आमरस आणि कुरड्या पापडाच्या पंगती झाल्या कालबाह्य!


ग्रामीण आणि शहरी भागात एकेकाळी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आंब्याच्या अनेक प्रजातीच्या आमराया कालबाह्य झाल्याने त्यांची सर्रास कत्तल झाली आणि या आमराया नष्ट झाल्याने एकेकाळी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आमरस, पुरणपोळी आणि कुरड्या-पापडांच्या पंगती आता कालबाह्य झाल्या आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात अंब्यांच्या वृक्षांची मोठी लागवड पहावयास मिळत होती. अनेक गावांचा आंबा लोक विश्वासाने विकत ही घेत होते. पेवंदी, मलगोबा, खोब-या या आंब्यांना तर विशेष मागणी असायची! घट्ट बिड्या रस, गोड चव, गडद शेंदरी रंग आणि आंब्याच्या रसाला येणारा विशिष्ट वास ही या आंब्याच्या खास वैशिष्ट्य असायची! या व्यतिरिक्त लंगड़ा, शेंदऱ्या, रोप्या, संतन्या लाडू, गाडग्या, वाळक्या, गोटी, सह अनेक प्रजातींचे आंबा पुर्वी मोठ्या प्रमाणावर मिळत असतं. तालुक्यातील अनेक गावांत मोठमोठ्या आमराया असायच्या आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची झाडे आणि त्या झाडांची निगा मागच्या पिढीतील शेतकरी मोठ्या हौसेने करायचे. कोणत्या झाडाला कोणत्या वेळेस काय लागते याची माहिती ही या लोकांना असायची.


आता सर्वच चित्र पालटले! या जुन्या झाडांची नवीन उत्पत्ती करण्याचे काम अनेक शेतकऱ्यांनी थांबवले. जुनी झाडे कालांतराने कालबाह्य झाली. एका कुटुंबातील शेतीत १० मालकं नवीन झाले आणि हळुहळू ही झाडांच्या संगोपनाची पध्दती बंद पडली. एका एका झाडाला पाच-दहा हजार अंबे निघायची तिथं आता नवीन खुज्या झाडांना कमी फळ येणारी झाडे मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात आढळुन येत आहेत.
या सर्व प्रक्रियेमुळे पुर्वी प्रमाणे होणा-या आमरसाच्या जेवणावळी वर नियंत्रण आले. आमराईत पाड खाण्यासाठी मुलांची होणारी पळापळ, विषयांवरील गप्पा, आंब्याला बहर आला की, त्याचा दुरवर पसरणारा सुंगंध हे सगळं बंद झाले आहे.
झाडाच्या फांद्यावर टोळक्याने खेळायचा डाबडुबली खेळ आणि कडक उन्हात आंब्याच्या थंडगार सावलीत बसून रंगणाऱ्या चिलमी गप्पा आता कालबाह्य झाल्या आहेत. आंब्याच्या झाडांची कत्तल झाल्याने आता आंब्यांची दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लग्न समारंभात होणा-या आमरस, पुरणपोळी आणि कुरड्या-पापडांच्या प्रगतीचा त्यांनाच आता कालबाह्य झाला आहे.