. झाडीपट्टीचे लोक रिवाज, नक्षलवाद, दारूच्या व्यसनाने झालेली अधोगती यांचे सादरीकरण, रेखाटलेले खटकेबाज संवाद, झाडीपट्टीतील लोकगीते, पाटीलकीच्या मोठेपणात विविधपदावर असणारा येथील पाटील याचे जीवंत चित्रण तसेच झाडपी बोलीभाषेत निर्माण झालेले विनोद हे नाटक उत्तम प्रायोगिक असल्याचे सिद्ध करते.अस्सल झाडपी भाषेत बोलणारा झिंगरू पाटील तसेच पाटलाचा घरगडी महागू. तसेच पाटलाची उच्च शिक्षित सून आरती व शंकर समर्थ गुरुजी या पात्रांच्या माध्यमातून झाडीपट्टीतील परंपरागत लोकजीवन व आधुनिकीकरणानंतर या भागावर त्याचा झालेला प्रभाव या दोन्ही गोष्टी लेखकाने येथे दाखण्याचा प्रयत्न केला आहे. झाडीपट्टीतील लोकजीवनातील स्त्रीयांच्या बदलत्या जीवन पद्धतीचे चित्रण फार हुबेहूब रेखटण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. पाटलाची उच्च शिक्षित सून आरती तसेच हमीदा नावाची नृत्यांगणा मोलकरीण तानी नकली गाव देवी असलेली गोदाबाई या सर्व पात्रांच्या माध्यमातून लेखकाने आपला संदेश देण्याचे कौशल्य चांगल्याप्रकारे प्रकट केले आहे. हा त्यांच्या जवळ असलेल्या सृजनशीलतेचा परिचय आहे. त्यांचे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची भूमिका लेखकाने पार पाडली आणि ती विशेष लक्षनिय आहे. लेखकाने या नाटकाच्या माध्यमातून झाडीबोली भाषेचा कसदारपणा सिद्ध केला आहे. तसेच या बोली भाषेची शब्द समृद्धी या नाटकाच्या वाचनानंतर लक्षात येते. ‘बोली वाचवा, मराठी वाचवा बोली वाचवा, भाषा वाचवा’ या वाक्यानुसार या उपेक्षित पण, सशक्त बोली भाषेतील हे नाटक झाडीबोली भाषेला उच्चस्थन प्राप्त करण्याच्या प्रवासात निश्चीत मदत करेल.
साहित्यक्षेत्रातील आपल्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा !


प्रा. डॉ. अनंत मरकाळे, अंबाजोगाई
प्रा. डॉ. अनंत दादाराव मरकाळे हे अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. इतिहास विषयाचे अध्यापन करीत असतांनाही मराठी साहित्याशी त्यांनी आपला जवळचा संबंध ठेवला आहे. इतिहास विषयातील लेखनासोबतच मराठी साहित्याशी निगडीत असलेल्या विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. मो. नं. ९६२३७३९८३७ markaleanant@gmail.com