महाराष्ट्र
कसल्याही प्रकारची स्वच्छता न करताच जुने बसस्थानक पुर्ववत सुरु !


आगारप्रमुखांच्या निष्क्रिय भुमिकेबध्दल संताप
अंबाजोगाई शहर बस स्थानक परीसरातील कॉंक्रेटीकरणाच्या नावाखाली गेली दोन महीने वंजारा वसतिगृह परीसरात स्थलांतरीत करण्यात आलेले बसस्थानक आज सकाळी पुन्हा पुर्वीच्या जागी कसल्याही प्रकारची स्वच्छता न करता सुरु करण्यात आले. आगार प्रमुखांच्या या निष्क्रिय भुमिकेबध्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.


मराठवाडा विभागातील सर्वांधिक बस ये-जा करणारे स्थानक
अंबाजोगाई शहर बसस्थानक हे मराठवाड्यातील सर्वाधिक बसेस ये-जा करणारे केंद्र म्हणून गेली अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वच कानाकोपऱ्यात जाणा-या बसेसची या स्थानकात सतत येत जा असते.


दोन वर्षांपूर्वीच झाले होते नुतनीकरण
या बसस्थानकाचे एक वर्षापुर्वी नुतनीकरण झाल्यानंतर स्वच्छता व इतर निकष पुर्ण करणारे एकमेव बसस्थानक म्हणून हे बसस्थानक महाराष्ट्रात सलग दोन वर्षे प्रथम आले होते. त्यामुळे हे बसस्थानक सतत चर्चेत होते.
या बसस्थानकाचे परिसरातील आतील मोकळ्या भागाचे डांबरीकरण वा कॉंक्रेटीकरण मागील काही वर्षांपासून झाले नसल्याने या नवीन बसस्थानकात प्रचंड धुळ होत असे व पावसाळा काळात तर सर्वत्र पाणीच साचत असे. नागरीकांची ओरड आणि लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा यामुळे या बसस्थानकाच्या आतील संपूर्ण भागाच्या कॉंक्रेटीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती.
आठ दिवसांपूर्वी हे कॉंक्रेटीकरणाचे काम संपल्यानंतर वॉटरींगसाठी काही दिवस हे बसस्थानक सुरु करण्यात आले नव्हते.
आज सकाळपासून बसस्थानक जुन्या स्थानकात सुरू!
आज सकाळपासून आगार प्रमुखांच्या सुचनेनुसार हे बसस्थानक पुर्ववत जुन्या बसस्थानकात सुरू करण्यात आले. मात्र हे बसस्थानक सुरु करण्यापुर्वी आगार प्रमुखांनी कॉंक्रेटीकरण केलेला संपुर्ण परीसर स्वच्छ धुवून काढण्याचे सौजन्य दाखवले नाही उलट अधिकृत नियुक्त करण्यात आलेल्या सफाई कामगारांकडून बसस्थानक परिसराची साधी झाडलोट ही करुन घेतली नाही.

