अंबाजोगाई सिताफळ संशोधन केंद्रास निधी उपलब्ध करून देणार; ना. अब्दुल सत्तार यांची माहिती


महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागांतर्गत अंबाजोगाई येथे उभारण्यात आलेल्या सिताफळ संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी प्रयोगशाळेच्या अत्यावश्यक बाबी करीता परभणी येथील कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास संशोधनाअंती या अर्थसंकल्पीय केलेल्या निधीमधुन २०२२-२३ घ्या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आ. नमिता मुंदडा यांनी मागणी केलेल्या प्रस्ताव संदर्भात कळवले आहे.


या संदर्भात कृषी मंत्रालयाच्या वतीने आ. नमिता मुंदडा यांना देण्यात आलेल्या पत्रकार पुढे असे म्हटले आहे की, सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांबाबत आपण उपस्थित केलेल्या कपात सूचना क्र. ३३९७ च्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मराठवाडा विकासाच्या कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सीताफळाचा दर्जा सुधारणे व त्यावर प्रक्रिया करुन उत्पादनास फायदेशीर भाव मिळून देण्याच्या दृष्टीने सीताफळावर संशोधन व प्रक्रिया प्रकल्प हाती घेण्याचे उद्दिष्ट अंतर्भुत आहे. कोरडवाहू फळझाडांमध्ये सीताफळ हे महत्त्वाचे फळपीक असून त्याची लागवड मुख्यत्वे अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते. महाराष्ट्रात बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्ह्यात सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात सीताफळ पिकाखालील लागवडीचे क्षेत्र ६० हजार हेक्टर पर्यंत झाले आहे. लागवडीचे क्षेत्र वाढत असताना शाश्वत रोग मुक्त रोपांची निर्मिती करुन शेतकऱ्यांना पुरविणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडयातील बालाघाटाच्या डोंगररांगातील परिसर या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जमिन व हवामानदृष्टया अनुकुल आहे. त्या अनुषंगाने सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई येथील संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर विविध जातींची लागवड केली आहे. सीताफळातील प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्यामुळे सीताफळापासून बनविण्यात आलेले खाद्य पदार्थ व इतर टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित व प्रमाणित करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सीताफळाची गुणवत्ता टिकविण्यासाठी व फळे दर्जेदार राहण्यासाठी काढणीपश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया तंत्रज्ञान अधिक विकसित करणे गरजेचे आहे.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात अंबेजोगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र स्थापन करण्यास शासन निर्णय दि.०७/०१/१९९७ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सन १९९७-९८ यावर्षापासून अंबाजोगाई, जि. बीड येथे सिताफळ संशोधन केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. सदर सीताफळ संशोधन केंद्रात सीताफळाच्या विविध जातीचा संग्रह करणे, अभ्यासणे आणि जतन करणे, सीताफळ लागवडीचे आणि उत्पादनाचे आधुनिक तंत्र विकसीत करणे, अवर्षणात आणि तापमानात टिकाव धरणाऱ्या वाणांचा शोध घेणे, सीताफळातील योग्य रूट स्टॉकचा शोध घेणे, सीताफळाच्या फळावर प्रक्रिया करुन त्यांची गुणवत्ता व टिकाऊपणा वाढविणे ही या संशोधन केंद्राची उद्दिष्ट्ये असून सीताफळाच्या आणि इतर सीताफळ वर्गीय फळाच्या वाणांची उत्पादन क्षमता अभ्यासणे, अवर्षणात आणि तापमानात टिकावधरणाऱ्या वाणांचा शोध घेणे, सीताफळातील कमी बीया आणि लहान बीया असणारे वाण शोधणे, बीया नसणारे सीताफळ वाण शोधणे व विकसीत करणे, सीताफळाचा गर प्रकिया आणि चांगल्या गुणवत्तेचे गर जास्त दिवस साठवण पद्धती विकसीत करणे, सीताफळांचे काढणी नंतरचे साठवण अभ्यासणे आणि सीताफळाचे काढणी नंतरचे आयुष्यमान कशा प्रकारे फळाची गुणवत्ता कमी न होता वाढवता येईल याचा शास्त्रोक्त अभ्यास करणे या बाबतचे संशोधनात्मक कार्य अंबेजोगाई सीताफळ संशोधन केंद्रामार्फत करण्यात येत आहे. सदर सीताफळ संशोधन केंद्रात सुसज्ज अशी प्रयोगशाळा नसल्यामुळे सदर अंबेजोगाई सीताफळ संशोधन केंद्राअंतर्गत सीताफळ संशोधन प्रयोगशाळा बळकटीकरणाचा प्रस्ताव परभणी कृषि विद्यापीठाने शासनास सादर केला आहे. त्यानुषंगाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या विद्यापीठास संशोधनाकरीता अर्थसंकल्पीत केलेल्या निधीमधून अंबेजोगाई, जि. बीड येथील सीताफळ संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी प्रयोगशाळेच्या अत्यावश्यक बाबींकरीता परभणी कृषि विद्यापीठास निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून, सदरची वस्तुस्थिती सविनय आपल्या निर्दशनास आणून देण्यात येत आहे. सदरील पत्रावर कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची स्वाक्षरी आहे.
आ. नमिता मुंदडा यांनी केली होती मागणी


अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्रात सिताफळाच्या विविध प्रजातींच्या संशोधनासाठी अधिक बळकटी मिळाली यासाठी संशोधन केंद्रातील प्रयोगशाळा अधिक सुसज्ज करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी कृषी मंत्रालयाकडे केली होती. सदरील मागणीची दखल घेवून या संशोधन केंद्रास निधी उपलब्ध करून देणार असल्याच्या कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या पत्राने या कृषी विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.