अकाली मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सक्षम निधी उभा करणार; एस एम देशमुख
ऐन उमेदीच्या काळात अनेक कारणांमुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने सक्षम निधी उभा करण्यात येणार असून हा निधी उभा करण्यासाठी सर्व पत्रकारांनी आपला वैयक्तिक सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत प्रभाकर जोशी यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना फुल न फुलांची पाकळी म्हणून आर्थिक मदत देण्यासाठी एस एम देशमुख यांनी नुकतीच अंबाजोगाई येथे प्रशांत जोशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात एस एम देशमुख बोलत होते.


या प्रसंगी त्यांच्या समवेत सोशल मीडियाचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय संघटक सुभाष चौरे, बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, सचिव रवी उबाळे, हल्ला विरोधी कृती समिती जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत, राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे यांच्या सह पत्रकार हल्ले नियंत्रण समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय अंबेकर, मराठी पत्रकार परिषदेचे वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ राजेश इंगोले, जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी विस्ताराने बोलतांना एस एम जोशी म्हणाले की, महाराष्ट्रातील तरुण पत्रकारांच्या मृत्यू चे प्रमाण आणि त्याची कारणं अस्वस्थ करणारी आहेत. ऐन उमेदीच्या वयात एखाद्या तरुण पत्रकाराचा मृत्यू झाला की त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. अनेक वेळा मोठ्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांच्या मृत्यू नंतर त्या वृत्तपत्राचे व्यवस्थापन त्यांच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करते, हे त्याहुनही अधिक अस्वस्थ करणारे आहे.
अशा वेळी तरुण पत्रकारांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबीयांचे आर्थिक प्रश्न, त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने आगामी काळात दोन कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचा मानस असून हा मानस पुर्ण करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांनी आपला वैयक्तिक निधी किमान १०००/- रुपये तरी पत्रकार परिषदेकडे जमा करावा, याव्यतिरिक्त राज्यातील सर्व तालुका पातळीवरील शाखांनीही भरीव निधी जमा करून पत्रकार परिषदेकडे जमा करावा असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी एस एम देशमुख यांची महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ही करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीषदेचे तालुका अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी केले तर सुत्रसंचलन वीरेंद्र गुप्ता यांनी केले. या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, तालुका शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.