मराठवाड्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230114-WA0280-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230114-WA0280-1024x682.jpg)
“निजामाच्या राजवटीत मराठवाड्यातील तरुणांसाठी उच्च शिक्षणाची सोय ही फक्त हैदराबादला होती म्हणून हा तरुण वर्ग शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित होता. हे शैक्षणिक मागासले पण दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेच्या माध्यमातून तसेच विविध शहरात गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे सुरू करून मराठवाड्याचे शैक्षणिक मागासले पण दूर करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला, म्हणूनच मराठवाड्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे,” असे प्रतिपादन येथील भा.शि. प्र. संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागातील प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा. शि. प्र.संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष श्री. रामभाऊ कुलकर्णी हे लाभले होते तर मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबा कागदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मराठवाडा प्रदेशाच्या विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान हा आजच्या व्याख्यानाचा विषय होता.
याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना प्रा. गायकवाड म्हणाले की निजाम राजवटीत शिक्षणाची सुविधा ही फक्त हैदराबाद या ठिकाणीच होती, शिवाय तिथे उर्दू भाषेची सक्ती असायची, त्यामुळे मराठवाड्यातील खूप मोठा समाज हा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होता, ही शिक्षणाच्या बाबतीत असलेली असुविधा डॉ. आंबेडकरांनी जाणली व त्या माध्यमातूनच त्यांनी अत्यंत कष्टाने व तळमळीने देश, समाज आणि शिक्षण डोळ्यासमोर ठेवून दि.19 जून 1950 रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना औरंगाबाद येथे केली. येथे शिकलेले अनेक विद्यार्थी पुढे समाजाच्या विविध क्षेत्रात चमकले. त्यापैकी अनेक जणांनी साहित्यिक, विचारवंत, शिक्षक, प्राध्यापक, नेते, कार्यकर्ते,आदी अनेक क्षेत्रात आपले नाव कमावले व नंतर समाजातील इतर मुलांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. हे महाविद्यालय स्थापन झाले नसते तर हा समाज शिक्षित झालाच नसता असे ते म्हणाले. डॉ. आंबेडकरांना शैक्षणिक क्षेत्रात स्त्री व पुरुषांमध्ये समानता हवी होती. ते म्हणायचे की स्त्री शिक्षित झाली तर ती निर्भीड होईल, आत्मसन्मानाने जगेल व विकसित होईल, अशी त्यांची धारणा होती. शिक्षण क्षेत्रात राजकारण येऊ नये असे त्यांना वाटायचे. अज्ञान हे दुःखाचे खूप मोठे कारण आहे, हे दुःख जर घालवायचे असेल तर तुम्ही शिकले पाहिजे, अशी शिकवण डॉ. आंबेडकरांनी दिल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना मा. रामभाऊ कुलकर्णी म्हणाले की मराठवाडा ही डॉ. आंबेडकरांची जन्मभूमी नव्हती पण कर्मभूमी मात्र मराठवाडाच होती. डॉ. आंबेडकरांनी मराठवाड्यातील तरुणांना मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेच्या माध्यमातून शिक्षणाची कवाडे खुली करून दिली परंतु आजच्या काळात एवढ्या भौतिक सोयी सुविधा असूनही प्रामुख्याने मुले ही शिक्षणात मागे आहेत मुली मात्र पुढे आहेत यावर आपण मंथन करायला हवे, नागसेनवन व मिलिंद महाविद्यालयाकडे मराठवाड्याच्या उत्कर्षाचा बिंदू म्हणून आपण पाहतो, असे विचार व्यक्त करून त्यांनी मकर संक्रमणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनीही डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य, विद्यापीठ नामांतर लढा आदी विषयावर सविस्तर भाष्य केले. तसेच आजच्या दिनी पानिपतच्या लढाईत जे सैनिक धारातीर्थी पडले, त्यांनाही त्यांनी अभिवादन केले. दरम्यान इयत्ता बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु. थाटकर साक्षी हिला महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कु. अंतरा सोनटक्के व चि. योगेश कोळी यांनी मकर संक्रांति निमित्त आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व तिळगुळांचे वाटप सर्वांना केले. या कामी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दीपक फुलारी व प्रा.डॉ. रोहिणी अंकुश यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. जिजाराम कावळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अजय डुबे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. रोहिणी अंकुश यांनी मांनले.