सामुहीक उपवास, सहवेदना रॅली, व्याख्यान, पुरस्कार वितरण आणि आत्महत्या ग्रस्त शेतकरी बहिणींचा सन्मान सोहळा
किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलनात यावर्षी अंबाजोगाई शहरात सामुहिक उपवास, सहवेदना रॅली, व्याख्यान, पुरस्कार वितरण आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा सन्मान सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमांत शेकडो किसानपुत्रांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार आणि सहका-यांच्या वतीने करण्यात आले आहे.
किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्याचे अंबाजोगाईकरांचे हे आठवे वर्षे असून यावर्षी सामुहिक उपवास, सहवेदना रॅली, “शेतकरी आत्महत्या कारणं आणि मिमांसा” या विषयावरील व्याख्यान, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देणा-या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा सन्मान सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन १९ मार्च रोजी करण्यात येणार आहे.
१९ मार्च; पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद!
१९ मार्च रोजी साहेबराव करपे या शेतकऱ्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीजेचे बील भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या कुटुंबासह सामुहिक आत्महत्या केली. या १९ मार्च रोजी या घटनेला ३६ वर्षे पुर्ण होतील. शासनदरबारी ही सामुहिक आत्महत्येची नोंद शेतकरी आत्महत्या म्हणून झाली.
संवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग
शेतकऱ्यांसाठीचे जाचक ठरणारे शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या किसान पुत्र आंदोलनाने आठ वर्षांपूर्वी १९ मार्च या दिवशी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी “अन्नत्याग आंदोलन” ही चळवळ सुरु केली. या चळवळीचे हे आठवे वर्षे आहे.
शेतकरी संघटना करणार आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा बहिणींचा सन्मान
या निमित्ताने गेली ८ वर्षांपासून अंबाजोगाई शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात व देशात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने अंबाजोगाई येथे सामुहिक उपवास, सहवेदना रॅली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काम करणाऱ्या एका व्यक्ती / संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव, “शेतकरी आत्महत्या कारणं आणि उपाय” या विषयावरील व्याख्यान व शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा साडीचोळी देवून सन्मान करण्यात येणार आहे.
विविध संघटनांनी सहभागी व्हावे; आवाहन
राज्यातीलच नव्हे तर देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी अंबाजोगाई शहर व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, महिला बचतगट, राष्ट्रीय छात्रसेनेचे, राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी, रोटरी क्लबचे सदस्य, खाजगी डॉक्टर संघटनेचे सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर व किसानपुत्रांनी शेकडोच्या संख्येने या सर्व उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब, संयोजक सुदर्शन रापतवार, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, माजी सरपंच वसंत मोरे, अच्चूत गंगणे बापू, अँड. संतोष पवार, अनिरुद्ध चौसाळकर, अमृत महाजन, प्रा. डॉ . शैलजा बरुरे, संतोष बोबडे, अनिकेत डिघोळकर, महावीर भगरे, वंदना तेलंग-कोपले, शरद लंगे, राजेंद्र कुलकर्णी, बाबुराव मस्के, किरण देशमुख, रेखा देशमुख, सुभाष शिंदे, प्रा. चौधरी, अनुरथ काशिद, परमेश्वर मिसाळ, दत्ता वालेकर, बाबुराव मस्के यांच्या अनेकांनी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.