१९ मार्च:अन्नत्याग आंदोलन; कसे आहे हे आगळेवेगळे आंदोलन !


@ अमर हबीब
अमर हबीब हे शेतकरी चळवळीतील एक सशक्त आणि अभ्यासू नांव आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. शेती प्रश्नांचा अभ्यास केला. शेती मालाच्या किंमती ठरवण्याच्या शासनाच्या भुमिकेच्या विरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली. शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेतला आणि किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन हा उपक्रम घोषित केला. १० वर्षापुर्वी सुरु केलेल्या या उपक्रमात आज देश विदेशातील अनेक गावांतील किसान पुत्र सहभागी होतात, मात्र शासन अजूनही या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करीत नाही. या आंदोलना संदर्भात अमर हबीब यांचा हा विशेष लेख…!


शेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधले जावे म्हणून महाराष्ट्रातील, देशातील आणि विदेशातील लाखो शेतकरी आणि किसानपुत्र १९ मार्च रोजी एक दिवस अन्नत्याग-उपवास करतात. काय आहे, कसे आहे हे आगळेवेगळे आंदोलन ?
१९ मार्च हा साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांच्या सामुहिक आत्महत्येचा स्मृती दिन. १९ मार्च १९८६ रोजी एकाच कुटुंबातील सहा जणांना प्राणत्याग करावा लागला, तो काळा दिवस. साहेबराव करपे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावचे, पोटा-यात आलेला गहु वीज कनेक्शन तोडल्यामुळे वाळतांना पाहिला आणि अस्वस्थ होऊन त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. ते अनेक वर्षे गावचे सरपंच राहिलेले. घरात संगीताची परंपरा असलेले, स्वतःही भजनी मंडळात सहभागी होवून भाजने म्हणणारा हा संवेदनशील माणूस कुटुंबियांना घेऊन पवनार जवळील दत्तपूर येथे गेला, तेथेच अन्नात विष कालवून त्यांनी बायको आणि चार मुलांसह आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. साहेबरावांना वाटले होते की, सरकार शेतक-यांच्या परिस्थितीचा विचार करून सुधारणा करेल. मात्र दुर्दैवाने तसे पडले नाही.


अजूनही शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला थांबलेला नाही. दररोज ४० ते ४५ शेतकरी प्राणत्याग करतात. वर्ष २०१९-२० मध्ये तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुदैवाने महाराष्ट्र या बाबत आघाडीवर आहे. सरकार आपली धोरणे राबविण्यासाठी कायदे
करते. शेतक-यांना गुलाम करणारे, त्यांचे मूलभूत हक (मालमता, व्यावसाय व उगण्याचा नैसर्गिक हक) नाकारणारे, सीलिग, आवश्यक वस्तू विरोधी आदी किसान विरोधी कायदे करण्यात आले. त्याविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही (परिशिष्ट-१) अशी घटनादुरुस्ती करण्यात आली, शेतकऱ्यांचे हात-पाय बांधून त्यांच्या घराला आग लावली, असे भीषण वास्तव आहे. सरकारे बदलली पण कायदे बदलले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याचीच परिणीती आहे.
शेतीवर जगणे दुरापास्त झाले आहे म्हणून शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. खरे तर या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या हत्या आहेत! आमच्या देशात अनेक नको त्या मुद्यांवर वाद होतात. सत्ताधारी, पडलो तर… त्या दिवशी आपल्याला पास जाणार नाही, होना?
हो, मी देखील असाच विचार केला व २०१७ साली पहिल्यांदा एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हापासून दरवर्षी करतो. जोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबत नाही तोपर्यंत करत राहणार. पहिल्या वर्षी (२०१७) साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हान येथे उपवास सुरू करून महागाव येथे उपोषणाला बसलो.
दुस-या वर्षी त्यांनी जेथे आत्महत्या केली त्या दत्तपुर येथे भेट देऊन पवनार आश्रम येथे उपोषण केले. नंतरच्या वर्षी दिल्लीत म. गांधी समाधी (राजघाट) परिसरात उपवास केला. २०२० ला करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात म. फुले यांच्या वाड्याला भेट देऊन बालगंधर्वच्या समोर गटागटाने बसून उपोषण केले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत तोपर्यंत दरवर्षी १९ मार्चला आपण उपवास करायचा, हे नक्की.


आज शेतकरी संकटात आहे. त्याच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येक संवेदनशील नागरीकांचे कर्तव्य आहे. किसानपुत्रांची ही जवाबदारी आहे. १९ मार्च रोजी, आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना स्मरून, शेतकरी स्वातंत्र्यासाठी शेतक-यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी, एक दिवस अन्नत्याग करू या, या आपल्या भावनेचा, कृतीचा आणि संकल्पाचा दुरगामी परिणाम वाढेल.
अन्नत्याग/ उपवास कसा करावा
१) आपण उपवास करतो तसे दिवसभर वैयक्तिक अन्नत्याग करावा. (आवश्यकता वाटत असेल तर सोशल मिडियाद्वारे आपल्या मित्रांना कळवावे, त्यांनाही प्रेरणा मिळेल.)
२) शक्य असेल तर उपवास करणा-यांनी संध्याकाळी ४ ते ६ या वेळात कोठेतरी एकत्र भेटावे उपस्थितांपैकी सर्वात व्यक्तीच्या हस्ते (किंवा तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने) सरबत घ्यावे, परस्परांच्या ओळखी व्हाव्यात, गाठीभेटी व्हाव्यात, ही अपेक्षा आहे. असे उपवासाचे सांगता कार्यक्रम ठिकठिकाणी होऊ शकतील.


३) सार्वजनिक ठिकाणी बसून दिवसभर उपोषण करणार असाल तर रीतसर परवानगी काढावी. दिवसभर बसून उपवास करणा-यांनी एकत्र बसावे, पण वैयक्तिक उपवास करणा-यांना ४ ते ६ या वेळात येण्याचे सांगावे, त्यांच्या सोबत उपोषणाची सांगता करावी. दिवसभर बसणा-यांनी, “शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय” या विषयावर विचारविनिमय करावा, ‘शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तु, अधिग्रहण) या नरभक्षी कायद्यांवर चर्चा करावी किंवा “शेतकरी विरोधी कायदे” या पुस्तिकेचे सामुहिक वाचन करावे. आपल्या अवतीभोवती वणवा पेटला आहे. अशा परिस्थितीत काळाने आपल्यावरती जबाबदारी सोपविली आहे. फार नाही पण किमान एक दिवसाचा उपवास-अन्नत्याग करून
या बाबत आपल्या सहवेदना व्यक्त करू या.
हे उपोषणाचे आवाहन कोण्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या वतीने केले जात नाहीये, शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपती आहे. त्यासाठी
या देशातील नागरिक या नात्याने या उपोषणात सहभागी व्हावे. १९ मार्च रोजी चे आंदोलन हे किसान पुत्रांचे एक कर्तव्य आहे.
शाळा महाविद्यालयात कसे करावे आंदोलन
अन्नत्याग हे प्रत्येक किसानपुत्र विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा- महाविद्यालयाच्या आवारात दोन मिनिटांचे सामुहिक मौन पाळून आत्महत्या केलेल्या तमाम शेतक-यांना श्रद्धांजली अर्पण करावी, पदयात्रा व श्रद्धांजली सभांचे आयोजन करावे.
यावर्षी चा उपवास अंबाजोगाईत!


यावर्षी मी १९ मार्च रोजीच्या अन्नत्याग आंदोलनात अंबाजोगाई येथे सहभागी होणार आहे. येथील नगर परिषदेच्या आद्य कवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहाच्या समोरील मोकळ्या जागेतील चिंचेच्या झाडाखाली बसून मी दिवसभर उपवास करणार आहे. सायंकाळी चार वाजता याच निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “शेतकरी आत्महत्या कारणं आणि मिमांसा” विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रा. सौ. शैलजा बुरुरे यांच्या व्याख्यानास उपस्थित राहुन सायंकाळी याच ठिकाणी किसान पुत्रांसमवेत मी माझा उपवास सोडणार आहे. आपण ही या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.
🙏