श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सवास ३० नोव्हेंबर रोजी प्रारंभ
योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवाची जय्यत तयारी सुरू
अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच महोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विपीन पाटील,सचिव अँड शरद लोमटे यांनी दिली.
३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत योगेश्वरी देवीच्या मंदिरात आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या परंपरेनुसार किमान ५ ते ७ हजार महिला सलग नऊ दिवस मंदिरातच निवासासाठी आराध राहून असतात. या महोत्सवाच्या कालावधीत आराध राहणाऱ्या या महिलांची व्यवस्था योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने केली जाते. निवासव्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वच्छता या बाबी समोर ठेवून मंदिर प्रशासनाची उपाययोजना सुरू आहे. तसेच महोत्सवाच्या कालावधीत दररोज किर्तन, प्रवचन, भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर रविवारी सकाळी १० वाजता वर्णी महापूजेने महोत्सवास प्रारंभ होणार आहे तसेच सलग आठ दिवस विविध उपक्रम मंदिरात राबविले जातात. ७ डिसेंबर रोजी महोत्सवाची सांगता होम-हवन व महापूजेने होऊन, सायंकाळी सहा वाजता योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक शहरातून काढली जाते.
योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवाच्या या सर्व उपक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष विपीन पाटील,, सचिव अँड शरद लोमटे,उपाध्यक्ष गिरीधारीलाल भराडीया व विश्वस्तांनी केले आहे.
सलग दोन वर्षे आराध बसण्यात खंड:
कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधा मुळे सलग दोन वर्षे श्री.योगेश्वरी देवीच्या मंदिरात आराध बसणाऱ्या महिलांना परवानगी देण्यात आली नव्हती.दोन वर्षानंतर खुल्या वातावरणात हा मार्गशीर्ष महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.