छोटा हत्तीखाना लेणी जतन व दुरुस्तीसाठी १ कोटी ८३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर


आ. नमिता मुंदडा यांचे विशेष प्रयत्न
अंबाजोगाई शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक भावनांशी जोडल्या गेलेल्या छोटा हत्तीखाना लेणी स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने १ कोटी ८३ लक्ष १८ हजार ९५६ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या संदर्भात शासन निर्णय क्र. स्मारक-२०२४/प्र.क्र.२६/सां.का.३ दि. ९ फेब्रुवारी २०२४ अन्वये हे आदेश काढण्यात आले आहेत. या शासन निर्णयात पुढे असे म्हटले आहे की, मराठवाडा प्रलंबित विकास कामाबाबत राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक छत्रपती संभाजीनगर येथे दि.१६.०९.२०२३ रोजी पार पडली होती. त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये मराठवाडा विभागातील ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन करण्याचा समावेश करण्यात आला असून विशेषतः अंबाजोगाई येथील प्राचीन वास्तुस्थळाचा विकास करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अंबाजोगाई येथील छोटा हत्तीखाना लेणी या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरस्ती कामाचे परिचय आर्किटेक्टस्, अंबाजोगाई यांनी तयार केलेले सविस्तर अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरीता संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांनी सादर केले आहे. त्यानुसार छोटा हत्तीखाना लेणी अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
सदरील प्रस्तावानुसार सभामंडप लेणी छोटा हत्तीखाना लेणी अंबाजोगाई, जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या रु.१,८३,१८,९५६/- (अक्षरी एक कोटी त्र्याऐंशी लक्ष अठरा हजार नऊशे छप्पन मात्र) (वस्तु व सेवाकरासह) या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
सदर निधी मागणी क्र. झेडडी-०२, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, २२०५ कला व संस्कृती (००) १०३, पुरातत्वशास्त्र, (०१) (०६) राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे किल्ले व धार्मिक स्थळे यांची जपणूक संरक्षण (कार्यक्रम) (२२०५ १३०२) २७ लहान बांधकामे या लेखाशिर्षातील त्या त्या आर्थिक वर्षातील मंजूर अनुदानातून उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा असे म्हटले आहे.
तसेच संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास संबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच सदर काम हे पुरातत्वीय निकषानुसार/मानकानुसार पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय व संबंधित संवर्धन वास्तुविशारद यांची राहील. असे या आदेशात म्हटले आहे.
हा शासन निर्णय वित्त विभाग, शासन निर्णय क्र. विअप्र -२०१३/ प्र.क्र.३०/ २०१३/ विनियम, भाग २, दिनांक १७ एप्रिल, २०१५, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग पहिला, उपविभाग तीन मधील अनुक्रमांक ६ मधील परिच्छेद क्र. २७(२) “अ” नुसार तसेच वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२ एप्रिल, २०२३ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकाराच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.
सदरील शासन निर्णय हा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निगर्मित करण्यात आला असून या आदेशावर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचीव नंदा मारोती राऊत यांची स्वाक्षरी आहे.
आ. नमिता अक्षय मुंदडा यांचे विशेष प्रयत्न


अंबाजोगाई शहराच्या धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरेशी जोडल्या गेलेल्या या छोटा हत्ती खाना लेणी जतन व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आ. नमिता मुंदडा या स्वतः एक आर्किटेक्ट असून केज विधानसभा मतदारसंघातील पुरातत्व काळातील वास्तु आणि मंदिरे जतन करून त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. याच माध्यमातून त्यांनी अंबाजोगाई शहरात असलेल्या संकलेश्वर मंदीर, भुचरनाथ मंदिर, आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी, जोगाई सभामंडप इतर धार्मिक स्थळांच्या जतन व दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करुन घेतला आहे. आता छोटा हत्ती खाना लेणी जतन व दुरुस्ती साठी १ कोटी ८३ लक्ष रुपयांचा विशेष राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडुन मंजूर करुन घेतला आहे. एवढेच नव्हे तर हे काम सुरु करण्यासाठीची निविदा प्रक्रिया ही सुरु केली आहे.
छोटा हत्तीखाना लेणी चे धार्मिक महत्त्व
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या छोटा हत्तीखाना लेण्यांना विशेष महत्त्व आहे. या छोट्या हत्तीखान्यात जैन लेणी आढळून येतात. या हत्तीखान्यात कोरण्यात आलेल्या नागदंपत्ती, महावीर पार्श्वनाथ, वृक्षभनाथ व त्यांच्या यक्षी, सेवक याशिवाय तीर्थकारांचा शिल्पपट ही साकारण्यात आलेला आहे. याठिकाणी कांही शैवपंथीय लेण्यांचे भग्नावस्थेतील अवशेष आढळून यायची. तर कांही जैन लेण्यांतुन अरुंद दारांची छोटे खानी भीक्षुगृहेही आढळून आल्याच्या नोंदी आहेत.