राज्यसभेची उमेदवारी मिळवणारे डॉ. अजित गोपछडे नेमके आहेत कोण?


भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी घोषित केल्यानंतर ते एकदम संपुर्ण देशात चर्चेत आले आहेत. मराठवाड्यात भाजपाचे प्राबल्य वाढत चालले असतांना भाजपाचा ओबीसींचा चेहरा म्हणून डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची दिलेली उमेदवारी ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभ शकुन ठरणारी आहे. डॉ. अजित गोपछडे यांच्या माध्यमातून भाजपाने ओबीसी चा एक कार्यक्षम चेहरा महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर संपुर्ण देशात चर्चेत आलेले डॉ. अजित गोपछडे हे नेमके कोण आहेत हे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करू या. डॉ. अजित गोपछडे हे नांदेड जिल्ह्यातील बोलोली या गावचे. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे लहानपणापासूनच अजित यांच्या रक्तामध्ये जाज्वल्य देशप्रेमाची आणि देश अभिमानी बीजे रुजली.
शालेय माध्यमिक शिक्षण घेत असताना गुणवत्ता यादीतील आपला क्रमांक टिकवत अजित यांनी उच्चमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये सर्वोच्च स्थान मिळवत वैद्यकीय महाविद्यालयातील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.


औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस ही पदवी उत्तीर्ण करीत त्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात बालरोग विभागातील पदवीचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षणातील पहिली पासून ची गुणवत्ता त्यांनी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणापर्यंत टिकवली. बालरोग विभागातील पीजी पदवी त्यांनी विद्यापीठात सर्वप्रथम येत सुवर्णपदक घेत मिळवली.
अजित गोपछडे हे शालेय महाविद्यालयीन शिक्षणापासून विद्दार्थी चळवळीत सदैव अग्रेसर असत. विद्दार्थी प्रतिनिधी होत विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची फॅशन त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्दार्थी संघटनेचे ते सक्रिय पदाधिकारी राहीले. तर वैद्यकीय शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करत असतांना महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर विद्दार्थी संघटनेचे (मार्ड) अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत यशस्वीपणे काम केले.
अंबाजोगाई येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या संपर्कात ते मार्चच्या राज्यव्यापी संपाच्या माध्यमातून आले आणि त्यांच्या आयुष्याचे सोनं झाले. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.


वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्यानंतर डॉ. अजित गोपछडे यांनी काही वर्षं नांदेड येथील पद्मश्री डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम केले. मुळातच समाजसेवा आणि राजकारणाचा पिंड असलेले डॉ. अजित गोपछडे हे फार काळ शासकीय सेवेत रुजू शकले नाहीत. नांदेड येथील वजिराबाद विभागातील त्याकाळी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर “अमृतपय बाल रुग्णालय” या नावाने स्वतः चे बाल रुग्णालय सुरू केले. रुग्ण सेवा, समाजसेवा आणि राजकारण असा त्रिवेडी कार्यक्रम त्यांचा सुरु. याच काळात त्यांचे पक्ष कार्य पाहून भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, अध्यक्ष असा प्रवास करीत ते भाजपाच्या आरोग्य सेल, डॉक्टर सेल चे पदाधिकारी बनत राज्याच्या पक्षीय कार्यात सतत सक्रिय राहीले.
२०१९ मध्ये संपुर्ण देशात कोवीड महामारीने थैमान घातलेले असतांनाच भाजप डॉक्टर सेल घ्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांचे सशक्त नेटवर्क बनवून संपुर्ण राज्यभरात मोठे काम केले. या कामाची दखल घेत भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी ही घोषीत केली होती, मात्र पक्षाने लागलीच त्यांची उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर करीत अन्य उमेदवाराला संधी दिली.


भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन पावस घेतल्याची कसलिही खंत डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्या वागण्यातुन व आपल्या काम करण्याच्या पध्दतीत बदल करून दिसू दिली नाही. उलट पहिल्या पेक्षा ही अधिक उत्साहाने त्यांनी पक्षाचे काम सुरू ठेवले. कसल्याही पदांची अपेक्षा न करता भाजपा मधील त्यांचा पक्ष कार्यातील प्रवास अत्यंत हेवा वाटण्यासारखा आहे. आपल्या मनमोकळ्या आणि दुस-याच्या मदतीला तत्पर धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अजित गोपछडे यांच्या वर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. पक्षीय बळ मिळाल्यानंतर डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्या कामाचा व्याप वाढवला. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पक्षाचे काम वाढवण्यासाठी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी गावपातळीवर काम सुरू केले.


डॉ. अजित गोपछडे यांनी सुरु ठेवलेल्या या पक्षीय कामाची दखल घेत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या कामावर विश्वास ठेवून थेट राज्यसभेची उमेदवारी घोषित केली. एवढेच नव्हे तर ते सक्षमरित्या या निवडणुकीत विजयी होतीलच अशी व्युहरचना ही लावली आहे.
डॉ. अजित गोपछडे यांची ही उमेदवारी च त्यांच्या खासदारकीची द्योतक आहे. येत्या काही दिवसांत डॉ. अजित गोपछडे हे खा. डॉ. अजित गोपछडे म्हणून ओळखले जातील. नरेंद्र मोदी यांच्या पुढच्या पाच वर्षाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील एक उच्चशिक्षित खासदार म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी ही निश्चितपणे येईल अशी खात्री आहे.
बालपणापासून मिळालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धडे, भाजपाचा एक सक्रीय कार्यकर्ता, पदाधिकारी, कार सेवेचा एक निष्ठावान सैनिक, दांडगा जनसंपर्क असलेला ओबीसी चेहरा आणि काम करण्याचा प्रचंड उत्साह या त्यांच्या राजकारणाला बळकटी देणा-या बाजू आहेत.
डॉ. अजित गोपछडे यांच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा…!
🌹