संदीप कुलकर्णी यांनी सशक्त अभिनयाने उभा केला “सत्यशोधक”
समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे, संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री ही शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित निर्माण करण्यात आलेला चित्रपट “सत्यशोधक” (Satyashodhak) पाहण्याचा दोन दिवसांपुर्वी योग आला.
सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारीला साजरी झाली. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून 5 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे.
‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या पोस्टरवर अभिनेते संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) यांचे जोतिबा फुले यांच्या भुमिकेतील छायाचित्रे पाहीले आणि संदीप याने साकारलेली जोतिबांनी भुमिका पाहण्याचा मोह अनावर झाला. ज्योतिबा सारखे हुबेहुब दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या संदीप कुलकर्णी यांच्या लूकची आणि त्यांनी साकारलेल्या जोतिबा यांच्या भुमिकेची चर्चा सध्या फुले शाहु आणि आंबेडकर प्रेमींमध्ये होत आहे.
संदीप कुलकर्णी यांना जोतिबा यांची वेशभूषा आणि रंगभूषा अगदी योग्य जमून आल्याने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भुमिकेला न्याय मिळाला असे चित्रपट पहाताना सतत जाणवत राहते.
‘‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली…’’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणारे, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातिभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची कवाडं खुली करून देणारे महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर ते त्याच्याही पलिकडे खुप मोठे आहे. थोर व्यक्ती अंगी थोरपणा घेऊनच जन्माला येत नाहीत. सर्वसामान्यांसारखंच त्यांचंही आयुष्य असतं, मात्र योग्य वेळी योग्य विचार देणाऱ्या व्यक्ती, पुस्तकं त्यांच्या आयुष्यात येतात. आणि त्यांचं जीवन बदलुन जातं.
एका महात्म्याच्या आयुष्याचा वेध घेताना त्याची जडणघडण कशी झाली? शिक्षणामुळे मिळालेले विचार आणि स्वत:च्या सखोल निरीक्षणं, अभ्यासातून त्याने कमावलेले विचार समाजात कसे झिरपत गेले याचे अत्यंत सहज आणि वास्तवदर्शी पद्धतीने केलेले चित्रण ‘सत्यशोधक’ या चित्रपटात पाहायला मिळते.
नीलेश जळमकर लिखित, दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ चित्रपटाची सुरुवातच पुण्यातील एका सुस्थितीतील कुटुंबाच्या वाड्यातील विवाह सोहळ्याने होते. तेरा वर्षांचा जोती आणि सावित्री या दोन शाळकरी वयातील मुला-मुलीचा हा विवाह! जोतीची हुशारी, त्याचा चुणचुणीतपणा लहानपणापासूनच लपत नाही. मिशनरी शाळेत शिकणाऱ्या जोतीचे मित्र उच्चवर्णीय आहेत. या शाळेत कुठलीही जातपात त्यांच्या मैत्रीच्या आड येत नाही. मात्र शाळाबाह्य जीवन जगताना एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नात पहिल्यांदाच ज्योतीला आपण उच्चवर्णी नाही याचा साक्षात्कार होतो. उच्च-नीच जाती या त्याच्या मनाला तोवर न शिवलेला विचार या प्रसंगाने त्यांच्या मनात प्रवेश करतो! या विचाराने मनात प्रवेश केल्यानंतर जोतिबा च्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता अधिक वाढत जाते. या अवस्थेतुन जात असताना आणि सगळ्यांपासून एकाकी पडलेल्या जोतिबा च्या हातात त्यांच्या मशनरी शाळेतील एक शिक्षक थॉमस पेन लिखित ‘’राइट्स ऑफ मॅन’’ नावाचं एक पुस्तक त्याला वाचण्यासाठी देतात. शिक्षणच मनातील अंधार दूर करू शकतं असं ही सांगतात. हे पुस्तक वाचल्यानंतर जोती चा जोतिबांपर्यंतचा खरा प्रवास सुरू होतो.
या चित्रपटात जोतिबा फुले यांचा फक्त जीवनप्रवास उलगडतो असं नाही तर मिशनरी शाळेतून एकत्र शिकणाऱ्या या मुलांचे विचार कसे होते? जातीभेदापलीकडे असलेली त्यांची मैत्री तत्कालीन समाजव्यवस्थेचे वास्तव लक्षात आल्यानंतर त्यांच्यात दुरावा कशी निर्माण करते, विचारांच्या आणि शिक्षणाच्या मदतीने हा दुरावा कसा दूर झाला? शोषितांसाठी शाळा सुरू करताना हेच जोतिबांचे शाळकरी सवंगडी कसे त्यांच्या बरोबर होते आणि तरीही एका वळणावर सुशिक्षित मित्रांमध्येही धार्मिक-सामाजिक मतवैविध्यांमुळे अंतर कसे पडत जाते या सर्व घटना प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात लेखक-दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी केला आहे.
वास्तविक पहाता चरित्रपट निर्माण करताना कोणत्याही थोर पुरुषाचे समग्र आयुष्य त्यात एकवटणं कधीही आणि कुणालाही शक्य नाही. हे अशक्यप्राय काम आहे. त्यामुळे असे चरित्रपट निर्माण करतांना नुसत्याच घटना न मांडता त्यातून नेमकं काय लक्षात घ्यायला हवं याचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. नेमका हाच विचार करत नीलेश जळमकर यांनी चित्रपटाचे कथालेखन केलं आहे असे वाटते. अगदी मोजक्या आणि महत्त्वाच्या घटनांची मांडणी करत जोतिबांचे विचार प्रत्यक्ष शोषितांसाठी करत असलेल्या कार्यातून, त्यांच्या दररोजच्या जगण्या वागण्यातुन कसे बदलत जातात याचं यथोचित चित्रण जळमकर यांनी केलं आहे. शुद्रातिशुद्र हा भेदाभेद या तळागाळातील समाजाच्या विकासात अडसर कसा ठरतो आहे? त्यासाठी त्या त्या समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम उच्चवर्णीयांकडून कशा पद्धतीने केलं जातं आहे? हे वेळोवेळी दाखवण्याचं काम या चित्रपटात जोतिबांनी केलं आहे. विधवांचं केशवपन, देवदासी प्रथा, सतीची प्रथा बंद झाल्यावरही घरच्याच पुरुषांकडून होणारं विधवा स्त्रियांचं लैंगिक शोषण, विधवा विवाहास मान्यता नसल्याने शारीरिक गरजांपोटी या शोषणाला बळी पडणाऱ्या स्त्रिया, त्यातून जन्माला येणाऱ्या मुलांच्या माथी लिहिलेलं मरण वा अनाथपण अशा कितीतरी समस्या ओळखून त्यावर उपाय करणारे कणखर जोतिबा या चित्रपटात आपल्याला दिसतात.
जोतिबांच्या विचारांशी एकरूप झालेल्या सावित्रीबाईंची भुमिका
राजश्री देशपांडे यांनी तेवढ्याच सशक्तपणे साकारली आहे. जोतिबा यांच्या जीवनात प्रत्येक पावलावर सावित्रीबाई यांनी दिलेली खंबीर साथ, केवळ शिक्षण नव्हे तर अर्थबळही या वर्गाला हवं म्हणून त्यांच्यासाठी व्यवसाय सुरू करत स्वावलंबी अर्थकारणाला त्यांनी दिलेली चालना, वैचारिक मतभेदांमुळे सत्यशोधक समाजाचं अर्धवट राहिलेलं काम, सत्यशोधक धर्माचा विचार पोहोचवण्यासाठी ज्योतिबांनी केलेलं लिखाण असे कितीतरी पैलू या चित्रपटातून उलगडण्याचे काम या चित्रपटाने केले आहे.
अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी ज्योतिबांचा चेहरा, त्यांची विश्वासपूर्ण देहबोली, त्यांचे करारी विचार, अन्यायाची चाड असलेलं निगर्वी व्यक्तिमत्त्व असे कित्येक पैलू आपल्या समर्थ अभिनयातून प्रभावीपणे साकारले आहेत. सावित्रीबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनीही त्यांना यथोचित साथ दिली आहे. जोतिबाच्या भुमिकेतील बाल कलाकारानेही खूप चांगले काम केलं आहे. जोतिबा यांच्या वडिलांची भुमिका तर रवींद्र मंकणी यांनी अगदी ताकदीने साकारली आहे. या शिवाय अमोल बावडेकर, अनिकेत केळकर, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, सिध्देश झाडबुके असे कित्येक परिचयाचे आणि काही अनोळखी कलाकारांचे चेहरेही या चित्रपटातून एका वेगळ्याच भुमिकेतून पाहायला मिळाले.
प्रत्येक व्यक्ती शेवटी मरतच असतो. व्यक्ती मेला तरी त्याचे विचार मरत नाहीत. जोतिबा यांचा सार्थ विचार प्रेक्षकांसमोर ठेवताना प्रत्येक चांगला विचार, चांगली चळवळ समाजात कशी रुजत जाते, पुढे जात राहते हे मांडण्याचा उत्तम प्रयत्न “सत्यशोधक” या चित्रपटातून करण्यात आला आहे. जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावरील “सत्यशोधक” चित्रपट सर्व वयोगटातील लोकांनी पहावा असा नक्कीच आहे.
🙏