का होतो वीजेचा कडकडाट…?


गेली दोन दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये वीजेच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी होत आहे. यापुर्वी ही विशेषतः उन्हाळा संपण्याच्या तोंडावर आणि पावसाळा सुरु होण्यापूर्वी वीजेचा कडकडाट होतच होता. अलिकडे मात्र वीजेचा कडकडाट हा अवकाळी पावसा सारखा ब-याचवेळा अनेकदा अवेळी होत आहेत. का होतो असा वीजेचा कडकडाट? आणि वीजेचा कडकडाट होत असतांनाच आपण आपला बचाव कसा करुन घ्यावा हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
अशी होते वीज निर्मिती!
जेव्हा थंड हवेचे ढग तयार होतात तेव्हा खाली ढगांच्या आत उबदार हवेच्या हालचालीमुळे आणि थंड हवेमुळे ढगांमधील सकारात्मक प्रभार वरच्या दिशेने व नकारात्मक प्रभार खाली दिशेने होते. ढगांमधील या विरुद्ध प्रभाराच्या कृतीमुळे इलेक्ट्रिक प्रभार निर्माण होते. अशाप्रकारे आकाशीय वीज निर्माण होते. पृथ्वीवर पोहोचताच वीज चांगल्या वाहकाचा शोध घेते, ज्यातून तिचे वहन चांगल्या पद्धतीने होईल. यासाठी धातू किंवा वृक्ष उपयुक्त ठरतात. त्यामुळेच नेहमीच वीज या माध्यमातून पृथ्वीवर पडण्याचा मार्ग निवडते.
वीज पडणे ही तर एक नैसर्गिक घटना!
वीज पडणे ही नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य, पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते.
वीज पडण्याच्या घटनेत 23 टक्के वाढ!
भारतात 2019 च्या तुलनेत गेल्यावर्षी वीज पडण्याच्या घटनांमध्ये 23% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वीज पडण्याच्या अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड व महाराष्ट्रात वीज पडल्यामुळे सर्वाधिक लोकांचे प्राण गेले आहेत. ‘द अर्थ नेटवर्क्स’ ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार भारतात 3 कोटी 90 लाखांपेक्षा अधिकवेळा वीज पडली. ज्यात एक कोटींपेक्षा अधिकवेळा वीज जमिनीला धडकली आहे. वीज जमिनीवर पडल्यानंतर प्राणहानीची शक्यता अधिक असते.
वीज पडून राज्यनिहाय झालेले मृत्यू
जानेवारीमध्ये हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या 2020 चा अहवालानुसार गर्जना व वीज पडल्याच्या घटनांमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात 815 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यात बिहारमधील 280, उत्तरप्रदेशमधील 220, झारखंडमधील 122, मध्यप्रदेशमधील 72, महाराष्ट्रातील 23 व आंध्रप्रदेशातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. द अर्थ नेटवर्क्सच्या कुमार मार्गसहायम यांनी सांगितले ही संख्या खूप असल्याचे सांगितले. लोकांना वेळेवर हवामानाविषयी अलर्ट मिळणे व त्याविषयीच्या जागृकतेमुळे लेाकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात.
मान्सून सक्रिय होण्यापूर्वीच होतो वीजेचा कडकडाट


मान्सुन सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमौसमी पावसाच्या काळात वीज कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्याच्या आधी आकाशात ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरु असते. त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेत मजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडतात.
वीज पडून दरवर्षी होतो२५०० शेतकऱ्यांचा मृत्यू
एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तिंचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे, जेणेकरून मनुष्य, पशु आणि वित्तहानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. ज्या लोकांनी वीज कोसळणे अनुभवले आहे त्यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले कि अचानक वादळी वातावरण निर्माण झाल्यावर मोठ्या आणि उंच झाडाखाली आश्रयास उभे असताना हा धोका जास्त असतो. वीज उंचीच्या ठिकाणी कोसळते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे जे लोक वीज चमकत असताना झाडाच्या आश्रयाला होते. वीज पडल्यामुळे ते मृत्युमुखी पडले अथवा जखमी होतात.
अचानक आलेल्या वादळात काय काळजी घ्यावी


छत्र्या, कोयते, सुऱ्या, गोल्फ खेळण्याची काठी अशा धातूच्या वस्तूंची जवळ ठेवणे टाळा. विशेषतः त्या वस्तू आपल्या उंचीवर असतील तर, वीज पडताना पाहणे किंवा ऐकणे धोकादायक असते.अचानक आलेल्या वादळाच्या वेळी झाडाजवळ असाल, तरी शरीराची रचना पुढीलप्रमाणे असावी. जमिनीवर बसा. दोन्ही पावले जमिनीवर ठेवा, पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा आणि त्याभोवती हातांचा विळखा घाला. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरा. घराबाहेर असताना विजेपासून होणारा धोका कमी करण्यासाठी जर रिकाम्या जागेत असाल तर त्वरीत आसरा शोधा
वीज पडली तर काय घ्याल काळजी!
जर तुमच्या आसपास अथवा कोणा व्यक्तिवर वीज पडली तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बाधित व्यक्तिवर प्राथमिक उपचार करताना या गोष्टींचा विचार करा. श्वासोच्छवास – जर थांबला असेल, तर त्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तिचा नैसर्गिक श्वासोच्छवास सुरू होण्यास मदत होईल. हृदयाचे ठोके – थांबले असल्यास सीपीआर (CPR) चा उपयोग करावा. नाडीचा ठोका – चालू असेल आणि श्वासोच्छवास चालू असेल, तर इतर काही जखमा अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत नोंद करा. दृष्टी ठीक आहे, नाव ऐकू येत आहे ना व इतर हालचाली याची नोंद घ्या.
विजेच्या धोक्यापासून स्वत: सुरक्षित राहा व दूसऱ्यांचा बचाव करा.


मेघगर्जना, वादळ, वीज असेल तर काळजी घ्या
मेघ गर्जना, वीज, वादळ होत असताना हे करा आणि हे करू नका: तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरित आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्या. झाडे यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे विजेला स्वतः कडे आकर्षित करतात.
तुम्हाला आसरा मिळाला नाही तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाका किंवा वाकून बसा.
घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा. जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा.


लक्षात ठेवा. विजेचा प्रकाश आणि आवाज यातील अंतर जितके सेकंद असेल, त्याचा तीनने भागाकार केला असता ज्या ठिकाणी वीज कोसळली तिथेपर्यंतचे अंतर किलोमोटरमध्ये अंदाजे कळू शकते. जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचेनळ असलेल्या जागा आणि टेलिफोन
पाण्यातून तात्काळ बाहेर या, छोट्या नावेतून पाण्यातून जात असाल तर काठावर बाहेर या. जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्या वर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
वीज समस्येवर काम करण्याची गरज!
वीजेचा कडकडाट आणि वीज पडण्याची समस्या आता भारतामध्ये एक गंभीर समस्या होवू लागली आहे. या समस्येवर आता सामुहिक काम करण्याची गरज आहे. अर्थ नेटवर्क्सके दावा केला आहे की, संपूर्ण भारतात वेगवेगळ्या केंद्रीय व राज्य संस्था, विद्यापीठे व खासगी उद्योगांनी एकत्र येऊन यावर काम करणे आवश्यक आहे. सरकारी संस्थांसारख्या भारतीय सशस्त्र दल, पृथ्वी विज्ञान मंत्रालय व उत्तर-पूर्व अवकाश अनुप्रयोग केंद्र (एनईएसएसी) हवामानाविषयी आपली तयारीला पूर्ण करण्यासाठी अर्थ नेटवर्क्सच्या लायटनिंग सेन्सर व त्याच्या डेटाचा उपयोग करतात. या सर्व पातळ्यांवर वीजसमस्येवर एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.