जगणं नात्यांमुळेच सुंदर होतं त्यामुळे नाती जपा; गणेश शिंदे यांचे आवाहन


जगणं हे नात्यांमुळेच सुंदर होतं त्या मुळे नाती जपा असे भावनिक आवाहन प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
लोकनेत्या डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय व्याख्यान मालेतील “स्त्री जन्मा तुझी कहाणी” या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना गणेश शिंदे यांनी हे भावनिक आवाहन केले.
आई नंतर मनस्वी प्रेम करणारी व्यक्ती “ताई”!
आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभीच गणेश शिंदे म्हणाले की, जगातील सर्वात सुंदर नाते हे आईचे नाते आहे. जगाच्या पाठीवर आई ही एकच व्यक्ती अशी आहे की ती आपल्या मुलांवर नितांत प्रेम करते. आई नंतर ताई हीच आपल्या भावंडावर निस्सीम प्रेम करते. आजपर्यंत आपण अनेक आई महोत्सव पाहीले, मात्र ताई च्या आठवणी जागृत करणारा हा पहिला महोत्सव आपण पहातो आहोत. आणि या अशा आगळ्यावेगळ्या महोत्सवाला मला उपस्थित रहातात आला याचा मनस्वी आनंद आहे.
मावशी, काका, आत्या ही नाती पाहणारी शेवटची पिढी!


आपल्या व्याख्यानात गणेश शिंदे यांनी आपल्या अनोख्या आणि रसाळ शैलीत मानवी नात्यातील गुंतागुंतीतुन जीवनात आनंद कसा मिळवायचा यांची उकल केली. ते म्हणाले की, नात्यांमुळेच जगणं सुंदर,सुसाह्य होतं. आज सभागृहात माझ्या वयाची उपस्थित असलेली पिढी ही मावशी आणि काका पाहणारी ही शेवटची पिढी आहे. ज्या गोष्टी आपण आपल्या वडिलांना सांगु शकत नाही, त्या गोष्टी आपण काकांना सहजपणे आणि तेवढ्याच हट्टाने सांगू शकत होतो, असे आमच्या पिढीचे बालपण होते. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. शेताच्या बांधावरुन, प्लॉटच्या, संपत्तीच्या वाटणीवरुन घराघरात भांडणं सुरु असल्याचे आपण पहातो आहोत, मी माझ्या भावाच्या घरी दहा वर्षे झाले पाय ठेवला नाही, त्याला बोललो नाही असे ठाम पंचे सांगणारे अनेक महाभाग आपल्याला पदोपदी आढळतात. हे सगळं अस्वस्थ करणारे दुःख देणारे आहे.
नात्यांमुळेच जगणं सुसह्य,सुंदर होतं!
आपल्या नात्यातील माणसं जो पर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना प्रेम द्दा. आपला श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपल्या नात्यातील कटु विषया संपवा. श्वास आहे तो पर्यंत आपल्या नात्यातील प्रत्येक माणसांना आपला मायेचा स्पर्श द्दा, त्यांचा मायेचा स्पर्श घ्या. लक्षात ठेवा एकदा स्पर्श संपला की नाती संपली.
जीवन जगण्याची दिशा स्पष्ट झाली की आनंद!
आपल्याला आपल्या जीवनाची दिशा एकदा निश्चित स्पष्ट करावी लागेल. जीवन जगण्याची आपली दिशा एकदा निश्चित झाली की तुमचं जगणं सुसाह्य, आनंदी होईल. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी जगायचंय की आनंदी रहातो आहोत हे दाखवण्यासाठी जगायचंय हे स्पष्ट झाले पाहिजे. खरं तर आनंद ही आपल्या हातात राहीला नाही आणि दुःख ही आपल्या हातात राहिलेलं नाही. आनंद ही आपल्या अंतर्मनातील प्रसन्न अवस्था आहे. आनंद आपल्या अंतर्मनातच आहे. एकदा आपल्या अंतर्मनात डोकावून पहा, आनंद तुम्हाला सापडेल. खरं तर माणसाचा मी पणा गेला की त्याला आनंद मिळतो. पण आपण आपला मिळताच सोडायला तयार नसतो.
दुखा:च मुळ कारण आपल्या अहंकारातच


दुःखाचं मुळ कारण आपल्या अहंकारात आहे. जिथं आपल्या अहंकाराला सुरुवात होते तिथंच दुःखा ला सुरुवात होते.अहंकार रावणाकडे होता, त्यामुळेच त्यांचा नाश झाला. अहंकार आपल्यातुन निघुन गेला की, आनंदाला सुरुवात होते. तेंव्हा वर्तमान तुमच्या हातात आहे. आपला वर्तमान आनंदात घालवायचा की दुःखात घालवायचा हे ही तुमच्या हातात आहे. वर्तमानाचा आनंद घ्या. तो घेण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.
डोळ्यात जोपर्यंत प्रेम जिवंत आहे तोपर्यंतच माणुसपण जिवंत!


तुमच्या डोळ्यातील प्रेम जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच माणुसपण जिवंत आहे. त्यामुळे एकमेकांना जपा. घरातल्या माणसांना जपा, घरातल्या माणसांच तेवत रहाणं जपा. एकदा माणुस गेला की गाडी भेटी नाही, प्रेम नाही आणि स्पर्श ही नाही. नंतर केवळ आठवणी आहेत. त्यामुळे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसं जपा.
हे जगणं, माणसं जपणं हे खुप सोपं आहे. चांगले जीवन जगण्यासाठी तुम्हाला हवा तेवढा पैसा कमवा. पण पैसा कममवतांना एक लक्षात ठेवा. पैसा नेहमी चांगल्या मार्गानेच कमवा. गेली मार्गाने कमावलेला पैसा हा मढ्यावरील अंथरलेल्या सुंदर फुलासारखा असतो! धड हात ही लावता येत नाही आणि वाहता ही येत नाही. तेंव्हा आनंदी जगायचं असेल तर फक्त ज्ञानदेवांनी पसायदानात सांगितल्या प्रमाणे जीवन जगा. दिवसातून एकदातरी शांतचित्ताने पसायदान म्हणा. ज्ञानदेवांनी सांगितलेले पसायदान समजावून घेण्याचा प्रयत्न करा, पसायदान ज्या दिवशी तुम्हाला समजेल, त्या दिवसापासून तुमच्या आनंदी जीवनाला सुरुवात होईल असा आशावाद त्यांनी आपल्या व्याख्यानातुन व्यक्त केला.


प्रारंभी गणेश शिंदे यांचा परिचय प्रकाश बोरगांवकर यांनी करुन दिला. नगर परिषदेच्या आद्दकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानास रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.