स्वाराती महाविद्यालयास १०० बेड चे क्रिटीकल केअर हॉस्पिटल मंजूर


येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र शासनाच्या पंतप्रधान एबीएचआयएम या योजनेअंतर्गत १०० बेड चे क्रिटीकल केअर हॉस्पिटल मंजूर करण्यात आले असून सदरील हॉस्पिटल निर्मितीसाठी ४ कोटी रुपये खर्चून तातडीने नवीन इमारत उभी करण्यात यावी अशा सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा व अभियान संचालक कार्यालयाच्या वतीने अधिष्ठाता कार्यालयास मिळाल्या आहेत.
या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक कार्यालयाच्या वतीने दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी च्या संदर्भीय पत्रानुसार कळविण्यात आले आहे की, वित्तीय वर्षे २०२२-२३ मध्ये केंद्र शासन पुरस्कृत पीएम एबीएचआय एम या योजने अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर झाले असून या हॉस्पिटल च्या नवीन बांधकाम करण्यासाठी महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात २५०० चौरस मिटर जागा आवश्यक आहे. सदरील इमारत उभारणीसाठी साइट असाएसमेंट पुर्ण करण्याच्या दृष्टीने सदरील जागा त्वरीत उपलब्ध करून देण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे.
सदरील योजनेकरीता जेपीइगो ही डेव्हलपमेंट पार्टनर संस्था तांत्रिक बाबतीत मदत करणार असून त्यांच्या तंत्राच्या मदतीने मंजूर ठिकाणी भेट देवून पायाभुत सुविधा विकास कक्ष यांनी डीपीआर तयार करून सदर क्रिटीकल केअर हॉस्पिटल अंदाज पत्रक तयार करुन बांधकाम करण्यात येणार आहे.


४ कोटीची होणार नवी इमारत
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात २५०० चौ मी क्षेत्रात ४ कोटी रुपये खर्चून दोन मजली क्रिटीकल केअर हॉस्पिटल साठी नवी इमारत उभारण्यात येणार आहे.
१०० बेड ची होणार व्यवस्था
सदरील क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये ग्राउंड फ्लोअर ला ५० बेड तर फस्ट फ्लोअर ला ५० बेड अशी एकूण १०० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर १० बेड चाआयसीयु झोन (पीडियाट्रीक साठी २ बेड आरक्षीत), ६ बेड चा एचडीयु झोन (पीडियाट्रिक साठी २ बेड आरक्षीत), २५ बेड चा आयसोलेशन वॉर्ड, दोन स्वतंत्र रुम, २ बेड ची डायलेसिस रुम, २ बेड ची एमसीएच रुम, ५ बेड ची इमरजन्सी रुम, डॉक्टर, परिचारीका, औषध सामग्री, स्वच्छता व इतर आवश्यक बाबींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.