पतीच्या त्रासाला कंटाळून गर्भवती पत्नीची गळफास लावून आत्महत्या


कधी पैशाची मागणी करत तर कधी चारित्र्यावर संशय घेत दारुड्या पतीने पत्नीला सतत मारहाण करत तिचा अतोनात छळ केला. अखेर छळाला कंटाळलेल्या त्या सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १९) अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात घडली. याप्रकरणी पतीवर गुन्हा नोंद करण्यात आला.
१ लाखांची मागणी; पतीवर गुन्हा दाखल
गजाला इरफान शेख (वय २२, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. तिची आई खालेदा जमीर शेख यांच्या फिर्यादीनुसार गजालाचे लग्न पाच वर्षापूर्वी इरफान सोबत झाले असून त्यांना एक मुलगी आहे. सुरुवातीचे दोन वर्ष चांगले गेल्यानंतर इरफानने चारित्र्यावर संशय घेत गजालाला दारू पिऊन सतत मारहाण आणि शिवीगाळ सुरु केली. गजालाच्या माहेरच्या लोकांनी वारंवार समजावून सांगूनही त्याच्या वागणुकीत फरक पडला नाही. रिक्षा घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणत त्याने मागील सहा महिन्यापासून गजालाला रोजच मारहाण सुरु केली होती. त्रासलेली गजाला तीन महिन्यापूर्वी माहेरी आली होती. परंतु, तिला चांगले वागविण्याचे काबुल करून इरफान तिला परत घेऊन आला आणि थोडे दिवस चांगले वागवून पुन्हा मारहाण सुरु केली.
आडुला गळफास लावून केली आत्महत्या
अखेर त्रासलेल्या गजालाने रविवारी दुपारी २ वाजता राहत्या घरी पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी गजाला सहा महिन्यांची गर्भवती होती. तिच्या मृतदेहावर मारहाणीच्या अंगावर खुणा दिसून येत आहेत. या प्रकरणी मयत महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.