महाराष्ट्र
“खोलेश्वर”च्या प्राचार्या डॉ. प्रिती पोहेकर यांनी दिला राजीनामा

मराठवाड्यातील शिक्षण संस्थांमध्ये अग्रगण्य आणि स्वतःला शिक्षण संस्था नव्हे तर संस्कार केंद्र म्हणवून घेणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या ऐतिहासिक परंपरा असलेल्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिती पोहेकर यांनी स्थानिक विकास समितीच्या अध्यक्षांच्या मनमानी आणि नियमबाह्य वर्तनाला कंटाळून आपल्या प्राचार्य पदाचा राजीनामा संस्थेचे कार्यवाह यांच्या कडे सुपुर्द केला असून २८ एप्रिल २०२५ रोजी आपल्याला प्राचार्य पदावरुन कार्यमुक्त करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही मराठवाड्यातील एक अग्रणी शिक्षण संस्था आहे. मराठवाड्यातील सात ही जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या संस्थेचे शाळा, महाविद्यालये आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना आपली संस्था ही शिक्षण केंद्र नसून संस्कार केंद्र आहे असा सतत गाजावाजा या संस्थेमार्फत करण्यात येतो. मात्र याच संस्कार केंद्रातील एका नावाजलेल्या महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीच्या अध्यक्षांनी महिला प्राचार्यांवर सतत आक्षेप घेणे, परवानगी घेऊन केलेल्या कामावरही नंतर लेखी आक्षेप घेणे व मनमानी पध्दतीने महाविद्यालयाचा कारभार पाहण्यासाठी दबाब आणणे या कामाच्या पध्दतीला कंटाळून महिला प्राचार्य डॉ. प्रिती पोहेकर यांनी आपला राजीनामा संस्थेचे कार्यवाह यांच्या कडे सुपुर्द केला आहे.
या राजीनामा पत्रात प्राचार्य डॉ. प्रिती पोहेकर यांनी यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत आपण कार्यरत झाल्यापासून ते आजपर्यंत महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीच्या अध्यक्षांनी आपल्या वर केलेल्या अन्यायाचे अनेक पाढे विचारले असून आपणास संस्थेस काम करणे अवघड होत चाललेलं असल्याचे सांगितले आहे.
या सर्व अन्यायामुळे आपण खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्या पदाचा राजीनामा देत असून २८ एप्रिल २०२५ रोजी आपल्याला संस्थेतुन मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
काय म्हणणे आहे प्राचार्य डॉ. प्रिती पोहेकर यांचे ?
मा. कार्यवाह,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई,

महोदय, नमस्कार! मी दि. ११/१०/२०२२ रोजी आपल्या संस्थेमार्फत संचलित स्वा. सावरकर महा विद्यालय, बीड येथे रुजू झाले. तिथे मी अनेक चांगले कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प राबविले. कांही उदाहरणेः (१) मी रुजू झाले तेव्हा महाविद्यालयाची शैक्षणिक स्थिती अत्यंत वाईट होती, अगदी समित्यांची रचनादेखील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार नव्हती-तिथपासून कोणत्याही नोंदी नियमित नव्हत्या, त्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्माण करण्यापासून काम सुरू केले आणि फलस्वरूप NAAC, Bengaluru कार्यालयाने केलेल्या मूल्यमापनामध्ये महाविद्यालयाला उत्तम गुणांकन लाभले जे संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक आहे. (२) मा. संस्था अध्यक्ष, आपण व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालय इमारतीचा तिसरा मजला बांधला गेला, त्यात खूप पाठपुरावा करून वेळेत काम पूर्ण करून घेतले. (३) महाविद्यालयास PM-USHA योजने अंतर्गत निधी प्राप्त व्हावा यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून सतत मेहनत व पाठपुरावा केला, संस्थेच्या इतर महाविद्यालयांचा प्रस्ताव होता, मात्र रु. ४,९९,०८१२/- इतका निधी स्वा. सावरकर महाविद्यालयास प्राप्त होऊ शकला. (४) दिनदयाळ शोध संस्थान, बीड यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत मुली व महिलांसाठी उत्तम प्रकारे अभ्यासक्रम चालविले. मुलींसाठी Plumbing चा अभ्यासक्रम राबविला जो राबविणारे स्वा. सावरकर महाविद्यालय हे महाराष्ट्रातील (कदाचित देशांतीलाही) एकमेव महाविद्यालय होते व आहे. (५) महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेत महाविद्यालयात येणे, थांबणे, वेळेत काम करणे, घंटा वाजणे यात नियामितता आणली.

(६) महाविद्यालयामध्ये स्वच्छता आणून सुशोभीकरण केले. (७) महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. (८) विद्यार्थी प्रवेश संख्या २०२२ मध्ये ९५०, २०२३ मध्ये ९०२, २०२४ मध्ये ९९२ इतकी वाढविली जी पूर्वी ६००-७०० च्या दरम्यान असे. (९) विद्यार्थी गळती २०२४ साली ४१ पर्यंत आणली जी पूर्वी ३००-१७१ इतकी असे. (१०) मी कॅनडा इथे परिषदेकरिता गेले, न्यूझीलंड येथे मला निमंत्रित करण्यात आले, पण त्याचे कौतुक न वाटता आपण मी पूर्वपरवानगी घेतली नाही असे म्हणता जेव्हा मी कॅनडा Visafile करताना मा. अध्यक्ष, महाविद्यालय समिती यांची पूर्वपरवानगी घेतली होती. संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेल्या परिषदेस मी निमंत्रित होते, न्यूझीलंड येथे जाण्याचा खर्च संयुक्त राष्ट्र करीत असताना आपण मात्र त्याचे महत्व समजून न घेता मला जाण्यास परवानगी देण्यास तयार नव्हतात. (११) इतर कर्मचाऱ्यांनी शोध प्रकल्प घ्यावेत यासाठी मी स्वतः एक प्रकल्प हाती घेतला, आणि तो मंजूर झाल्यानंतर सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या संस्थांकडे तअसे सादर करण्यास प्रोत्साहित केले. (१२) शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोग व इतर संस्थांकडून वेगवेगळे निधी प्राप्त व्हावे याकरिता प्रोत्साहित करून ते मिळण्यासाठी पाठपुरावा केला. उदा: ICPR ची व्याख्यानमाला. (१३) मराठवाड्यात भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर चर्चासत्र आयोजित करणारे स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड हे पहिले महाविद्यालय होते. (१४) Central Tribal University of Andhra Pradesh यांच्या First Court Committee ची सदस्य म्हणून मा. राष्ट्रपती भवन यांच्याकडून माझे नामनिर्देशन झाले; मात्र मा. अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती यांनी या कारणांसाठी कर्तव्य रजा घेता येत नाही असे म्हणत अडविले. (१५) स्वा. सावरकर महाविद्यालय येथील कार्यकाळात मी प्राचार्य पदाला देय असलेल्या महिन्यांतील २ शनिवार, दिवाळी सुट्टीतील ७ दिवस आणि उन्हाळी सुट्टीतील १० दिवस सुट्ट्या कधीही उपभोगल्या नाहीत.

