थायरॉईड ची तपासणी अत्यावश्यक महिलांनी लाभ घ्यावा; आ नमिता मुंदडा


थायरॉईड हा एक सामान्य आजार झाला असून महिलांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळुन येतो या आजाराला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी थायरॉईड ची तपासणी करून घ्यावी व पुढील धोके टाळावेत असे आवाहन आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केले.
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आज वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून ” “थायरॉईड मशीन” या अभियानाचे उद्घाटन करताना आ. नमिता मुंदडा बोलत होत्या. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, मेडिसीन विभाग प्रमुख तथा थायरॉईड मशीन चे नोडल ऑफिसर डॉ. सिध्देश्वर बिराजदार, अधिसेविका उषा भताने व इतर मान्यवर उपस्थित होते.


आपल्या विस्तारीत भाषणात आ. नमिता मुंदडा पुढे म्हणाल्या की, थायरॉईड हा आजार सर्वसामान्य आजार झाला असून या आजारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. थायरॉईड या आजारांवर वेळीच उपचार मिळावेत म्हणून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने थायरॉईड मशीन हे अभियान आज पासून सुरू केले असून या अभियानांतर्गत जास्तीत जास्त रुग्णांनी थायरॉईड ची तपासणी करून घ्यावी व पुढील धोके टाळावेत असे आवाहन केले.


आपल्या भाषणात आ. नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे आपल्याला खूप समाधान व आनंद मिळतो असे सांगत ज्या पध्दतीने या वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभाग एकत्र येऊन अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात असे चित्र राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयात पहावयास मिळत नाही असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन थायरॉईड मशीन अभियान ही या महाविद्यालयात निश्चितच प्रभावी पणे राबविण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालकांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात ३० तारखेला थायरॉईड मिशन चे उद्घाटन करण्याच्या सुचना दिल्या प्रमाणे येथे ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आज पासून दर गुरुवारी दुपारी १२:३० ते २:३० या कालावधीत स्वतंत्र थायरॉईड ओपीडी सुरु करण्यात येणार असून या ओपीडी मध्ये फक्त थायरॉईड रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. थायरॉईड असलेल्या रुग्णांना नेमका कोणत्या प्रकारचे थायरॉईड आहे याचे निदान करुन योग्य उपचार करुन थायरॉईड रुग्ण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.


अध्यक्षीय समारोपात अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना या पुर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे मुख शुध्दी अभियान, स्थुल निवारण निवारण अभियान, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी अभियान, वृध्दत्व आजार व उपचार अभियान व इतर अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे सांगत रक्त संकलनामध्ये या महाविद्यालयातंर्गत असलेल्या शासकीय रक्तपेढी ने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या विविध विभागात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दिली.


वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रुग्णालयाचे उप अधीक्षक डॉ. विश्वजित पवार यांनी केले तर आभार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमास मेडिसीन विभागाचे सहायक प्राध्यापक
डॉ. संजय चव्हाण, डॉ. मधुकर कांबळे, डॉ. अंजली देशमुख, विभाग प्रमुख डॉ. मोगरीकर, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. नितीन चाटे, डॉ. अभिमन्यु तरकसे, डॉ. शंकर धपाटे, डॉ. सुनिता बिराजदार डॉ. दिपक लामतुरे, डॉ. रमेश लोमटे, डॉ. शिला गायकवाड, डॉ. अमित चव्हाण, विविध विभागातील लेक्चर्स, हाऊस ऑफिसर, मेडीकल ऑफिसर, मेडिसीन, सर्जरी, इएनटी, ऍनास्थेशिया विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी, परिचारीका महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी, वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती.