औरंगाबादेत प्रेम प्रकरणातून तरुणीला जाळण्याचा प्रयत्न; दोघांची प्रकृती गंभीर


औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. गजानन मुंडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते. मात्र, तो कोणत्या गावचा रहिवासी आहे. हे अजून कळालेले नाही.
कशी घडली घटना?
महाविद्यालयात आज दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली. या घटनेत दोघेही भाजले. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, मुलगा साधारण 70 तर मुलगी 30 टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
पोलीसांकडे केली तक्रार
विद्यार्थिनी आणि गजानन गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद झाले होते. त्याबाबत मुलीने पोलिस ठाण्यात दोन- तीन वेळा लेखी तक्रारही दिली होती. मात्र, साधारण अदखलपात्र नोंद करत पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत या मुलीच्या मैत्रिणींनी व्यक्त केली.
जबाब नोंदवणे सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचा जबाब नोंदवणे सुरू असून, तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करत असल्याचे समजते.
संबंधित मुलगी ही बायोफिजिक्स अभ्यासक्रमाची विज्ञान संस्थेतील माजी विद्यार्थिनी आहे…
तपास सुरु केला?
विद्यार्थिनीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे विद्यापीठ आणि शासकीय विज्ञान संस्थेत खळबळ उडाली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. संबंधित विद्यार्थ्यांनीवर प्रेमप्रकरणातून हल्ला केला की तर इतर काही कारण आहे, याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.
एप्रिलमध्ये तरुणीची हत्या
एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याचा प्रकार या वर्षी 20 मे रोजी औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात घडला होता. दुपारच्या सुमारास ही घटना होती. ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव होते. ती ‘बीबीए’च्या प्रथम वर्षात शिकत होती. तेव्हा हल्लेखोराने तिला जवळपास 200 फूट ओढत नेऊन तिची चाकूने गळा चिरून हत्या केली होती.