७ नोव्हेंबर ला घेणार कार्यकर्ता बैठक; ८ पासून प्रचारात सक्रिय
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत युतीच्या धर्म सोडून राजकिशोर मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (महायुतीचे) उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या निवडणूक प्रचारात ८ नोव्हेंबर पासून आपल्या फौजफाट्यासह तनमनधनाने सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे. हा निर्णय घेण्यासाठी त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बोलावली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
▪️ कॉंग्रेस पक्षाचे दिली खरी ओळख
राजकिशोर मोदी यांनी बीड जिल्ह्यामध्ये सतत ४० वर्षे कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठपणे केले. एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस या पदापर्यंत ते पोहोचले. कॉंग्रेस पक्षाने त्यांना खरी राजकीय ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण करून दिली. मात्र ४० वर्षे काम करुनही विधानपरीषदेत काम करण्याची संधी पक्षाने न दिल्यामुळे ४० वर्षाच्या कॉंग्रेस प्रेमाला नाविलाजाने सोडचिठ्ठी दिली .
▪️ ऑक्टोबर २०२१ मध्ये केला होता “राष्ट्रवादी”त प्रवेश
देवून २१ ऑक्टोबर २०२१ रोजी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतरही ना. धनंजय मुंडे व ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना एक उमद्दा आणि विश्वासू सहकारी म्हणून आपली जागा निर्माण करणारा सहकारी म्हणून राजकिशोर मोदी अजित पवार यांच्या गटात सक्रिय काम करीत आहेत.
▪️युती धर्म सोडून विरोधात प्रचार
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती भाजप-शिवसेना व इतर मित्र पक्षाची असतांना आणि या गटाचा प्रमुख विरोध शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असतानासुद्धा या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांनी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याची भुमिका घेण्याच्या विचारात आहेत.
▪️आ. सौ. नमिता मुंदडा यांच्या अडथळ्यात होणार वाढ?
राजकिशोर मोदी हे अंबाजोगाई शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात गेली ४० वर्षांपासून सक्रिय आहेत. जवळपास १ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अंबाजोगाई नगर परिषदेचा कारभार लोकाश्रयाच्या आधारावर त्यांनी सतत १५ वर्षापेक्षा ही अधिक काळ सांभाळलेला आहे. मागील ५ वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत नाही तर कदाचित हा कालावधी २० वर्षांपर्यंत ही गेला असता.
शहरात असलेल्या शैक्षणीक संस्था, सहकार माध्यमातून उत्तम पध्दतीने चालत असलेल्या बॅंका, सहकारी पतसंस्था, मल्टिस्टेट, सामाजिक उपक्रमातुन शहरवासीयांशी असलेले त्यांचे संबंध, प्रियदर्शनी क्रिडा मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांच्या मुळे ते जनसामान्यांच्या मनात कायम घर करून आहेत. या सर्व उपक्रमामुळे त्यांचा मतदारांशी चांगला संपर्क आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राजकिशोर मोदी यांनी पृथ्वीराज साठे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली तर विद्यमान आ. सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या विजयाच्या मार्गातील अडथळे वाढण्याची शक्यता आहे.
▪️२५ वर्षांपासून आहे राजकीय वैमनस्य; अनेकांनी लाटला राजकीय फायदा
राजकिशोर मोदी आणि केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आ. नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्या मध्ये गेली २५ वर्षांपासून राजकीय वैमनस्य आहे. गेल्या ५ वर्षात हे वैमनस्य अधिक तीव्र होत गेले. एवढे तीव्र झाले की राजकारणाच्या ही पलिकडे जाऊन वैयक्तिक पातळीवर आले आणि हा विरोध वाढत गेला. शहरातील सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर एकमेकांचा आदराने उल्लेख करणा-या या दोन बड्या नेत्यांमधील राजकीय वैमनस्य मिटवण्यासाठी शहरातील वा शहराबाहेरील एकाही बड्या ,प्रतिष्ठीत समजणा-या लोकांनी प्रत्यक्षपणे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. उलट या दोन्ही बड्या नेत्यांमधील राजकीय वैमनस्याचा फायदाच या लोकांनी लाटल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.
▪️ ७ नोव्हेंबर ला भुमिका जाहीर करणार!
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पृथ्वीराज साठे यांच्या प्रचाराचा निर्णय घेण्यासाठी राजकिशोर मोदी यांनी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेवून त्यांच्याशी संवाद साधून ते पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आदेश देणार असल्याची माहिती मिळते आहे.
▪️ प्रवेश नाही; फक्त प्रचार करणार!
राजकिशोर मोदी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी राजकिय भुमिका घेतली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते फक्त पृथ्वीराज साठे यांचा पुर्ण शक्ती लावून प्रचार करणार असल्याचे समजते. राजकिशोर मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांना पक्ष प्रवेशाचा निरोप देण्यात आला असून त्यांनी ना. अजित पवार व ना. धनंजय मुंडे यांच्या वर विश्वास ठेवत आपण तेथेच राहून पृथ्वीराज साठे या़चे काम करु असे सांगितल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.
▪️पक्षाने कारवाई केली तर?
विधानसभा निवडणुकीत राजकिशोर मोदी यांनी युती धर्म सोडून प्रबळ विरोध असणा-या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा सक्रिय प्रचार केल्याचा ठपका ठेवून कारवाई केलीच तर त्यांना शरद पवार गटात प्रवेश करण्याखेरीज काही मार्ग शिल्लक राहणार नाही. मात्र ना. अजित पवार व ना. धनंजय मुंडे यांचे राजकीय संबंध लक्षात घेता हा मुद्दा स्थानिक पातळीवरील असल्याचे सांगून यावर पडदा टाकण्याची भुमिका घेतली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.