आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस अन्नत्याग आंदोलन समिती अंबाजोगाई च्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा “राज्यस्तरीय शेतकरी सहवेदना पुरस्कार” ऍड. संतोष पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली.
अन्नत्याग आंदोलन समिती अंबाजोगाई च्या वतीने आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यास अथवा संस्थेस आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृती निमित्ताने हा “शेतकरी सहवेदना पुरस्कार” प्रति वर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या वर्षीचा पुरस्कार महाराष्ट्रात आधार माणुसकीचा या संस्थेचे माध्यमातून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक उभारणी देण्यासाठी, त्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी सांभाळून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ऍड. संतोष पवार यांना हा पुरस्कार अन्नत्याग आंदोलन समितीचे मुख्य संयोजक सुदर्शन रापतवार यांनी जाहीर केला आहे.
येत्या १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने अंबाजोगाईत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमातील नगर परिषदेच्या आद्य कवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्काराने ऍड. संतोष पवार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल आणि गुलाबपुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.