महाराष्ट्र
आंदोलने ही रोज रोज करावयाची गोष्ट नाही व्यवस्था बदलण्यासाठी ती करावी लागतात


अमर हबीब यांचे मत
शेतकरी विरोधी कायदे अभ्यास शिबीराचे उत्स्फूर्त प्रतिसाद
आंदोलने ही रोज करावयाची गोष्ट नाही व्यवस्था बदलण्यासाठी आंदोलने करावी लागतात असे मत किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी व्यक्त केले.
किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने अंबाजोगाई येथील पत्रकार कक्ष भवनात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कायदे या एक दिवसीय अभ्यास शिबीराचे अमर हबीब बोलत होते. या अभ्यास शिबीरात बीड जिल्ह्यातील ४३ किसान पुत्रांनी सहभाग घेतला.
किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने या वर्षभरात शेतकऱ्यांना शेतकरी विरोधी कायद्याची सहज माहिती उपलब्ध व्हावी म्हणून राज्यात ठिकठिकाणी अशी अभ्यास शिबीरे आयोजित करण्यात येणार असून यावर्षीचे हे पहिले शिबिर अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात सहभागी झालेल्या शिबीरार्थिंना मार्गदर्शन करताना अमर हबीब यांनी शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होण्यास कारणीभूत ठरलेल्या “कमाल शेतजमीन धारणा कायदा”, “आवश्यक वस्तूंचा कायदा” आणि “जमीन अधिग्रहण कायदा” या तीन महत्वाच्या कायद्दांसह शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या २५२ कायद्यांची माहिती दिली.


आपल्या मार्गदर्शनात अमर हबीब यांनी कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा व जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे नेमके काय आहेत. या कायद्यात नेमके काय म्हटले आहे आणि हे कायदे शेतक-यांच्या विरोधात कसे आहेत. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे हे अनेक उदाहरणे देवून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.


या शिबिरातील दुसऱ्या सत्रात अमृत महाजन यांनी शेतकरी विरोधी कायदे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरुवात असलेल्या कायदेशीर लढाईची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयात शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत ही मागणी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने न्यायालयाकडे का करण्यात आली आहे, ही न्यायालयीन लढाई आज नेमकी कोणत्या स्थिती पर्यंत पोहोचली आहे आणि ही लढाई जिंकल्यानंतर शेतकऱ्यांना नेमके काय लाभ मिळतील याचे सुंदर विवेचन अमृत महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
नगर परिषद कार्यालय परिसरातील पत्रकार कक्ष येथे आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय अभ्यास शिबीराचे अनौपचारिक उद्घाटन सकाळी १० वाजता किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमृत महाजन, संयोजक सुदर्शन रापतवार, सह संयोजक अनिकेत डिघोळकर हे उपस्थित होते.


प्रारंभी या अभ्यास शिबीराच्या आयोजनामागील भुमिका संयोजक सुदर्शन रापतवार यांनी सांगितली. या अभ्यास शिबिरात सहभागी झालेल्या शिबीरार्थिंच्या आयुष्यात शेती, शेतकरी विरोधी कायदे यांची स्पष्ट उकल होण्यासाठी हे शिबीर महत्वाची भुमिका बजावेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

