अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात दिलीप बंड यांच्या अहवालानुसार शासन निर्णय घेईल; ना. धनंजय मुंडे


अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणी संदर्भात विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी दिलेल्या शिफारशी प्रमाणेच शासन निर्णय घेईल असे आश्वासन कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्माण कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.


अंबाजोगाई जिल्हा निर्मिती युवा कृती समितीने घेतला पुढाकार
अंबाजोगाई जिल्हा निर्माण युवा कृती समितीच्या वतीने अंबाजोगाई जिल्हा जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी गेली महिनाभरापासून वेगवेगळ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चा, धरणे आंदोलन आणि विविध बैठकांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अंबाजोगाई जिल्हा निर्माण कृती समितीच्या शिष्टमंडळाने बीड जिल्ह्यातील एकमेव मंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्दावे अशी मागणी पुढे आली आणि आज १३ ऑगस्ट रोजी दुपारी कृती समितीच्या एका शिष्टमंडळाने ना. धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेण्याचे निश्चित केले.


माजी आ. संजय दौंड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली ना. धनंजय मुंडे यांची भेट
जिल्हा कृती समितीच्या निर्णयानुसार माजी आमदार संजय दौंड यांच्या नेतृत्वाखाली ना. धनंजय मुंडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना ना. धनंजय मुंडे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. ना. धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळात मागील साडेतीन वर्षांच्या काळात आणि आता पुन्हा नव्याने मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच्या काळात झालेल्या दोन्ही शासनाच्या कार्यकाळात राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या आज पर्यंतच्या एका ही बैठकीत अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करण्यासंदर्भात चर्चा झाली नाही. राज्य मंत्रिमंडळासमोर महाराष्ट्रात नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र या संदर्भातील विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंव्हा येईल याबाबतची काहीही स्पष्टता अजून तरी समोर येत नाही. मात्र आपल्या मागणी नुसार आपण मला दिलेल्या निवेदनानुसार आणि त्यासोबत दिलेल्या तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी सादर केलेल्या अहवालानुसार राज्य शासन निर्णय घेईल असे स्पष्ट केले.


काय आहे दिलीप बंड यांच्या अहवालात?
यावेळी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसंदर्भात बोलतांना ना. धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की, आपण आपल्या निवेदनासोबत जोडलेल्या ६ जून २००९ रोजी दिलीप बंड यांच्या अहवालात त्यांनी मराठवाडा महसूल आयुक्तालयाचे विभाजन करून लातुर आणि नांदेड ही दोन महसूल आयुक्तालय निर्माण करावीत आणि नवीन जिल्हे निर्माण करावेत अशी शिफारस केलेली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी ही फार पुर्वीपासूनची असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापुढे राज्यातील नवीन जिल्हा निर्मिती संदर्भात चर्चा होईल त्यावेळी आपण दिलीप बंड यांनी राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार नांदेड आणि लातूर ही नवी महसुल आयुक्तालये निर्माण करुन अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी करु असे आश्वासन दिले.


अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी गेलेल्या या शिष्टमंडळात अंबाजोगाई जिल्हा निर्मिती युवा कृती समितीचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक नेते उपस्थित होते.