संकलेश्वर मंदिरास राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव


अंबाजोगाई येथील संकलेश्वर (बाराखांबी) मंदीरास राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे असा प्रस्ताव पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास सादर केला असून लवकरच या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे पत्र


या संदर्भात पुरातत्व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचीवांना दि. १३ एप्रिल २०२३ रोजी पत्र क्र.तंत्र २०२२-२३/प्रा.अ.प्र.- संकलेश्वर मंदिर ९८६ नुसार पाठवलेल्या प्रस्तावात पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये कळविण्यात येते की, सकलेश्वर (बाराखांबी) मंदिर, अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतचा प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव सहाय्यक संचालक (पुरातत्व), औरंगाबाद विभाग यांच्याकडून संदर्भ क्र. १ अन्वये संचालनालयास प्राप्त झाला आहे.


अंबेजोगाई येथील संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर हे सध्याच्या प्रदेशातील यादवकालीन सुंदर महत्त्वाचे स्थापत्य आहे. सदर मंदिराचा सभामंडप बारा स्तंभावर उभारलेला असल्यामुळे मंदिरास बारखांबी हे नाव रूढ झाले आहे. स्तंभ अतिशय कलात्मक असून काही स्तंभावर स्त्रीशिल्पे कोरण्यात आलेली आहेत. यादवकालीन एका शिलालेखातील उल्लेखानुसार मंदिरांचे बांधकाम इ.स. १२२८ मध्ये करण्यात आले असावे. या मंदिराचा सभोवताल व पुरातन अवशेष पाहता या ठिकाणी एकूण पाच मंदिरांचा समूह असावा असा अंदाज आहे.


या अनुषंगाने संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर, अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड याचे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन हे स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे असा संचालनालयाचा अभिप्राय आहे. सबब, सदर स्मारक राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याबाबत शासकीय स्तरावर मान्यता असावी, असे म्हटले आहे.
संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर, अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड हे स्मारक ‘राज्य संरक्षित स्मारका म्हणून घोषित करावयाच्या प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव द्विप्रतीत मराठी व इंग्रजी अधिसूचना व आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्यात येत आहे. कृपया ही प्राथमिक अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी व शासकीय मुद्रणालयास सदर प्राथमिक अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करून त्याच्या ३० प्रती या संचालनालयाला देण्याबाबत निर्देश व्हावे, अशी विनंती या प्रस्तावात करण्यात आली आहे.
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला आले यश


अंबाजोगाई येथे इ.स. १२२८ मध्ये यादवकालीन काळात उभारण्यात आलेल्या संकलेश्वर मंदिराची पडझड सुरु झाली असता व या मंदिराचे उत्खननास पुरातत्व विभागाने सुरु केली असता या मंदीरास राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासनाने घोषीत करावे यासाठीचा पाठपुरावा विद्यमान आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी पुरातत्व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे सातत्याने केला होता. आता सदरील पत्र प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातील अधिसूचना तातडीने काढण्यात यावी असे पत्र ही आपण पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास दिले असल्याची माहिती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी “माध्यम”शी बोलताना दिली.