मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम; जगदीश पिंगळे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
मराठी पत्रकार परिषद अंबाजाेगाई शाखेच्या वतीने आयोजित दर्पन व मूकनायक दिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लाेकमतचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांना जीवनगाैरव पुरस्कार तर जगदीश शिंदे यांना स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार, नृसिंह सूर्यवंशी यांना स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारीता पुरस्कार तर प्रा. बिभीषण चाटे यांना स्व. दत्ता (आबा) शिंदे स्मृती पत्रकारीता पुरस्कार देऊन गाैरवण्यात आले.
येथील स्व. विलासराव देशमुख सभागृहात आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मुंदडा तर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून व्याख्याते तथा महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य व व्याख्याते संकेत कुलकर्णी हे उपस्थित हाेते. या वेळी अप्पर पाेलिस अधीक्षक कविता नेरकर, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, व्यंकटेश्वरा शुगर इंडस्ट्रीयल प्रा लि. साखरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, पाेलिस उपनिरीक्षक बाळासाहेब पवार, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे आदी मान्यवर उपस्थित हाेते.
या वेळी बोलताना कविता नेरकर म्हणाल्या की समाजाचे तळागाळातील प्रश्न मांडणे हे पत्रकारांचे काम असुन पत्रकार हा पूर्वग्रहदूषित नसावा. समाजाचे जागरण करण्यात पत्रकारांचा व वर्तमानपत्र मोठा वाटा असुन माझ्या यशातही पत्रकारांचा मौलाचा वाटा आहे. पत्रकार हा अगोदर पात्रकार असला पाहिजे. यावेळी त्यांनी पत्रकारा वरती काव्यमय भाष्य केले ते असे “शब्दांवर करतो प्रहार तू, निर्भीड तू झुंजार तू, समाजाचा शिल्पकार तू, असत्याचा करतो संहार तू, झेप गरुडाची नजर तुझी चहूवार, हातात लेखणी तलवार असा पत्रकार असा पत्रकार”.
यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने सत्काराला उत्तर देताना प्रा. बिभीषण चाटे म्हणाले की, मी जरी पाटाेदा तालुक्यात सेवेला असलाे तरी माझे मुळ गाव अंबाजाेगाई हे आहे. त्यामुळे अंबाजाेगाई येथील हा सत्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लाेकमत दैनिकाच्या माध्यमातून मी लिहिण्यास शिकलाे, विविध प्रश्न मांडले आणि त्यामुळे अनेक वंचितांना न्याय मिळवून दिला.
यावेळी जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे म्हणाले की, पत्रकार जे काही लिहितात त्यामागे अनेक वेदना दडलेल्या असतात. मात्र लाेक बातम्या वाचतात आणि माेकळे हाेतात. ज्यासाठी ही बातमी लिहिली आहे त्या वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार कमी लाेक पुढे येतात. यावेळी त्यांनी पारधी समाजाच्या परिवर्तनाच्या अनेक गाेष्टी सांगितल्या. तसेच स्वत:ही एक परिवर्तनातून वेगळी वाट घेऊन आपण केलेल्या विवाहाबद्दल माहिती दिली.
यावेळी बाेलताना पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख म्हणाले की, या कार्यक्रमाचे नियाेजन विचारमंथन व्हावे म्हणून केलेलेले आहे. या व्यासपीठावर अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. जगदीश पिंगळे आणि मी लाेकमतला एकाच काळात रूजू झालाे. परंतु नंतर मी महाराष्ट्रात सर्वत्र फिरलाे. जगदीशने मात्र लाेकमतमध्येच राहणे पसंत केले. त्याच्या लेखणीत सामाजिक, सांस्कृतिक आशय असलेल्या बातम्यांचा समावेश आहे. त्यामुळे सकारात्मक पत्रकारीता करून ताे एक कुटूंब वत्सल, कलावंत, गायक म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात त्याने आपले नावलाैकिक मिळविलेले आहे.
यावेळी बाेलताना प्रमुख वक्ते संकेत कुलकर्णी म्हणाले की, माध्यमांचे स्वरूप आता बदलत चालले आहे. डिजीटल माध्यमाद्वारे जगात वेगवेगळी माहिती आपण मिळवू शकताे आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून आपल्या भागातील माहितीही जगापुढे मांडू शकताे. त्यामुळे जगाला माहितीही मिळते आणि आपलेही आर्थिक प्रश्न सुटतात. बीड जिल्ह्यात अनेक अश्चर्यकारक अशा वास्तू आणि वस्तू आहेत. दासाेपंतांची पासाेडी असेल, धर्मापुरीचे मंदिर असेल, मुकुंदराजांची समाधी असेल आणि त्याभाेवती असलेल्या अख्यायिका असतील या सर्व माहितीचा स्त्राेत जर डिजीटल माध्यमाद्वारे जगात पाेहाेचविला तर एक माेठे कार्य हाेईल. तसेच महाराष्ट्रात गड आणि किल्ले भरपूर आहेत, त्यांची उपेक्षा केली जाते हा प्राचीन वारसा आपण जपला पाहिजे आणि हा वारसा जपण्यासाठी पत्रकारांनी आपल्या नव्या संकल्पना पुढे घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे, असे ते म्हणाले.
या वेळी बोलताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले की माझ्याही जडणघडणीत जगदीश पिंगळे यांचा सिंहाचा वाटा आहे. पत्रकार समाजाचा आरसा आहे. बातमी ही अभ्यासपूर्ण असली पाहिजे व ती बातमी पत्रकारांनी स्वतः लिहिली पाहिजे, शिकलेल्या पिढी जातिवादाला जिवंत करायला लागली आहे असे म्हणलं तर वावग ठरणार नाही. पत्रकारांना हक्का बरोबर कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. प्रश्नाला हात घालणारी पत्रकारिता पाहिजे, जग बदलण्याची ताकत पत्रकारांच्या लेखणीत असायला हवी.
यावेळी अंबाजाेगाई शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे रामकृष्ण पवार सर, ऍड मकरंद पत्की, शाम सरवदे, कु प्रतीक्षा अंबेकर, गौरी प्रशांत बरदापुरकर, बाळू फुलझलके, ऍड संतोष पवार, आदित्य अविनाश मुडेगावकर, अक्षता राजेंद्र खरटमोल, युवराज नागेश औताडे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दत्तात्रय अंबेकर यांनी कार्य अहवाल सादर केला तर गजानन मुडेगावकर यांनी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वैद्यकीय कक्ष प्रमुख डाॅ. राजेश इंगाेले यांनीही यावेळी आपले मनाेगत व्यक्त केले.
श्री. जगदीश पिंगळे यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन प्रकाश बाेरगावकर यांनी केले तर प्रशांत लाटकर यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार आणि प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. अंबाजाेगाई डिजीटल मीडिया तालुकाध्यक्ष नागेश औताडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.