‘काळवीट’ला भरतीची ओढ तर ‘मांजरा’ अजूनही मृत साठ्याच्या खालीच!
यावर्षी परत परतीच्या पावसाने बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. काल २३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळवीट साठवण तलावात समाधान कारक पाणी जमा झाले आहे तर मांजरा धरणातील पाणी साठ्यात अजूनही फारशी वाढ झाली नाही. मांजरा धरणातील पाणी अजूनही मृत साठ्याच्या खालीच आहे.
अंबाजोगाई शहराची तहान भागवणा-या काळवीट साठवण तलाव आणि धनेगाव येथील मांजरा धरणातील पाण्यासाठी याबद्दल सामान्य लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. काल २३ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहर आणि परिसरात ब-यापैकी पाऊस झाला आणि लोकांच्या नजरा काळवीट आणि मांजरा धरणातील पाणी साठ्याची आकडेवारी वाचण्यासाठी सरसावू लागली. आज २४ सप्टेंबर रोजी सकाळ पासून अनेकांचे फोन आणि वॉट्स ऍप वर मेसेज पडु लागले. पाणी किती वाढले?
काल २३ संप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहर आणि परिसरात सायंकाळी सुरू झालेला आणि मध्यरात्री पर्यंत सतत कमी जास्त वेगाने पडलेला पाऊस हा यावर्षी सर्वात जोरात आणि सर्वात जास्त वेळ पडलेला पावूस ठरला.
महसूल विभागाकडून अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर मंडळात विभागात कालचा पाऊस सर्वाधिक म्हणजे १०६ .३ मी.मी. एवढा पडला. त्या खालोखाल अंबाजोगाई मंडळात आणि लोखंडीसावरगाव मंडळात तो ७२ मी एवढा तर घाटनांदुर मंडळात ६०.० मी तर त्या खालोखाल पाटोदा मंडळात ४५.० मीमी एवढा पडला.
कालचा पावूस हा मांजरा धरण क्षेत्रात पडला नसल्यामुळे त्या धरणातील पाण्याच्या पातळीत काहीच वाढ झाली नाही.
२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंबाजोगाई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने अंबाजोगाई शहरासाठी पाणी आरक्षित केलेल्या १.२५ दलघमी पाणी साठवण क्षमतेच्या काळवीट साठवण तलावात मोठा पाणी साठा जमा झाला. शहर पाणी पुरवठ्यासाठी सतत उपसा होणा-या या साठवण तलाव २३ सप्टेंबर आणि यापुर्वी झालेल्या पावसाचे पाणी आता मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे. हा साठवण तलाव भरण्यासाठी आता फक्त साधारणतः दीड फुट पाणी पातळी शिल्लक राहिली असावी असा अंदाज आहे. कालच्या सारखा एखादा मोठा पावूस एक-दोन दिवसांत झाला की हा साठवण तलाव ओसंडून वाहू लागेल अशी स्थिती आहे.
बीड लातुर उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यात मात्र अजूनही वाढ होवू शकली नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शुन्य पातळी खाली गेलेली या धरणाची पाणी पातळी अजूनही शुन्य पातळी खालीच आहे.
२४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता या धरणात फक्त २४.११ टक्के पाणी साठा जमा झाल्याची अधिकृत माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिली आहे.
मांजरा धरणाला आणि मराठवाड्याला गेली अनेक वर्षांपासून सतत परतीच्या पावसानेच तारले आहे. मागील सात वर्षांपुर्वी तर पार तळ उघडा पडलेले मांजरा धरण अवघ्या चार दिवस कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे ओसंडून वाहिलेले आपण पाहीले आहे. अशीच कृपा वरुणराजाने याही वर्षी करावी आणि या विभागातील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी याचना गणरायाकडे या विभागातील नागरीक करीत आहेत.