कठीण काळात सेवा देणाऱ्या सेवेक-यांवर न्याय मागण्याची वेळ येवू नये; आ. धनंजय मुंडे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-146936844-1672678448067.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-146936844-1672678448067.jpg)
कठीण काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सेवेक-यावर शासनाकडे न्याय मागण्याची वेळ येवू नये, त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने मंजूर कराव्यात अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुंबईसह राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे, त्यात अतिदक्षता विभाग वगळून बाह्यरुग्ण सेवा व अंतररुग्ण सेवा या दोन्ही सेवा देण्यापासून निवासी डॉक्टरांच्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेने संप पुकारला आहे. त्याचा थेट परिणाम मोठ्या प्रमाणात रुग्णसेवेवर होताना दिसत आहे.
स्वारातीचे १७५ डॉक्टर संपावर!
आमच्या बीड जिल्ह्यातील एकमेव असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील सुमारे 150 ते 175 निवासी डॉक्टर्स संपावर आहेत, यात प्रामुख्याने एम एस व एम डी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा समावेश आहे व यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत असून रुग्णसेवा सर्वत्र विस्कळीत होताना दिसत आहे.
कोवीड काळातील योगदान मोठे
कोविडच्या कठीण काळात राज्याला सावरण्यासाठी निवासी डॉक्टर्सचे योगदान खूप महत्वाचे ठरलेले आहे. डॉक्टर म्हणून सेवा देताना व प्रशिक्षण घेताना त्यांना पूरक सुविधा, पगार व रिक्त पदांची भरती होणे या सर्व रास्त मागण्यांचा विचार शासनाने योग्य वेळी करणे गरजेचे आहे.
देशावर पुन्हा एकदा कोविड-19 च्या नव्या विषाणूचे संकट घोंगावत आहे, त्यातच पूर्वीच्या संकटातून आपण कसेबसे सावरलो आहोत, त्यामुळे या काळात आपले प्राण पणाला लावून सेवा दिलेल्या डॉक्टरांना न्याय देणे शासनाचे आद्यकर्तव्य आहे.
मागण्या मान्य करून परीपत्रक काढावे
त्यामुळे या संपाचे गंभीर विपरीत परिणाम जाणवण्यापूर्वीच या संपात राज्य सरकारने मध्यस्ती करून संबंधित डॉक्टरांच्या मागण्या मान्य कराव्यात व याबाबतचे शासन परिपत्रक जारी करावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.”