अजब रसायनाचा अवलिया ; नवाब सुनील लोमटे !


नवाब सुनील लोमटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणा-या “नवाब सुनील काका लोमटे” यांच्या आठवणींना उजाळा देणा-या ग्रंथांचे प्रकाशन व इतर कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात येणार आहे. या ग्रंथात माझे मित्र विधान परिषदेचे माजी सदस्य संजयभाऊ दौंड यांनी लिहिलेला लेख वाचकांसाठी मुद्दामहून प्रकाशित करीत आहे.
मिस यू सुनील…!


खरं तर सुनील हा माझा मित्र बबनभैय्या यांचा लहान भाऊ. त्यामुळे त्याच्या शालेय शिक्षणापासून मी त्याला पहात आलो आहे. शाळेत असल्यापासूनच मुलांचे संघटन करण्यात त्यांचा हातखंडा. पुढे महाविद्यालयात गेल्यानंतर त्याला विद्यार्थी संघटनेत काम करण्याची संधी मिळत गेली. सुनील चे वडील बालुतात्या अनेक वर्षे राजकारणात आणि नगराध्यक्ष झाले असल्यामुळे नेतृत्व गुण उपजतच त्यांच्यात आहेत.
सुनील महाविद्यालयातील मुलांचे प्रश्न सोडवण्यात सतत पुढाकार घ्यायचा. त्याचा मित्रांचा मोठा संच याच नेतृत्वगुणामुळे सतत वाढत गेला. महाविद्दालयीन शिक्षण सुरू असतांनाच त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकीय पक्षात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्याने विविध पक्षातील राजकीय नेत्यांसोबत आपले मृदु संबंध निर्माण केले. आपल्या मित्रांच्या संचयामुळे आणि सर्वांना मदत करण्याच्या भुमिकेमुळे तो अल्पावधीतच सर्वांचा “काका” बनला !


सुनील याने आपली खरी ओळख निर्माण केली ती श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन करुन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या विभागातील सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करुन एक अफलातून शिवजयंती महोत्सव त्याने सुरु केला. शिवजयंती महोत्सव हा गावचा महोत्सव त्याने करुन ठेवला. या महोत्सवामुळे शहर व परिसरातील विविध जाती धर्माच्या तरुणांना एकत्र करून सार्वजनिक महोत्सव कसे साजरे करावेत यांचा एक नवा पायंडा सुनील ने सुरु केला.
शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातून जोडलेला अठरापगड जातीतील तरुणांचा समुह त्याने कायम आपल्या सोबत ठेवला. मित्रांच्या वैयक्तिक अडि-अडचणी, त्यांच्या बहिणींचे लग्न, आई वडिलांचं आजारपण, शेतीची भांडणतंटे, मुला-मुलींचे लफडे किंवा इतर काही ही असू द्या सुनील ला आवाज दिला की त्याने मदतीचा हात पुढेच केला आणि प्रॉब्लेम हॉल झाला असे समिकरणच जणू बनले होते. “हर समस्या का फल सुनील काका का बल” असे समीकरण जणू या विभागात बनले होते.


सुनील ची ही घोडदौड राज्य पातळीवरील नेत्यांच्या नजरेतून कशी सुटेल. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांची नजर सुनील वर पडली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात त्याला प्रवेश देवून थेट जिल्ह्याचा उपाध्यक्ष बनवले. त्यांच्या पत्नी ऍड. शोभाताई लोमटे यांना नगराध्यक्ष पदांची उमेदवारी देऊन सर्व शक्ती त्यांच्या मागे उभी केली. पण राजकारणात प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ यावी लागते, ऍड. शोभाताई लोमटे यांची ती वेळ चुकली आणि थोड्या मतांनी त्या मागे पडल्या.
सुनील ची राजकीय आणि सामाजिक घोडदौड जोरात चालू असताना अचानक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी कानावर पडली. विश्वास न बसणारी बातमी ऐकून पायाखालची वाळू सरकल्याचाच भास झाला. बघता बघता बातमी गावभर पसरली आणि सुनील च्या घरासमोर बघता बघता अख्खं गाव जमा झाले. शेजारील गावातील, मराठवाड्यातील अनेक गावातुन हजारो लोक सुनील च्या अंत्यदर्शनासाठी जमा झाले. एक तासापुर्वी अत्यंत दिमाखात उभे असलेले “सुनील पर्व” क्षणार्धात संपले.
सुनील ला जावून आज एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी लाखो लोकांच्या -हदयात घर करुन बसलेला सुनील आज ही त्यांच्या मनात जिवंतच आहे. त्याच्या आठवणी माझ्यासह लाखो लोकांच्या -हदयात शेवटच्या श्वासापर्यंत कायम जिवंत राहतील.


संजय पंडीतराव दौंड
माजी विधान परिषद सदस्य,
महाराष्ट्र राज्य.