स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कॉंग्रेस ला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष; सोनिया गांधी यांचे सुतक विधान!


भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाची मोठी वाताहत झाली. अनेक नेते काँग्रेस सोडून बाहेर पडले. त्यातच मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. आता काँग्रेसअध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार असून ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी नेता विराजमान होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार मुकूल वासनिक यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीच्या प्रभारी पदावरून मुक्त केलं आहे. त्यांच्या जागी जेपी अग्रवाल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र सोनिया गांधी यांच्या या निर्णयामुळे वासनिक काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी पक्षातून होत आहे. तर अशोक गेहलोत यांचं देखील नाव चर्चेत आहे. मात्र आता कोणाची वर्णी लागते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र या दोघांनी नकार दिल्यास वासनिक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. असं झाल्यास, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा विराजमान होऊ शकतो.


याआधी पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षविरोधी विधान केल्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याचं बोललं जात आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्ष करण्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र नव्या घडामोडींमुळे मुकूल वासनिक यांचे नाव पुढे आले आहे. वासनिक हे तीनवेळा खासदार राहिलेले आहे. तसेच सर्वात कमी वयात संसदेत पोहोचलेले खासदार अशी त्यांची ओळख आहे.दरम्यान काँग्रेसची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत असून या यात्रेत राहुल साडेतीन हजार किमी प्रवास करणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा असून ती १२ राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेनंतरही अध्यक्षपदाचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता वाढली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव रेसमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर काँग्रेस वर्तुळात सोनिया गांधींच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आल्यावर, राहुल गांधी यांनी पुन्हा ही कमान सांभाळण्यास नकार दिला आणि अशोक गेहलोतही पद स्वीकारण्यास नाखुष राहिले, तर स्टँडबाय व्यवस्था म्हणून वासनिक यांना जबाबदारी देता येईल का याची चाचपणी सुरु आहे, असे पक्षाच्या एका सदस्याने सांगितले.
दरम्यान, मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशच्या प्रभारी पदावरुन मुक्त करण्याचे दुसरे कारण आहे. राज्यसभा सदस्य झाल्यानंतर त्यांना इतर कामं कमी करायची असल्याने फेरबदल करण्यात आले, असं अन्य पदाधिकाऱ्याने सांगितलं.
कोण आहेत मुकुल वासनिक?
मुकुल वासनिक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. बुलडाण्यातून तीन वेळा खासदारकी भूषवलेल्या बाळकृष्ण वासनिक यांचे ते सुपुत्र आहेत. मुकुल वासनिक २००९ मध्ये नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी बुलडाणा मतदारसंघातूनही ते तीन वेळा खासदार राहिले आहेत. १९८४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी संसदेची पायरी चढणारे ते सर्वात तरुण खासदार ठरले होते. सध्या ते राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत.
मुकुल वासनिक यांच्याकडे १९८४ मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूए) च्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. तर १९८८ मध्ये भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी वासनिक यांना देण्यात आली होती. मुकुल वासनिक यांचं नाव गेल्या दोन-तीन वर्षांपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. वासनिक यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवलं आहे. त्यांना प्रशासकीय कामाचाही दांडगा अनुभवही आहे.