१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन समजून घ्या साहेबराव करपे यांच्या सामुहिक आत्महत्येची करुण कहाणी


आत्महत्येमागील वास्तव…
वर्धा – चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी पत्नी व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेला रविवारी (ता. १९) ३५ वर्षे पूर्ण होत आहेत.
सुमनताई अग्रवाल यांच्या टिपण्णी महत्वाच्या
वर्धा जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी असलेल्या शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या सुमनताई अग्रवाल यांना २० मार्च १९८६ रोजी सकाळीच जेंव्हा साहेबराव करपे, मालती करपे यांनी आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली असे समजले तेंव्हा सुमनताई अग्रवाल यांनी तातडीने आपले पती राधेश्याम अग्रवाल यांना सोबत घेऊन दत्तपुर येथील कुष्ठरोग धाम गाठले. पोलीस पोहोचण्यापूर्वी त्या तिथे पोहंचल्या, सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती त्यांनी गोळा केली आणि या संदर्भात टिपण्णी ही लिहीली.
आपल्या टिपण्णी मध्ये सुमनताई अग्रवाल यांनी अनेक महत्वपूर्ण नोंदी केल्या आहेत. आपल्या टिपण्णीत त्या म्हणतात,
“४० एकर शेतीचा मालक असलेला साहेबराव आत्महत्येच्या निर्णयाप्रत का आला, या प्रश्नाने संवेदनशील मनांना अस्वस्थ करून सोडले होते. या घटनेनंतर राज्यात शेतकरी आत्महत्यांची जी साखळी सुरू झाली, ती आजही अव्याहतपणे सुरू आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल, असा आशावाद साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवले होता.
पण, तो आशावाद प्रत्यक्षात आला का, याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अजूनही होकारात आलेले नाही.


४० एकर शेती, ११वर्षे सरपंच तरीही सामुहिक आत्महत्या का?
चिलगव्हाणचे सतत ११ वर्षे सरपंच राहिलेले, संगीत विशारद असलेले, उत्तम भजन गाणारे साहेबराव करपे यांचा गावात मोठा वाडा; पण भग्नावस्थेत. त्या वाड्यातच त्यांचा संसार होता. थकीत बिलापोटी एमएसईबीने वीजजोडणी खंडित केली. ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू, चणा वाळला अन् सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाले. मनाने खचले. दोन्ही पती-पत्नीने काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले.
टाळ, हार्मोनियम च्या साथीने भजने गाऊन केली कुटुंबातील सहा सदस्यांनी आत्महत्या
साहेबराव करपे पाटील नेहमी मनोहर कुष्ठधामात यायचे. १९ मार्च १९८६ रोजीही ते पत्नी व चार मुलांसह कुष्ठधामात आले. तिथे खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीने भजने गायली. सोबत आणलेल्या स्टोव्हवर पत्नीने भजे केलीत. त्यात एन्ड्रीन मिसळले. मुलांना भजे खायला दिले. एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. यानंतर साहेबराव यांनी शेतकऱ्यांच्या हलाखीच्या स्थितीचे वर्णन करणारी चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी हा निर्णय का घेतला, याविषयी सविस्तर लिहिले.


खोलीत रांगेत ५ मृतदेह ठेवले; डोक्यावर १ रु. चे नाणे ही ठेवले मग चिठ्ठी लिहून संपवले जीवन!
दोन मुले, दोन मुली (लहान मुलगी सात-आठ महिन्यांचीच होती) व पत्नीच्या मृत्यूचा घटनाक्रमही लिहिला. खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून त्यांच्या कपाळावर त्यांनी एक-एक रुपयाचे नाणे ठेवले. इतका टोकाचा निर्णय घेतानाही या प्रकरणात कुणी अकारण अडकू नये, याचे भान साहेबराव करपे यांनी ठेवले. दाराबाहेर दगडाला दोरीने बांधून फेकलेल्या चिठ्ठीच्या वरच्या भागातच त्यांनी कुणीही दार उघडू नये, पोलिसांना कळवावे, असे लिहून ठेवले होते. नंतर एन्ड्रीन मिसळलेले भजे खाऊन त्यांनीही तडफडत मृत्यूला कवटाळले.
सिस्टीम हलेल असे वाटले होते
पण… दुसऱ्या दिवशी, २० मार्च १९८६ ला सकाळी हा घटना माहीत पडली. मी व माझे पती राधेश्यामजी अग्रवाल आम्ही लगेच जिल्हा रुग्णालयात गेलो. तिथे साहेबरावांचे वृद्ध आणि पायाने अधू असलेले वडील आणि गावातील चारपाच लोक आले होते. शवचिकित्सेनंतर आम्ही एका ट्रकने सहाही मृतदेह चिलगव्हाण येथे नेले. त्याच दिवशी सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. आपल्या आत्महत्येने सिस्टीम हालेल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे काही न घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र काळवंडून गेला.”


आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन
साहेबराव करपे, मालती करपे त्यांची चार मुलं यांनी केलेल्या सामुहिक आत्महत्येला १९ मार्च रोजी ३५ वर्षे पुर्ण होतात. या सामुहिक आत्महत्येची नोंद शासन दरबारी पहिली शेतकरी आत्माहत्या अशी केली गेली. या आत्महत्येनंतर सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे चक्र आजही सतत सुरूच आहे. या मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ ही झलेली आहे. या सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
आज देशात महाराष्ट्र तर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. देशभरातील शेतकरी आत्महत्या या शेतकऱ्यांविरोधी कायदे असल्यामुळेच होतात असे एका अभ्यासाअंती लक्षात आले असल्यामुळे शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन नरभक्षक कायदे रद्द करण्यात यावेत म्हणून किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली सात वर्षांपासून १९ मार्च रोजी देशभरात अन्नत्याग आंदोलन करण्यात येते. यावर्षी या आंदोलनाचे सातवे वर्षे आहे. हे आंदोलन आता देशभरापुरतेच मर्यादित राहिले नाही तर विदेशात गेलेले अनेक किसान पुत्र किसानपुत्र या आंदोलनात सहभागी होत आहेत. आपण ही आंदोलनात सहभाग घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहानुभूती व्यक्त करायलाच पाहिजे, नाही का?