महाराष्ट्र

एकमेकांच माणूसपण एकदुस-याला जाणवणं यापेक्षा सुंदर सहजीवन असूच शकत नाही; डॉ. वृशाली किन्हाळकर


पती पत्नी म्हणून एकत्र रहात असताना एकमेकांच माणूसपण एकदुस-याला जाणवणं यापेक्षा सुंदर सहजीवन असू शकत नाही असे मत प्रख्यात कवयत्री -साहित्यिक तथा स्त्री रोग तज्ञ डॉ. वृशाली किन्हाळकर यांनी येथे व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील सजग अंबाजोगाईकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात “सहजीवनातील बदलते भावविश्व” या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख चेतना तिडके व बेल्जियम येथे महिला कार्यक्रमासाठी निवड झालेल्या संजिवनी घुरे या उपस्थित होत्या.
“सहजीवनातील बदलते विश्व” या विषयावर विस्तारीत विवेचन करताना डॉ. वृशाली किन्हाळकर पुढे म्हणाल्या की, आजच्या कार्यासाठी संयोजकांनी हा आगळावेगळा विषय ठेवला त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. आहे. या विषयाची व्याप्ती आणि महत्व दोन्ही ही खुप मोठे आणि चांगले आहे, त्यामुळे या विषयावर मला अनेक बाबतीत स्पष्ट बोलावे लागेल.


सहजीवनातील बदलते भावविश्व समजून घेतांना या विषयाकडे आपल्या काल आज आणि उद्या या तीन पातळीवरील बदलते भावविश्व समजून घ्यावे लागतील. या संदर्भात ज्ञानेश्वर यांच्या अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून आपण सुरुवात करु या. ज्ञानदेवांनी सहजीवनातील सुंदर लिहीन ठेवले आहे. त्यांच्या एका अभंगांचा भावार्थ सांगताना त्या पुढे म्हणाल्या की, ज्ञानेश्वर असे सांगतात की, “सुर्य उगवताना त्याची किरणे कमल फुलांवर पडतात तेव्हा ते कमल फुल हळुवार पुणे उमलत जाते. ते संकोच करीत नाही. ज्याप्रमाणे कमलफुल हळुवारपणे उमलत जाते तसे सहजीवन आहे. ते हळुवार पणेच उमलत जायला हवे.
सहजीवन कसे असावे यांचे दुसरे ही उदाहरण अत्यंत चांगले आहे. पाण्यामध्ये जेंव्हा आपण मीठ टाकतो तेंव्हा मीठ पाण्यामध्ये सहजपणे विरघळून जाते, मात्र आपला खारटपणा ते सोडत नाही. सहजीवन असेच आहे. आपले अस्तित्व न सोडता आपल्या जोडीदारासोबत सहजपणे मिसळून जाणे म्हणजेच सहजीवन आहे.


सहजीवनाच्या काल आज आणि उद्या च्या प्रवासाकडे आपण डोळस नजरेने पाहीले तर कालचे (पुरातन काळातले) सहजीवन हे महिलांवर लादलेले असायचे. त्याकाळी स्वयंवर व्हायचे. या स्वयंवरात पुरुषाला एखाद्या पण लावण्यात येत असे, तो पण त्याने जिंकला की मग त्या स्त्री शी त्यांचे स्वयंवर व्हायचे. या प्रक्रियेमध्ये काही तरी जिंकून एखादी वस्तू मिळवायची हा भाव असायचा. पण जिंकलेल्या पुरुषा सोबत स्वयंवर नाकारण्याची हिंमत त्या स्त्री मध्ये नसायची.
या नंतरचा काळ गरुड पुराण काळातील येतो. गरुड पुराणात सहजीवन करणारी स्त्री कशी सर्वगुणसंपन्न असावी असे सांगितले आहे. त्याकाळात किंबहुना आज पर्यंत ही अनेक पुरुषांना सहजीवन देणारी पत्नी ही गरुड पुराणात सांगितलेल्या सहा निकषाप्रमाणेच असावी अशी अपेक्षा असते. आणि त्याच निकषावर वर मुलगा आपल्याला सहजीवन देणारा जोडीदार शोधत असतो.
वास्तविक पाहता पुरुषांसोबत सहजीवन देणारी स्त्री ही खुप सोशीक, निसर्गाने दिलेले शारीरिक त्रास सहन करणारी, अत्याचार सहन करणारी असते. पुर्वीच्या काळी तर पती पत्नीच्या वयात खूप मोठ़ अंतर असायचं. त्यामुळे त्यांच्या मध्ये संवादच होत नसायचे. त्याकाळी बाई च आयुष्य हे मनाविरुद्ध लग्न होण, मुलं होणं, बीजवर मुलांसोबत लग्न होण अशा अनेक प्रश्नांनी बरबटलेले असायचं. त्याकाळी ते सहजीवन होतं का? तर बाईच्या दृष्टीने विचार केला तर ते सहजीवन नव्हतंच असंच उत्तर मिळेल. म्हणून सहजीवनात हे छोटे, छोटे टप्पे तपासुन घेतले पाहिजेत.
स्रीयांच्या बाबतीत ” क्षणाची पत्नी अनंत काळची माता” हे वाक्य आपण अनेक शतकांपासून ऐकत आहोत. पण “पुरुष क्षणाचा पती आणि अनंत काळाचा बाप” कधी होणार आहे का नाही? यांचा ही आता विचार करण्याची वेळ आली आहे.


सहजीवनात शारिरीक मिलनाचा अतिशय महत्व आहे. या मिलनामुळेच आज पृथ्वी टिकून आहे. निसर्गाने एक खुप मोठी शक्ती स्त्री ला दिली आहे. या मिलनानंतर स्त्री ही अपत्य जन्माला घातले. बाळंतपणाच्या मरण यातना ती सहन करते. बाळंत होतांना तर ती अनेकदा मी मरते आता असेच म्हणत आपल्या बाळाला जन्म देते. बाळंत झाल्यानंतर जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानी पडतो तेव्हा क्षणापुर्वी सोसाव्या लागणाऱ्या मरणयातना क्षणांमध्ये विसरून माझं बाळ मला द्या म्हणून आपल्या छातीला लावून त्याला दुध पाजवयास घेते. कुठून येते तिच्यात ही सगळी शक्ती, याचा तिच्या जोडीदारानेगांभिर्याने विचार करायला पाहिजे.
किती पुरुष बाळंतपणानंतर आपल्या बायकोला जवळ घेवून तिला बाळंतपणात किती त्रास झाला हे प्रेमाने विचारतात? मला बाप केलंस, त्याचं ऋण मी कसं फेडू असं आपल्या पत्नीला विचारतात? हा प्रश्न आहे. स्त्री देहाचं कधी तरी ऋण पुरुषाला का माणावस वाटतं नाही हा प्रश्न आहे. स्त्री च्या या वेदना जेव्हा पुरुषाला समजतील तेंव्हाच पुरुषांना सहजीवनाचा खरा अर्थ समजला असे म्हणता येईल असे डॉ.वृशाली किन्हाळकर यांनी सांगितले.


आज माझ्या मुलांच्या पिढीतील पती पत्नी सहजीवन हे खुप सुखद असल्याचं मला पहायला मिळतं.
मुलगा मुलगी एकमेकांच्या आई बाबांना आई बाबाच म्हणतात. दिवाळीची सुट्टी तुझ्या आई बाबांकडे उन्हाळ्याची सुट्टी माझ्या आईबाबांकडे अशी विभागणी करुन घेतात. बाळंतणाअगोदर पत्नीला आपल्या सोबत घेऊन येतात. तिला काय हवं नको ते पहातात, आजारपणात तिच्या डोक्याशी बसतात, बाळंतपणानंतर बाळाची शी सू करतात, तिचं बाळाचं आजारपण त्यांचं खाणं पिणं पहातात. हा बदल सहजीवनातील बदलते भावविश्व खुप सोप्या पद्धतीने सांगणारा आहे. त्यांचं हे वागणं एकमेकांच माणूसपण एक दुस-यानं समजून घेण्यासारखे आहे. आणि सहजीवन तरी यापेक्षा वेगळे काय असतं. एकमेकांच माणूसपण जेंव्हा एक दुस-याला जाणवू लागणं यापेक्षा सुंदर सहजीवन असूच शकत नाही असे मत डॉ. वृशाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख चेतना तिडके यांनी महिला आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत असल्या तरी अजूनही महिलांची अवस्था खुप दयनीय आहे , अजूनही स्त्री बंधनात अडकलेलीच आहे असे सांगून ही परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. जेष्ठ नागरिक संघ महिला आणि महेश्वरी महिला संघाच्या सदस्यांनी गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख चेतना तिडके यांचा परिचर शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय रापतवार यांनी तर डॉ. वृशाली किन्हाळकर यांचा परिचय डॉ. सुलभा खेडगीकर यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा देशमुख यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत लिनेन्स क्लब आणि इनव्हीलर क्लब च्या सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा महाजन यांनी केले. तर आभार ओमकेश दहिफळे यांनी मानले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker