‘स्वाराती’ रुग्ण सेवा कोलमडली; फक्त अत्यावश्यक उपचार व शस्त्रक्रिया सुरु


जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागातील बहुसंख्य परिचारीका आणि इतर कर्मचारी सहभागी झाली असल्यामुळे या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पुर्णतः कोलमडली आहे. आता फक्त अत्यावश्यक रुग्णांवरच उपचार आणि शस्त्रक्रिया सुरु असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दिली.
४४० कर्मचाऱ्यांपैकी ३६२ कर्मचारी संपावर; ३५ कर्मचारी पुर्व परवानगीने रजेवर


१९९५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांना या बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. या संपात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागातील वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या महाविद्यालय व रुग्णालय विभागात वर्ग ३ आणि वर्ग ४ चे एकुण ४४० कर्मचारी असून त्यापैकी ३६२ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. एकुण कर्मचाऱ्यांपैकी ३५ कर्मचारी हे पुर्वपरवानगीने रजेवर गेलेले आहेत तर ४३ कर्मचारी हे संपावर न जाता कार्यालयीन कामकाजात सहभागी झाले आहेत.
डॉक्टर कामावर मात्र यंत्रणा ठप्प !


स्वाराती रुग्णालय विभागात एकूण २९८ परीचारीका असून त्यापैकी २६१ परिचारीका संपात सहभागी झाल्या आहेत. यापैकी ३१ परिचारीका या पुर्वपरवानगीने रजेवर गेलेल्या आहेत तर फक्त अधिसेविका उषा भयाने यांच्या सह फक्त ६ परिचारीका या कार्यालयीन कामकाजात सहभागी घेत आहेत.
२९८ परिचारीकांचा संपात सहभाग


स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स आणि वर्ग दोन आणि वर्ग १ चे अधिकारी सेवेत आहेत. मात्र या डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या ९० टक्के परिचारीका संपात दाखल झाल्या असल्यामुळे रुग्णालयातील अंतररुग्ण सेवा, शस्त्रक्रिया पुर्णतः ठप्प झाली आहे.


प्रशिक्षणार्थी परिचारीकांवर रुग्ण सेवा सुरू; अधिसविका उषा भताने
स्वाराती रुग्णालय विभागातील २९८ तज्ञ परिचारीका संपात सहभागी झाल्या असल्यामुळे आता रुग्णालयाची भिस्त परिचारीका महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या ५८ परिचारीकांवर येवून पडली आहे. रुग्णालयाच्या अधिसेविका उषा भताने, परिचारीका महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि संपात सहभागी न झालेल्या इतर चार तज्ञ परिचारीकांच्या मार्गदर्शनाखाली आंतररुग्ण विभागातील रुग्ण सेवा सुरू आहे. या ५८ परिचाकांना सहकार्य करण्यासाठी शहरातील तीन खाजगी परिचारीका महाविद्यालयातील ७२ परिचारीका आज पासून कामावर रुजू झाल्या आहेत. स्वाराती महाविद्यालयाच्या परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी परिचारीकांच्या मार्गदर्शनाखाली या ३ खाजगी परिचारीका महाविद्यालयातील ७२ प्रशिक्षणार्थी परिचारीका काम करतील असे नियोजन लावण्यात आले असल्याची माहिती अधिपरिचारीका उषा भताने यांनी दिली.
फक्त अत्यावश्यक उपचार व शस्त्रक्रिया सुरु; अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे


स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी संपावर गेले असल्यामुळे रुग्णसेवेत ताण येवू लागला आहे. महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स कामावर असले तरी रुग्णसेवेचा कणा असलेल्या परिचारीका संपात सहभागी झाल्या असल्यामुळे आंतररुग्ण कक्षात फक्त अत्यंत आवश्यक असलेल्या रुग्णांनाच दाखल करुन घेण्यात येत आहे. तसेच सर्वसाधारण शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या असून अत्यावश्यक शस्त्रक्रियाच फक्त करण्यात येत आहेत. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.