Uncategorizedराष्ट्रीय

क्रुर हिंसेमागे कोणता ब्रेन असतो?

क्रूर हिंसेमागे कोणता ब्रेन असतो?
हिरवा?
भगवा?
निळा?
पिवळा?…
क्रूर मुस्लीम ब्रेन..हिंदू ब्रेन..ख्रिश्चन ब्रेन.. असा काही स्पेशल ब्रेन असतो का?
याचं उत्तर “नाही” असं आहे!
दिल्लीतल्या हॉटेल अशोक यात्री मध्ये असंच एका स्त्रीचा खून करणारा होता हॉटेल मॅनेजर केशवकुमार आणि हॉटेलचा मालक सुशील शर्मा. या सुशील शर्माची बायको नयना सहानी तिचा खून करून तिचे हात-पाय तोडून तिच्या धडाला आणि हाडांना हॉटेलच्या किचनच्या तंदूरभट्टी मध्ये कोंबून जाळले जात होते तेव्हा ते सापडले. एवढ्या क्रूर पद्धतीने खून करणारे हिंदू होते! म्हणजेच,
क्रूर खून करणारे मेंदू फक्त हिंदूंचेच असतात असे नव्हे!!
मुंबईमध्ये नीरज ग्रोव्हर मीडिया एक्झिक्यूटिव्ह होता. मारिया मोनिका सुसाईराज नावाची कन्नड अभिनेत्री ईटीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी मुंबईला आली. ती ग्रोव्हरची मैत्रीण बनली पण त्यांच्यात प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर ग्रोव्हरचा खून करून मारिया व तिचा प्रस्तावित पती जोसेफ या दोघांनी मिळून ग्रोव्हरच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे दोघे ख्रिश्चन होते.
क्रूर खून करणारे मेंदू हे फक्त ख्रिश्चनांचेच असतात असे काही नव्हे.
सध्या गाजत असलेल्या आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरचा खून करून तिचे तुकडे करून फेकून दिले.
क्रूर खून करणारे हे फक्त मुस्लिमांचेच असतात असे काही नव्हे
गुन्हेगार निर्माण होण्यामागे अनेक कारणे असतात.
खरे तर गुन्हेगारी ही मनोविकृती असते. आणि हा मनोविकृतपणा मेंदूच्या बिघाडातून निर्माण होतो.
मनोविकृती सर्व धर्मात समान असते. विशिष्ट धार्मिक जमात ही खूप मनोविकृत असते असे नाही.
मनोविकृती ही मेंदूतील बिघाड झाल्यामुळे निर्माण होते. हा बिघाड होण्यामागील कारणे अनेक असतात. पैकी ठळकपणे जीन्स आणि मेंदूतील कार्य विकृती दिसून येतात.
कपाळाच्या मागील भागाला प्री फ्रंटल रीजन असे म्हणतात. जर हा भाग नीट काम करू शकला नाही तर सणकीपणा, अतिशय अपरिपक्व विचार, धोकादायक वर्तन, आक्रमकता आणि स्वतःच्या स्वभावाला अजिबात बदलू शकता न येणे अशी लक्षणे उद्भवतात.
सामान्यपणे सर्व मुलांना जे संस्कार कुटुंबातून मिळतात तेच संस्कार मिळालेल्या गुन्हेगारांच्या मेंदूच्या या भागाची तपासणी केली असता या भागातील ग्लुकोज मेटाबोलिझम म्हणजेच साखरेचे ऊर्जा देण्याचे कार्य हे अतिशय खालावलेले आढळले आहे आणि हे सर्व धर्माच्या गुन्हेगारात आढळलेले आहे.
गुन्हेगारांच्या जीन्सशी देखील तपासणी करण्यात आली आहे. एक रसायन आहे ज्याचे नाव आहे मोनो अमाईन ऑक्सिडेज किंवा माओ. आणि हे रसायन मेंदूतील विविध रसायनांचे पोषण करत असते. या रसायनाची निर्मिती ही काही जीन्स कडून होत असते. या जीन्समध्ये गडबड घोटाळा झाला की मग माओ बिघडते. हा माओ जिथून पाझरतो त्याला ‘आक्रमक जीन’ असे म्हणतात. एका सर्वेक्षणात संपूर्ण डच कुटुंब हे अशा जिन्सचे आढळले होते. ज्यांच्यात गुन्हेगारी आक्रमकता आणि हिंसा पुरेपूर भरली होती. आणि… अशी कुटुंबे सर्व धर्मात आढळतात. सर्व जातीत आढळतात.
बऱ्याच वेळा मानसिक रोग हे गुन्हेगारी वर्तन किंवा पॅथॉलॉजिकल बिहेवियर निर्माण करतात तेव्हा त्याला जर इतर मानसिक रोग असतील तर ते गुन्हेगारीत भरच घालतात. स्कीझोफ्रेनिया सारख्या रोगात वेगवेगळे भ्रम होत असतात. संशय भ्रम हा पॅरानाईड स्किझोफ्रेनिया नावाच्या रोगात मोठ्या प्रमाणावर असतो. जेव्हा भ्रम निर्माण होतात तेव्हा माणूस हिंसक बनू शकतो आणि तो कुठल्याही थराला जातो. विचारांचे भ्रम असतील तर त्यांना डिल्युजन म्हणतात आणि इंद्रियांचे भ्रम असतील तर त्यांना होल्यूसिनेशन म्हणतात. म्हणजेच डोळ्याचा भ्रम, कानाचा भ्रम, वगैरे. अशा भ्रमिष्टांकडनं क्रूरपणे खून होण्याची शक्यता वाढत जाते.

  • आणि असे भ्रमिष्ट सर्व धर्मात असतात, सर्व जातीत असतात.
    खरे तर, असे जेव्हा बिघडलेल्या भेजाचे गुन्हेगार चांगल्या परिस्थितीत असतात तरी देखील ते गुन्हा करतात. कारण त्यांचा मेंदू त्यांना ते करण्यास भाग पाडत असतो. अमेरिकेमध्ये एका मातेने आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना पाण्यात बुडवून मारण्याचा सपाटा लावलेला होता आणि अशी आठ मुले तिने मारून टाकली होती.
    जर परिसर हा गुन्हेगारी वृत्तीचा असेल तर त्या ठिकाणी गुन्हेगारच निर्माण होतात हेही सत्य नाही. तसे असते तर झोपडपट्टीतून कोणीही एखादा मोठा कलेक्टर किंवा डॉक्टर झाला नसता. याचा अर्थ गुन्हेगार निर्माण होण्यामागे अनेक कारणे असतात. एकच धर्म नसतो. जात नसते.
    या साऱ्यांचा अभ्यास करायचा असेल तर न्यूरो सायंस आणि सोशल सायन्स किंवा मेंदू विज्ञान आणि समाज विज्ञान वाचून काढावे लागेल. कोणते तरी धर्मग्रंथ वाचून नव्हे!!
    भ्रमिष्ठासारखे एखाद्या खुनामागची कारणे चॅनेलवरून धो धो सांगणारी मंडळी ही खून करणाऱ्या मानसिकते इतकीच बिघडलेली आहेत असे समजायला हवे.
    आणि गुन्हेगारीचे प्रमाण धर्मांप्रमाणे बघायचे ठरविले तर तुरूंगात शिक्षा भोगत असलेले सर्वात जास्त हिंदू आहेत!
    तरीही हिंदू हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात असे नव्हे!
    थोडक्यात काय
    मेंदू दुरुस्त करणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. कोणता तरी धर्म नष्ट करणे हा त्याच्यावरचा उपाय नाही!
    ब्रेन हा ब्रेन असतो. फरक एवढाच असतो की तुमचा आणि गुन्हेगारांचा सेम नसतो.
    गुन्हेगार निर्माण होतो तो कोणत्यातरी धर्मातून किंवा जातीतून नव्हे. किंवा एखादा धर्म गुन्हेगारांना जन्म देतो असेही नव्हे आणि मेंदूचा बिघाड फक्त एकाच धर्मात होतो असेही नव्हे.
    तेव्हा गुन्हेगारी प्रवृत्ती आणि क्रूरपणा ही गोष्ट विज्ञानाशी संबंधित आहे. धर्माशी नव्हे.
    एवढी अक्कल सर्व धर्मियांनी बाळगली तरी पुरेशी आहे.
  • @:
  • डॉ. प्रदीप पाटील

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker