परळी रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार; अमृत भारत योजनेत होणार विकास


बीड जिल्ह्यच्या खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत भारत योजने अंतर्गत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास होणार आहे. रविवार, 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाचे रूप पालटणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले यांची भेट घेतली.


६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. सदरील योजनेत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाचा समावेश करावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे खा.प्रीतमताई मुंडे यांनी सतत पाठपुरावा केला. या योजनेत आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. रविवार 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन केले जाणार आहे.
पुर्वतयारी साठी शिष्टमंडळाने घेतली भेट
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी साठी बुधवार दि 2 ऑगस्ट रोजी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मुंडे, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे, स्वीय्य सहाय्यक राजेंद्र लोढा यांनी साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली.


पायाभूत विकासावर देणार भर!
रेल्वेस्थानकांचा पायाभूत विकास करण्यावर या योजनेत भर देण्यात आला आहे. त्यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. स्थानकांचा विकास करताना दररोज स्थानकावर येणारी सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेवून नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत प्रवासी केंद्रीत सुविधा स्थानकांवर विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानकाच्या बाह्यरूपासोबतच अंतर्गत भागातही सुधारणा करण्याची तरतूद या योजनेत असणार आहे.


या उदघाटन कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष रेल्वेने साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले परळी येथे आले होते. यावेळी चर्चा करण्यासाठी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मुंडे, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे, खा. प्रीतम मुंडे यांचे स्वीय्य सहाय्यक राजेंद्र लोढा उपस्थित होते.
खा. डॉ. प्रितम मुंडे यांचे विशेष प्रयत्न


बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सुरुवातीपासुनच विशेष प्रयत्न केले आहेत. देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अमृत भारत योजनेत परळी रेल्वे स्थानकाचा समावेश व्हावा यासाठी खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.