राष्ट्रीय

राहुल गांधी यांच्या “भारत जोडो” पदयात्रेचे योग्य मुल्यमापन व्हायला हवे!

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची कन्या कुमारी ते जम्मु काश्मीर अशी साधारणतः ३,५७० किमी अंतराची “भारत जोडो” पदयात्रा ८ सप्टेंबर रोजी सुरु झाली आहे. ही पदयात्रा १२ राज्यातुन जाणार असून १५० दिवसात हे अंतर कापण्याचा राहुल गांधी यांचा विचार आहे. ३,५७० किमी हे अंतर १५० दिवसात पार करायचे आणि फेब्रुवारी महिन्यात जम्मु काश्मीर ची राजधानी श्रीनगर येथे या भारत जोडो पदयात्रेचा समारोप करायचा असा त्यांचा संकल्प आहे. म्हणजे राहुल गांधी यांना प्रतिदीन साधारणत: २४ किमी अंतर चालावे लागेल.
वैद्यकीय शास्त्रानुसार एका निरोगी व्यक्तीस १ किमी अंतर सर्वसाधारण गतीने चालण्यास १५ मिनिटे लागतात. याचा अर्थ १ तासात ४ किमी अंतर सहज चालता येवू शकते. या गतीने २४ किमी अंतर चालण्यास किमान ६ तास लागतील. पण हे अंतर चालत असतांना वाटेत भेटणारे ग्रामस्थ, पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी होणार संवाद, जेवणखाण व इतर कामांसाठी लागणारा वेळ गृहीत धरावा लागेल.
वास्तविक स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपली भारत जोडणी चालुच आहे. त्यात आता राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो पदयात्रा ही केवळ वर्षभर अभ्यास न करणा-या मुलाने परीक्षेची आदली पुर्ण जागून काढुन अभ्यास करावा अशी काहीशी आहे.
भारतात पदयात्रेला अनन्य साधारण महत्व आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणत: ४२ वर्षांपुर्वी जनता पक्षाचे त्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नंतर अशी समग्र भारतजोडो पदयात्रा आज पर्यंत कोणी काढलेली नव्हती. एकेकाळी समाजवादी आणि गांधीवादी यांच्या भरपुर पदयात्रा निघत. मात्र त्या भारत जोडो नव्हत्या. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि चंद्रशेखर यांनी यापुर्वीच काढलेल्या पदयात्रा सतत चर्चेत असतात. १९९० च्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली भारतजोडो रथयात्रा त्या काळी खुप गाजली होती. या रथयात्रेचे सारथ्य अंबाजोगाईचे भुमी पुत्र माजी केंद्रीय मंत्री कै. प्रमोद महाजन आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होते. पण ती रथयात्रा असल्यामुळे पदयात्रेशी यांचा फारसा संबंध येत नाही. अलिकडे नव्या पिढीतील राजकारण्यांनी काढलेल्या पदयात्रेत आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांनी काढलेल्या पदयात्रेचा उल्लेख करावा लागेल.


यासर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो पदयात्रेचे योग्य मुल्यमापन व्हायलाच हवे! राहुल गांधी यांनी काढलेल्या या पदयात्रे कडे “दुभंगलेल्या कॉंग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ होवून भाजपाशी दोन हात करु शकेल का?” या आणि “या पदयात्रे ने काय साधणार?” या दोन प्रश्नांना दुर ठेवून राहुल गांधी यांच्या या पदयात्रेत डे पहायला हवे. या दोन प्रश्नांना दुर ठेवून राहुल गांधी यांच्या पदयात्रेकडे पाहीले तरच त्याचे महत्त्व समजेल.
३,५७० किमी अंतराची सलग तीन महिने पदयात्रा काढायची, रस्त्यावर येणाऱ्या गावात रस्त्यावरच मुक्काम करायचा, असे करत करत उभि देश पिंजून काढायचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला याचे कारण असे करण्यावाचुन त्यांच्या समोर काही पर्याय नव्हता, असे क्षणभर आपण गृहीत धरु. कॉंग्रेस पक्षाची मागील आठ वर्षात झालेली वाताहात पहाता एखाद्या पक्षाची संपूर्ण पंख गळुन पडल्यानंतर त्यास पुन्हा उडणे सोडा साधे जीवंत राहण्यासाठी जशी धडपड करावी लागते अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला नवी उभारी मिळवून देण्यासाठी अशा अघोरी उपायांचीच अंमलबजावणी करावी लागते.
राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या या भारत जोडो पदयात्रेचे काळातच कॉंग्रेस पक्षाच्या रखडलेल्या पक्षांतर्गत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीत आपण अध्यक्ष पदाचे उमेदवार नाही असे राहुल गांधी ठासून सांगत असले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांचाच यावर विश्वास नाही. राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन अप्पा खरगे यांनी राहुल गांधी यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण राहुल गांधी हे त्यांच्या मतांवर ठाम राहतात की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. या निवडणुकीत अध्यक्षपदाचा निर्णय काहीही लागला तरी कॉंग्रेसी राजकारणाचे केंद्र आपल्या भोवतीछ राहील याचा विश्वास राहुल गांधी यांना या पदयात्रेतून मिळणार आहे. कॉंग्रेस पक्षाच्या हितासाठी गांधी कुटुंबातील एका सदस्याने मध्यवर्ती भुमिकेत असावे या कॉंग्रेसी धारणेत अजूनही फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही.


तसे पाहिले तर प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत काहीही ना काही कार्यक्रम द्दावेच लागतात. तसे केले नाही तर कार्यकर्ते सैरभैर, दिशाहीन होतात आणि नेत्यासह पक्षाकडे ही संशयाने पाहु लागतात. कॉंग्रेस पक्षाकडुन ही चुक सतत गेली १० वर्षांपासून होत आली आहे. यांच्या कारणांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर सोनिया गांधी यांच्या आजारपण आणि राहुल गांधी यांनी पक्षाकडे केलेले दुर्लक्ष ही दोन प्रमुख कारणे देता येतील. अशा अवस्थेत कॉंग्रेस पक्षाशी गेली अनेक वर्षे एकनिष्ठ झालेले नेते आणि कार्यकर्ते सैरभैर झाले. अनेकांनी भाजपाची वाट धरली. आश्चर्य म्हणजे राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते हे सर्व तटस्थपणे पहातच बसलेले दिसून आले. पक्षाची धुरा चालवणारा कॅप्टन आपले विमान व्यवस्थित चालवण्याऐवजी चालकाच्या जागेवर न बसता शेजारी खुर्चीवर बसून तटस्थपणे आपतील प्रवाशांची विमनस्क अवस्था पहात बसावा अशी काहीशी अवस्था कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची आज झाली आहे. कॉंग्रेसचे हे विमान या भुमिकेमुळे गेली १० वर्षे जागच्या जागीच थबकुन आहे.
वास्तविक राहुल गांधी यांनी ही भारत जोडतो ही पदयात्रा २०१४ साली कॉंग्रेसचा पहिला पराभव झाला त्याच वेळेस काढावयास हवी होती. तेंव्हा हे केले असते तर आपला नेता पक्षासाठी काहीतरी करतोय, हातपाय हलवतो आहे हे दिसून आले असते. पक्षाचे नुकसान काही प्रमाणात तरी कमी झाले असते. पण या काळात राहुल गांधी यांनी काहीच केले नाही, ते सतत निष्क्रिय राहील्याचे सतत दिसून आले. याचा गंभीर परिणाम कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि पक्षाच्या कार्यक्षमतेवर ही झाला. कॉंग्रेस पक्षाकडून एखादी निवडणुक लढवावी का नाही असा संभ्रम निर्माण होण्याइतपत कार्यकर्ते सैरभैर झाले. कॉंग्रेसच्या ज्या कार्यकर्त्यांना आपल्या राजकीय भवितव्याची काळजी होती ते कॉंग्रेसची साथ सोडून भाजपावासी झाले. याही परिस्थितीत जे नेते- कार्यकर्ते इतर पक्षाकडे जावू लागले त्यांना थांबवण्यासाठी ही कॉंग्रेस नेतृत्व काही करतांना दिसून आले नाही. एकंदरीत पक्षात आहेत त्यांना किंमत नाही आणि जे पक्षत्याग करुन गेलेत त्यांच्या पक्षत्यागाची काही दखल नाही अशी काहीशी अवस्था कॉंग्रेस पक्षाची झाली आहे.
आपल्या देशात एखाद्या पक्षाचा नेता कसा असावा याचे काही अलिखीत नियम, संकेत बनवल्या गेले आहेत. या संकेताप्रमाणे नेता सतत काही तरी करतांना कार्यकर्त्यांना दिसला पाहिजे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले, नाही आले तरी चालेते. पण नेत्याने प्रयत्नच थांबललेले कार्यकर्त्यांना अनुयायांना चालत नाही. असे सतत दिसून आले तर कार्यकर्ते, अनुयायी दुस-या नेत्यांच्या, पक्षाच्या शोधात बाहेर पडतात‌. राहुल गांधी यांनी मधल्या काळात दाखवलेल्या निष्क्रीयतेच्या काळात कॉंग्रेस पक्षात नेमकं हेच घडले आणि आजची स्थिती निर्माण झाली.


कॉंग्रेस पक्षावर आज आलेले हे मळभ दुर करण्यासाठी आता राहुल गांधी यांनी ३,५७० किमी ची भारत जोडो पदयात्रा आता सुरु केली आहे. त्याकाळात दिवसाचे २४ तास राजकारण करावयाचे त्या काळात राहुल गांधी यांनी अर्धवेळ आणि हौशी राजकारण केले आणि त्यामुळेच कॉंग्रेसची ही वाताहात झाली असा आरोप कॉग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांकडुन आता होवू लागला आहे. आपण केलेली चुक ही राहुल गांधी यांना उमजली असावी आणि या सर्व गोष्टींचे भान राहुल गांधी यांना आले असावे आणि या जाणीवेतून ही पदयात्रा काढण्यात आली असावी. मराठी भाषेत “जो चालतो त्याचे नशीब चालते” असे एक सुभाषित आहे. आता कॉंग्रेस पक्षासाठी राहुल गांधी यांनी ३,५७० किमी अंतराची भारतजोडो पदयात्रा सुरु केली आहे. उशीराने का असेना पक्षासाठी, देशासाठी कॉग्रेसची नेतृत्वास असे जमिनीवर चालण्याची गरज वाटली हे महत्त्वाचे आहे. कॉंग्रेस नेतृत्वाच्या या पदयात्रेने का होईना आता कॉंग्रेस पक्ष पुन्हा चालेल का हे आता पहावे लागेल.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker