महाराष्ट्र

जमीन मोजणीत केली जाणीवपूर्वक फसवणुक; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

जमीन मोजणीत जाणीवपूर्वक फसवणूक करणाऱ्या भूकर मापकावर कारवाई करण्याची मागणी अंबाजोगाई येथील गोविंद शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जमाबंदी आयुक्तांकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

२ एकर ४आर जाणीवपूर्वक कमी दाखवली जमीन

अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी येथील सर्वे नंबर 449/1 (नवीन सर्वे नंबर 15) मधील शेतजमिनीची रीतसर मोजणी न करता स्वत: च्या व लगत असलेल्या शेजाऱ्यांच्या फायद्यासाठी चुकीची मोजणी करून कब्जे वहिवाटीत असलेल्या जमिनीचे परस्पर वाटणी ठरवून आमच्या जमिनीचा विभक्त हिस्सा तयार करणारे व जमीन मोजणी करताना मूळ दस्तऐवजात फेरफार करून खोटी कागदपत्र तयार करून दोन एकर दोन आर एवढी जमीन कमी दाखवून फसवणूक करणारे भूकरमापक सतीश घोडके यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी गोविंद शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , महसूलमंत्री व जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच जमीन मोजणीसाठी शासकीय नियमानुसार भरलेली 73 हजार 500 रूपये एवढी रक्कम घोडके यांच्या वेतनातून वसूल करून द्यावी व माझ्या जमिनीची पुन्हा प्रत्यक्ष जागेवर येऊन तपासणी करून आमचे हिस्से न दर्शविणे व इतरांचे हिस्से असताना पोटहिस्सा व नमुना दर्शविला नसल्याची चौकशी करून भूकरमापक घोडके व संबंधित दोषी अधिकरी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल अशी मागणी जमिनीचे वडिलोपार्जित मालक गोविंद हरिभाऊ शिंदे निवेदनाद्वारे केली आहे.

७३,५०० रु. भरलेली फीस मोजणी करणा-या भुकरमापकाच्या वेतनातुन वसुल करा ; गोविंद शिंदे यांची मागणी

यासंदर्भात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिनांक 27/07/2021 चे चलन भरल्याच्या अर्जाप्रमाणे 25/10/2021 रोजी मोजणीसाठी नोटीस काढून भूकरमापक सतीश घोडके यांनी मोजणीसाठी येणार असल्याचे कळवले. त्यानसार त्यांनी पोटहिस्सा मोजणी करून आपण स्वतः व लगतचे खातेदार यांनी दाखविलेल्या वहिवाटीप्रमाणे पंचनामा व जबाब लिहून त्यावर माझी व पंचाची स्वाक्षरी घेतली.

खोटे बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप

आपण वारंवार मोजणीची नक्कल व क प्रत मागितली असता मला सहा महिन्यापर्यंत ती देण्यात आली नाही. दरम्यान, आपण 18/11/2022 रोजी मोजणी संचिकेतील संपूर्ण कागदपत्रांची मागणी केली असता त्यामध्ये खोटे व बनावट कागदपत्र तयार केल्याचे आढळून आले. यामध्ये भूमी अभिलेख आधारे मूळ कागदपत्रांची खात्री न करता 3 एकर कमी क्षेत्राचा नकाशा तयार करून 10 हेक्टर 12 आर क्षेत्र नकाशामध्ये कमी दाखवले.

६ हे. ४९ आर जमीन असतांना मोजणी नंतर फक्त ५ हे. ४२ आर जमीन दाखवली

मोजणी अर्जाप्रमाणे एकत्रित कुटुंबाच्या नावे असलेल्या 6 हेक्टर  49 आर 5 जणांमध्ये सामाईक असताना खोटा पोट हिस्सा दाखवून 5 हेक्टर 42 आर जमीन दाखवण्यात आली जी की 1 हेक्टर 5 आर ने कमी आहे. तसेच भूकरमापक सतीश घोडके यांनी लगत चे पूर्व पश्चिम सर्व हिस्सेदारांशी संगनमत करून त्यांच्याकडील कब्जात जादा असलेली जमीन पोट हिस्सा मोजणीत उघड होवू नये म्हणून त्यांच्या नावावर पोट हिस्सा तयार केलेला नाही व मोजणी नकाशात कोठेच उल्लेख केलेला नाही. मोजणीप्रमाणे नक्कल नंबर 4 हेतुपुरस्सर तयार केलेला नाही. यामध्ये घोडके यांनी मुख्यालयातील संबंधित कर्मचारी यांना हाताशी धरून ही खोटी कागदपत्र तयार केली असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भुमी अभिलेख उप अधीक्षक संधान यांनी ठेवले कानावर हात!

दरम्यान, उपअधीक्षक भूमी अभिलेख मनोज संधान यांना प्रत्यक्ष भेटून घोडके यांनी मोजणीकामी आमची फसवणूक करून मूळ दस्तऐवजाशी छेडछाड करून खोटी कागदपत्र तयार करून आमची दोन एकर 2 आर एवढी शेतजमीन कमी दाखवली असल्याची माहिती दिली असता संधान यांनीही आमचे काहीही न ऐकता घोडके यांना पाठीशी घालत असल्याचे देखील यामध्ये स्पष्ट उल्लेखित केले आहे . याप्रकरणी आता आपण लक्ष घालून सदर जमिनीची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश देऊन आम्हाला न्याय द्यावा, असे या निवेदनात याचिकाकर्ते गोविंद हरिभाऊ शिंदे यांच्यासह लक्ष्मीबाई हरिभाऊ शिंदे, गोपाल हरिभाऊ शिंदे, बृहस्पती हरिभाऊ शिंदे, सरोज हरिभाऊ शिंदे व आनंद गोविंद शिंदे हे मागणी करत निवेदन साक्षांकित केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार;न्यायालयात मागणार दाद !

सादर केलेल्या निवेदनाच्या प्रती उपसंचालक भूमी अभिलेख, औरंगाबाद, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बीड, उपअधीक्षक भूमी अभिलेख, अंबाजोगाई यांच्यासह मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्या मुंबईतील कार्यालयात 3 फेब्रुवारी 2023 रोजी जाऊन प्रत्यक्ष दिल्या आहेत. या सादर करण्यात आलेल्या सर्व निवेदनाच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हा शिंदे कुटुंबास न्याय घ्यावा अशी मागणी करत यासाठी न्यायालयाची दार ठोठावण्याचा इशारा देखील जाहीर निवेदनाद्वारे दिला आहे .

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker