वैजनाथ काळे यांची आत्महत्या


स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह विभागातील तृतीय श्रेणी कर्मचारी वैजनाथ अनंत काळे याने महाविद्यालयाच्या पी जी बॉईज वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिपावली शुभारंभाच्या सकाळी घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वैजनाथ अनंत काळे हे गेली २० ते २५ वर्षांपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांची ड्युटी पी.जी. वसतिगृह विभागात होती. वैजनाथ काळे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटी साठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आले, आपल्या सहका-यांशी गप्पा मारुन ते वसतिगृहाकडे गेले. वसतिगृहात कार्यरत असलेल्या इतर कर्मचा-यांशी त्याने गप्पा मारल्या आणि फ्रेश होण्यासाठी ते वसतिगृहाच्या रुम मध्ये गेले. बराच वेळ झाला तरी ते आले नाही हे पाहून इतर कर्मचाऱ्यांनी त्या रुमचा दरवाजा उघडला असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
सदरील घटनेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने वरीष्ठ अधिकारी व सुरक्षा विभागाला दिली. या प्रकरणी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मयत वैजनाथ काळे यांच्या पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मयत वैजनाथ काळे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अजून स्पष्ट झाले नाही. या बाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.