धक्कादायक! बीड जिल्ह्यात ७११ पुरुष सेक्स वर्कर; २७ जण पॉझिटिव्ह!
सेक्स हा जीवनाचा एक अविभाज्य भाग असला तरी त्या विषयी फारसे लिहीले बोलले जात नाही. फारशी विस्ताराने कुठे चर्चा ही होत नाही. सेक्स संबंधिचे वाचन करणारा, त्यावर लिहणारा एक स्वतंत्र वर्ग आहे. मात्र तो कुठे ही सहसा चर्चा करीत नाही. अशी स्थिती असताना बीड जिल्ह्यातील देहविक्री करणा-या महिलांच्या संख्येत सोबतच आता देहविक्री करणा-या पुरुषांची संख्या एका सर्वेक्षणात आढळून आली आहे. आणि ही संख्या खरीच धक्कादायक आहे.
जिल्ह्यात आहेत ७११ पुरुष तर १,६४१ महिला सेक्स वर्कर
बीड जिल्ह्यात महिलांप्रमाणेच पुरुषही पुरुषांसोबत संबंध ठेवतात; परंतु, योग्य काळजी घेतली जात नसल्याने पुरुषांचे एचआयव्ही बाधित होण्याचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आहे. सेक्स वर्कर महिलांना एचआयव्ही होण्याचे प्रमाण २.६२ टक्के आहे तर पुरुषांचे प्रमाण ३.७९ टक्के एवढे आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७११ पुरुष आणि १,६४१ महिला सेक्स वर्कर आहेत.
एचआयव्ही बाबत जनजागृती
जिल्हा रुग्णालयात एड्स नियंत्रण व प्रतिबंध कक्ष आहे. या अंतर्गत सामाजिक संस्था नियुक्त करून एचआयव्ही बाबत जनजागृती केली जाते. शिवाय हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना आणि कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जाते. सध्या जिल्ह्यात अंबाजोगाई येथील ग्रामीण विकास मंडळाकडून सेक्स वर्कर महिला, पुरुष आणि तृतीयपंथीयांसाठी काम केले जाते.
या संस्थेने सेक्स वर्कर करणाऱ्यां मधीलच एकाला हाताशी धरून सर्वेक्षण केले. सर्व महिला, पुरुषांची माहिती घेतली. त्यात ७१८ पुरुषांची नोंदणी झाली आहे. यातील ७११ पुरुष हे आजही अॅक्टिव्ह असून पुरुषांशी संबंध ठेवतात. तसेच सेक्स वर्कर असलेल्या अॅक्टिव्ह महिलांचा आकडा हा १,६४१ एवढा आहे. यातील २८ पुरुष तर ४३ महिला पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. याचे प्रमाण २.६२ एवढे आहे. त्यापेक्षाही पुरुषांचे प्रमाण १.१७ ने जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. एचआयव्हीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बचावासाठी योग्य त्या साधनांचा वापर करावा, असे आवाहन डापकू विभागाकडून आले आहे.
१२ तृतीय पंथींना दिले ओळखपत्र
जिल्ह्यात १२ तृतीयपंथींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अद्यापही १४ लोकांनी हे ओळखपत्र घेतलेले नाही. त्यांची मानसिकता नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
या पुरवल्या जातात सुविधा!
या लोकांना आरोग्याच्या सर्व सुविधा पुरविल्या जातात. तसेच एचआयव्हीपासून बचावासाठी निरोध वापरण्याचे आवाहन केले जाते. तसेच हे साहित्य पुरविले जाते.
प्रत्येक सहा महिन्याला नियमित एचआयव्ही तपासणी केली जाते. प्रत्येक तीन महिन्याला गुप्तरोगाची तपासणी होते.
शासकीय सवलतींचा मिळतो लाभ!
रेशन, आधार, संजय गांधी योजना, बँक खाते आदींची माहिती व योजनांचा लाभ दिला जातो. जे लोक पॉझिटिव्ह आहेत, अशांना एआरटी सेंटरला जोडून नियमित औषधोपचार केला जातो.
जिल्ह्यात केवळ एकच संस्था करतेय काम
सेक्स वर्कर महिला, पुरुषांसह तृतीयपंथीयांसाठी केवळ ग्रामीण विकास मंडळ ही एकमेव संस्था ‘काम करत आहे. ही संस्था अंबाजोगाई, परळी, केज आणि बीड या चार तालुक्यात काम करत आहे. उर्वरित सात तालुक्यांमध्ये अद्यापही या लोकांसाठी काम करणारी संस्था कार्यरत नाही. या तालुक्यांमध्येही सर्वेक्षण झाल्यास आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महिलांचं नव्हे तर ७११ पुरुष ही ठेवतात संबंध
महिलाच पुरुषांसोबत संबंध ठेवतात, असे आता पर्यंत ऐकले असेल; परंतु, पुरुषही पुरुषांसोबत संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७११ पुरुष अॅक्टिव्ह आहेत. यामध्ये २७ जण पॉझिटिव्ह आढळले.
सेक्स वर्कर कडुनच मिळवली जाते माहिती
सेक्स वर्कर असलेल्या महिला किंवा पुरुषांमधीलच एकाला निवडून माहिती घेतली जाते. त्यांना सर्व काळजी घेण्याबाबतची माहिती देऊन आरोग्य तपासणी केली जाते. महिला, तृतीयपंथी आणि पुरुष असे तीन प्रकार आहेत. या सर्वांना आरोग्य, शासकीय योजना व इतर सर्व लाभ दिले जातात. असे ग्रामीण विकास मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक सय्यद फारूख हुसेन सय्यद यांनी सांगितले.