मांजराची पाणी पातळी घटली; फक्त १४.३९ टक्केच जिवंत पाणी साठा!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/img_20240210_2031126094056620473905507-1024x566.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/img_20240210_2031126094056620473905507-1024x566.jpg)
बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांच्या पाणीपुरवठा व सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात आता फक्त १४.३९ टक्के एवढाच जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
धनेगाव (ता. केज) येथे मांजरा धरणाची साठवण क्षमता 224.093 दलघमी इतकी आहे. या धरणातून लातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर या शहरासह बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील 61 गावांना पाणीपुरवठा केला जातो. तर मांजरा पट्टयातील 73 गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठीही या धरणातील पाण्याचा लाभ होतो. मागील वर्षी २०२३ मध्ये या धरण क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाल्याने धरणात फारसा पाणी साठा जमा झाला नव्हता. तर परतीच्या पावसाने ही यावेळी साथ दिली नव्हती. धरणात पाणी साठा कमी आणि पाण्याची मागणी जास्त असे काही से चित्र यावर्षी पहावयास मिळत आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/img_20240210_20303467465669876043458-300x156.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/img_20240210_20303467465669876043458-300x156.jpg)
मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणा-या लातुर येथील मांजरा धरणासाठीच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील मिळालेल्या अधिकृत माहिती नुसार मांजरा धरणात आज १० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत फक्त १४.३९ टक्के एवढाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. अधिकृत माहिती नुसार मांजरा धरणाची पाणी पातळी ही ६४२.३७ मीटर एवढी आहे. मात्र आज धरणात फक्त ६३७.२५ मी. पाणी पातळी एवढे पाणी शिल्लक आहे. मांजरा धरणाची पाणी साठवून क्षमता२२४.०९३ दलघमी एवढी असून धरणात आज फक्त ७२.५९९ दलघमी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा धरणातील जीवंत पाणीसाठा क्षमता ही १७६.९६३ दलघमी एवढाच आहे. तर सध्या धरणात जीवंत पाणी साठा २५.४६९ दलघमी एवढाच आहे. अधिकृत माहिती नुसार मांजरा धरणात आज मातीस फक्त १४.३९ टक्के एवढाच जिवंत पाणी साठा आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/image_editor_output_image1442212124-17075775805023942714206775516789-300x229.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/02/image_editor_output_image1442212124-17075775805023942714206775516789-300x229.jpg)
यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मांजरा धरणाच्या घशाला कोरड लागली आहे. आज धरणात पाणी कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती आहे. आत्ता तर फेब्रुवारी महिना सुरुवात झाली आहे. हा महिना संपण्यास अजून २९ दिवस बाकी आहे. यानंतर मार्च, एप्रिल ,मे आणि जून म्हणजे साधारणतः अजून साडे चार महिने बीड, लातुर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना मांजरा धरणाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.
यावर्षी पाऊस काळ कमी झाला असला तरी उन्हाचा प्रादुर्भाव जास्त राहणार असल्याचे सांगितले जाते. शिवाय पुढच्या वर्षीच्या पाऊस काळाबद्दल उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहेत. अशा परिस्थितीत जेमतेम १४.३९ टक्के एवढाच पाणी साठा असलेले मांजरा धरण बीड लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावातील लोकांची तहान कशी भागवू शकेल असा प्रश्न तीन ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ वासून उभा आहे. मांजरा धरणातील पाण्याचे आतापासून योग्य नियोजन करून इतर पाणी उपलब्धतेचे सोअर्स आत्ताच शोधून ठेवले तर पाणी टंचाई चार सामना करणे अधिक सुकर होणार आहे. अन्यथा पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आपणासर्वांवर येणार आहे.